योगासनाचा एक प्रकार. ‘शलभ’ किंवा ‘शरभ’ या शब्दाचा अर्थ टोळ किंवा नाकतोडा असा आहे. या आसनाची अंतिम स्थिती बसलेल्या नाकतोड्याप्रमाणे दिसते म्हणून या आसनाचे नाव शलभासन असे आहे. हे आसन शरीरसंवर्धनात्मक प्रकारात मोडते. हे आसन एकावेळी फक्त एका पायाने केल्यास त्याला अर्धशलभासन म्हणतात. शलभासनाचा निर्देश व कृती घेरण्ड संहितेत आढळते (२.३९). हठरत्नावलीत ८४ आसनांच्या सूचीमध्ये या आसनाचा निर्देश आढळतो (३.१९).
कृती : जमिनीवर घातलेल्या सतरंजीवर हनुवटी टेकवून पालथे झोपावे. हात सरळ व शरीराला लागून ठेवून मुठी बंद कराव्या. अर्धशलभासन करावयाचे असल्यास प्रथम उजवा पाय सरळ ठेवून जमिनीपासून साधारण १ फूट वर उचलावा. स्थिर रहावे. श्वसनाचा अवरोध करू नये. १०—१५ सेकंदानंतर पाय खाली आणावा. हीच कृती डाव्या पायाने करावी.
पूर्ण शलभासनासाठी दोन्ही पाय एकत्रपणे वर उचलावे. या स्थितीत पार्श्वभाग किंचित उचलला जातो. अंतिम स्थितीत १०—१५ सेकंद थांबून पाय खाली ठेवावे.
लाभ : या आसनात ओटीपोट, कंबर, मांड्यांचा वरचा भाग ताणला जातो व पोटावर दाब पडतो. श्वसन चालू ठेवल्याने तेथील रक्ताभिसरण चांगले होते. नितंब, कंबर व मांड्या सशक्त व प्रमाणबद्ध होतात. कंबरेचे दुखणे उद्भवत नाही. श्वसनतंत्र सुधारल्याने सर्दी खोकला होत नाही. साधकाची प्रतिकारशक्ती वाढते. फुप्फुसांची कार्यक्षमता सुधारते. थकवा दूर होतो. दिवसभर उत्साह टिकतो.
विधिनिषेध : कंबरचे दुखणे, पाठीचे जुने दुखणे, पोटदुखी, वातरोग, अंतर्गळ (Hernia) यांची बाधा असणाऱ्यांनी हे आसन करू नये. आम्लपित्त (Hyperacidity), उच्च रक्तदाब, मानेचे दुखणे यापैकी काही तक्रारी असल्यास इतर आसनांचा सराव बरेच दिवस केल्यावरच हे आसन करावे. अर्धशलभासनात जमिनीवरील पाय सरळ व सैल ठेवावा. हनुवटी वर उचलू नये. खूप प्रयत्न करून, बळाचा वापर करून हे आसन करू नये. पाय वर उचलताना गुडघ्यामध्ये दुमडू नये. शक्य झाल्यास आसनाची दोन किंवा तीन वेळा पुनरावृत्ती करावी.
समीक्षक : श्रीराम आगाशे