कांजिण्या हा जगभर सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात आढळणारा संसर्गजन्य आजार आहे. ताप, अस्वस्थता व विशिष्ट प्रकारचे उत्‍स्फोट (पुरळ-फोड) या स्वरूपात आढळणारा हा आजार सर्वसाधारण बालकांमध्ये सौम्य स्वरूपात, तर कमकुवत प्रतिकारशक्ती असणाऱ्या व्यक्तींमध्ये तीव्र स्वरूपात आढळतो.

रोगकारक : कांजिण्या या आजारास व्हॅरिसेला झॉस्टर व्हायरस (Varicella Zoster Virus, VZV) हा विषाणू कारणीभूत असतो. त्याच्या संसर्गाने प्रथमत: कांजिण्या होतात. रुग्ण बरा झाल्यावर अनेक वर्षे हे विषाणू रुग्णाच्या मज्जासंस्थेत सुप्तावस्थेत जातात आणि त्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती काही कारणास्तव कमकुवत झाली, तर ते पुन्हा कार्यरत होऊन नागीण किंवा परिसर्प (Herpes) या आजाराचे कारण ठरतात.

संसर्ग : या विषाणूचा संसर्ग प्रामुख्याने तोंडातील व श्वसनमार्गातील स्रावातून शिंकण्या-खोकण्यामार्फत होतो. पुरळ येण्यापूर्वीचे एक-दोन दिवस व पुरळ आल्यानंतर पाच-सहा दिवसांपर्यंत रुग्णामार्फत इतरांना प्रादुर्भाव होऊ शकतो. रुग्णांच्या फोडीतील द्रावातूनही कांजिण्यांचा प्रसार होतो. मात्र फोडांवर खपली धरली की प्रसार थांबतो. या काळात रुग्णाच्या निकट संपर्कात येणाऱ्या जवळजवळ ९०% असंरक्षित व्यक्तींना कांजिण्या होण्याचा धोका असतो.

एकदा कांजिण्या झाल्या की, त्याच व्यक्तीस पुन्हा कांजिण्या सहसा होत नाहीत. प्रामुख्याने १० वर्षांखालील बालकांना कांजिण्या होतात व त्यामुळे निर्माण झालेली प्रतिकारशक्ती जन्मभर टिकते. मात्र प्रौढ वयात कांजिण्या झाल्यास त्या गंभीर रूप धारण करतात. गर्भारपणाच्या सुरुवातीच्या काळात मातेस कांजिण्या झाल्या तर बाळास जन्मजात कांजिण्या होण्याचे प्रमाण ०.४—२% इतके असते. तसेच वयाच्या पहिल्या वर्षात नागीण होण्याचा धोका संभवतो. कांजिण्यांचा रुग्ण हा प्रादुर्भावाचा मुख्य स्रोत असला तरी क्वचित प्रसंगी नागीण झालेल्या रुग्णाच्या निकट संपर्कातूनही हा रोग संक्रमित होऊ शकतो.

कांजिण्यांचे प्रमाण ऋतुमानानुसार बदलते. विषुववृत्तीय प्रदेशात थंड, कोरड्या, हिवाळी वातावरणात किंवा वसंत ऋतूत कांजिण्यांचा प्रादुर्भाव वाढतो. कांजिण्यांचे विषाणू तीव्र उष्णता सहन करू शकत नाहीत. ते वातावरणात एक-दोन दिवस तग धरतात. साबण व जंतुनाशकांनी ते सहज निष्प्रभ करता येतात.

कांजिण्या : लक्षणे.

लक्षणे : कांजिण्यांचा परिपाककाल (विषाणू शरीरात गेल्यापासून लक्षणे उत्पन्न होण्यापर्यंतचा काळ; Incubating period) १४ ते १६ दिवस, क्वचित तीन आठवड्यापर्यंतही असतो. ५% बाधितांमध्ये कुठलीही लक्षणे दिसून येत नाहीत. बहुतेक रुग्णांमध्ये आजाराचे स्वरूप सौम्य असते, परंतु सुरुवातीची लक्षणे तीव्र असू शकतात.

