ऑस्ट्रेलियाच्या आग्नेय भागातून वाहणारी एक प्रमुख नदी. तेथील न्यू साउथ वेल्स राज्याच्या आग्नेय भागाचे आणि व्हिक्टोरिया राज्याच्या पूर्व भागाचे या नदीने जलवाहन केले आहे. नदीची लांबी सुमारे ४३० किमी. आहे. या नदीचे एकूण पाणलोट क्षेत्र १५,८६९ चौ. किमी. असून त्यापैकी ६,५०० चौ. किमी. क्षेत्र व्हिक्टोरिया राज्यातील आहे. कॉझिस्को (उंची २,२२८ मी.) हे ऑस्ट्रेलियातील, तसेच स्नोई पर्वतातील सर्वोच्च शिखर असून त्याच्या पूर्व उतारावर या नदीचा उगम होतो. स्नोई पर्वताच्या आणि कॉझिस्को शिखराच्या पूर्व उतारावरून प्रथम आग्नेयीस वाहत गेल्यानंतर पुढे ती पश्चिमेस आणि दक्षिणेस वाहत जाऊन मार्लो येथे बॅस सामुद्रधुनीला मिळते. न्यू साउथ वेल्समधील यूकम्बेने, थ्रेड्बो व बाँबाला, तर व्हिक्टोरियातील बकन या स्नोई नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. जिंदाबायने धरणापासून खाली नदी बेलोका घळईतून आणि मोनारो पठारी प्रदेशातून वाहते. तेथे तिच्या प्रवाहमार्गात चार जलप्रपात आहेत.
स्नोई नदीला प्रामुख्याने पर्वतीय प्रदेशातील बर्फ वितळून पाणीपुरवठा होतो. जलविद्युतनिर्मिती आणि जलसिंचनाच्या दृष्टीने या नदीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ‘स्नोई मौंटन्स हायड्रोइलेक्ट्रिक स्कीम’ ही जगातील सर्वांत मोठ्या जलविद्युतनिर्मिती आणि जलसिंचन योजनांपैकी एक आहे. या नदीच्या पहिल्या टप्प्यातील पर्वतीय प्रदेशात असलेली ही योजनाप्रणाली इ. स. १९४९ ते १९७४ या कालावधीत पूर्ण करण्यात आली. या योजनाप्रणालीत ४ प्रमुख धरणांसह लहानमोठी एकूण १६ धरणे, ९ जलविद्युतनिर्मिती केंद्रे, २ जलउपसा केंद्रे, २२५ किमी. लांबीचे पाणी वाहून नेणारे बोगदे, तसेच नळमार्ग आणि जलवाहिनी किंवा जलसेतू (अॅक्विडक्ट) यांचा समावेश होतो. या नदीच्या जास्त उंचीवरील भागात धरण बांधून अडविलेले पाणी ऑस्ट्रेलियन आल्प्स पर्वताखालून काढलेल्या बोगद्यांमार्गे वळवून जलविद्युतनिर्मिती प्रकल्पांपर्यंत नेले आहे. जलविद्युतनिर्मितीनंतर ते पाणी मरी आणि मरंबिजी या नद्यांमध्ये सोडण्यात आले आहे. मूळ योजनेनुसार नदीच्या नैसर्गिक प्रवाहाचे जवळजवळ ९९ टक्के पाणी अशा प्रकारे वळविण्यात आले. त्यामुळे मूळ प्रवाहाचे पाणी खूप कमी होऊन नदीच्या खोऱ्यातील पर्यावरण आणि परिसंस्था धोक्यात आल्या. त्यामुळे विसाव्या शतकाच्या अखेरीस नदीच्या मूळ प्रवाहातील पाणी वाढविण्यासाठी जनतेतून प्रचंड दबाव आणला गेला, परंतु त्यात फारशी प्रगती झाली नाही. अल्पाइन नॅशनल पार्क, कॉझिस्को नॅशनल पार्क व स्नोई रिव्हर नॅशनल पार्क ही नदीच्या खोऱ्यातील प्रमुख राष्ट्रीय उद्याने आहेत. खालच्या टप्प्यातील खोऱ्यात अनेक पाणथळ प्रदेश आहेत. नदीच्या खोऱ्यात सुपीक पूरमैदाने असून ती आर्थिक दृष्ट्या महत्त्वाची आहेत. तेथे जलसिंचनाच्या साहाय्याने फलोद्यानाची शेती, दुग्धशेती, पशुखाद्य उत्पादन, गोमांस उत्पादक गुरांना पोसणे, कृषी व बियाणांची उत्पादने घेणे आणि मत्स्यशेती इत्यादी व्यवसाय केले जातात. ऑर्बोस्ट नगराच्या पुढील खोरे आणि नदीमुखखाडीचा प्रदेश नौकाविहार, हौशी मच्छीमारी आणि शिबिराच्या सुविधांमुळे पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. जिंदाबायने (न्यू साउथ वेल्स), ऑर्बोस्ट, मार्लो (व्हिक्टोरिया) ही या नदीच्या काठावरील प्रमुख नगरे आहेत.
इसवी सन १८३९ मध्ये अँगस मॅकमिलन यांनी या नदीचे समन्वेषण केले; परंतु प्रसिद्ध ऑस्ट्रेलियन कवी बांजो पॅटरसन यांच्या ‘द मॅन फ्रॉम स्नोई रिव्हर अॅन्ड अदर व्हर्सेस’ (१८९५) या प्रसिद्ध कवितेने (बॅलड) ही नदी अजरामर झाली. त्यांच्या मृत्युपर्यंत या कवितेच्या एक लाख प्रती विकल्या गेल्या होत्या.
समीक्षक : वसंत चौधरी