अर्थक्षेत्र : भाषेच्या शब्द आणि वाक्य स्तरावर अर्थ कसा अभिव्यक्त होतो याचा भाषाशास्त्रीय अभ्यास म्हणजे अर्थविचार (Semantics).अर्थक्षेत्र ही भाषेच्या अर्थवैचारिक अभ्यासातील एक प्रमुख संकल्पना आहे. अर्थसाधर्म्य असणाऱ्या शब्दांचा समूह अशी अर्थक्षेत्राची स्थूल व्याख्या करता येईल. उदा. लाल,पिवळा, पांढरा, काळा, इ. रंगसूचक समूहाचा निर्देश अर्थक्षेत्र ही पारिभाषिक संज्ञा वापरून करता येईल. विशिष्ट अर्थक्षेत्रात समाविष्ट होऊ शकणारे शब्द एका समान अर्थसूत्राने बांधलेले असतात व ते एकाच विषयाशी किंवा संकल्पनेशी निगडीत असतात. अर्थक्षेत्र या भाषावैज्ञानिक संकल्पनेचे ‘समाविष्ट व्याप्ती’ (hyponymy) या पारंपरिक संकल्पनेशी साम्य आहे. समाविष्ट व्याप्ती सामान्यवाचक (general) आणि विशिष्टवाचक (particular) शब्दातील संबंध दाखवते. उदा. ‘बासरी’ हे ‘वाद्य’ या सामान्यवाचक संज्ञेची समाविष्ट व्याप्ती आहे. बासरी, तबला, नगारा, इ. विशिष्ट संज्ञांची व्याख्या ‘वाद्य’ या सर्वसमावेशक संज्ञेच्या संदर्भातच केली जाऊ शकते, जसे की ‘बासरी हे एक वाद्य आहे’. अर्थक्षेत्र व समाविष्ट व्याप्ती या दोन्हीतही अर्थाधारित शब्दसंबंध दाखवले जातात. पण अर्थक्षेत्रे ही समाविष्ट व्याप्तीपेक्षा जास्त व्यापक व समावेशक असतात. भाषा अभ्यासक जॉन लायन्स यांनी नामनिर्देशित केल्याप्रमाणे अर्थक्षेत्र हे कुठल्याही प्रकारे परस्परांशी संबंधित असणारे शब्द आपल्यात सामावून घेते.

काळाच्या ओघात शब्दांची अर्थक्षेत्रे बदलू शकतात. ती नेहमीच प्रवाही असतात. त्यांच्या अर्थसीमा परिवर्तनशील असून विभिन्न अर्थक्षेत्रात सहज मिसळून जाऊ शकतात. मराठीतील ‘जाळे’ या शब्दाचे अर्थक्षेत्र (कोळ्याचे जाळे, मायाजाल, मोहजाल, इ.) सध्याच्या माहिती तंत्रज्ञानयुगात विस्तारून त्याला ‘माहिती-जाल’ या नव्या तंत्रज्ञानसंबंधी अर्थाचा पैलू प्राप्त झाला आहे.

संदर्भ: १.धोंगडे, र. वा., भाषाविज्ञान, दिलीपराज प्रकाशन पुणे, २००६. 2. Cruse, D. A., Lexical Semantics, Cambridge: CUP, 1986. 3. Lyons, J., Semantics (2 Vol), Cambridge: CUP, 1977.

Keywords: #Semantic/Lexical field, #Hyponymy, #Entailment, #Semantic Change