प्रथम सौम्य ते मध्यम स्वरूपाचा ताप (ज्वर), थकवा आणि अस्वस्थता येते. पुरळ उठायला सुरुवात होते. सुरुवातील पुरळ पोट, छाती, पाठीवर आणि नंतर काही प्रमाणात हाता-पायांवरसुध्दा येते. शरीराच्या डाव्या-उजव्या दोन्ही भागांवर पुरळ येते. तोंडाचा अंतर्भाग तसेच काखेतही फोडी येऊ शकतात. सहसा हाताचा पंजा किंवा तळपायावर फोडी येत नाहीत.

कांजिण्यांच्या फोडी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असतात. लालसर पुरळ (रंजिका) उठून फोडींचे (पीटिका) रूप धारण करतात. नंतर लाल पाण्यासारखा द्राव भरून त्या दवबिंदूसारख्या (पूयिका) दिसू लागतात. फोडींच्या भोवताली लालसरपणा असतो. काही फोडांमध्ये पू भरून येतो. रंजिका-पीटिका-पूयिका हा प्रवास लवकरच पूर्ण होऊन ४ ते ७ दिवसात खपली पडण्याची प्रक्रिया पूर्ण होते. प्रत्येक तापासोबत नवीन पुरळ येते. सतत ४-५ दिवस हा क्रम चालू राहतो. त्यामुळे कांजिण्यांच्या रूग्णात एकाच वेळी रंजिका, पीटिका, पूयिका अशा फोडांच्या वेगवेगळ्या अवस्था पहावयास मिळतात. यास बहुरूपता (Pleomorphism) म्हणतात.

कांजिण्यांच्या फोडांना खूप खाज येते व खाजविल्यामुळे व्रण वा गळवे होऊ शकतात, म्हणून ते खाजविले जाणार नाहीत याची काळजी घ्यावी लागते किंवा खाजशामक औषधांचा वापर करावा लागतो. कांजिण्या या आजारामधून रुग्ण उपचाराशिवाय बरा होऊ शकतो.

प्रौढांना कांजिण्या झाल्यास लक्षणे अधिक तीव्र आढळतात. कांजिण्यांचे क्वचित दिसून येणारे गंभीर परिणाम म्हणजे फोडांतील रक्तस्राव, फुप्फुसदाह (Pneumonia), मस्तिष्कशोथ व मेंदूवरील दुष्परिणाम (Acute cerebellar ataxia, Reye’s syndrome). कांजिण्यांच्या विषाणूमुळे होणारा फुप्फुसदाह सुदृढ बालकांत आढळत नाही. मात्र नवजात शिशु, प्रौढ, प्रतिकारशक्तीचा अभाव असणाऱ्या व्यक्तींमध्ये तो मृत्यूचे कारण ठरू शकतो. गर्भवती स्त्रीला कांजिण्या झाल्यास गर्भावर गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात.

निदान व उपचार : कांजिण्यांचे निदान रुग्णाची लक्षणे व फोडांचे निरीक्षण करून करता येते. त्यासाठी चाचण्या करण्याची आवश्यकता नसते. कांजिण्यांसाठी आवश्यकता वाटल्यास विषाणूविरोधी औषधाचा वापर करता येतो. रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना आवश्यकतेनुसार इम्युनोग्लोब्युलिने देता येतात. कांजिण्यांसाठी परिणामकारक लस उपलब्ध आहे, परंतु ती सार्वत्रिक लसीकरणाचा भाग नाही. कधीही कांजिण्या न झालेल्या बालकास १२ ते १५ महिन्यांदरम्यान एक आणि ४-६ वर्षांदरम्यान एक अशा दोन मात्रा द्याव्या लागतात. तर प्रौढांना एक ते दोन महिन्याच्या अंतराने दोन मात्रा द्याव्या लागतात.

रुग्णाची घ्यावयाची काळजी : पुरळ आलेल्या रुग्णास किमान आठवडाभर गर्दीच्या ठिकाणी पाठवू नये आणि रुग्णाने वापरलेल्या वस्तू निर्जंतुक कराव्यात.

पहा : #परिसर्प, #व्हॅरिसेला झॉस्टर व्हायरस.