घटक–विश्लेषण : भाषावैज्ञानिक पद्धतीने शब्दांचे अर्थवर्णन किंवा अर्थविघटन करण्यासाठी अर्थविचारात (Semantics) जी पद्धती वापरली जाते तिला घटक विश्लेषण असे म्हणतात. फेर्दिनां द सोस्यूर व नंतर प्राग संप्रदायातील अभ्यासकांनी ध्वनींमधील भेद दाखवण्यासाठी जी द्विमान-विरोध (binary contrast) पद्धती रूढ केली त्यातून घटक-विश्लेषण संकल्पनेचा उगम झाला. स्वरविज्ञानात दोन ध्वनींमधील भेद हा त्यांच्या उच्चारणांत कुठली उच्चारण वैशिष्ट्ये आढळतात (+) किंवा आढळत नाहीत (-) हे चिन्हांकित पद्धतीने दाखवून स्पष्ट केला जातो. उदा.
/प/ – (+ओष्ठ्य) (+स्फुट) (-स्पंदित)
/ब/ – (+ओष्ठ्य) (+स्फुट) (+स्पंदित)
याच स्वनशास्त्रीय प्रारूपाला अनुसरून अर्थविचारात प्रथम शब्दाचा रूढ अर्थ त्यांच्या आद्य किंवा प्राथमिक, सूक्ष्मातिसूक्ष्म घटकांमध्ये/ गुणवैशिष्ट्यांमध्ये विघटीत केला जातो. हे अर्थघटक शब्दांचे अंगभूत गुणविशेष असल्याने ते साधारणत: सर्व भाषात समान व म्हणूनच सार्वत्रिक असतात. उदा. मानव, प्रौढ, पुरुष, इ. विशिष्ट शब्दांचा अर्थ मग अर्थगुणवैशिष्ट्यांच्या समूहाच्या स्वरुपात प्रतीत होतो. अर्थात ही सर्व अर्थगुणवैशिष्ट्ये एकाच अर्थक्षेत्रातील सर्व शब्दात असतीलच असे नाही. त्यांचे विविध शब्दांच्या अर्थपरिघात असणे किंवा नसणे हे अनुक्रमे (+) व (-) या द्विमान चिन्हांनी दाखवले जाते. उदा. ‘मानव’ या अर्थक्षेत्रात समाविष्ट स्त्री, पुरूष, मुलगा, मुलगी या शब्दांतील अर्थभेद खालीलप्रमाणे दाखवता येईल:
स्त्री – (+मानव) (+प्रौढ) (-नर)
पुरुष – (+मानव) (+प्रौढ) (+नर)
मुलगी – (+मानव) (-प्रौढ) (-नर)
मुलगा – (+मानव) (+नर) (-प्रौढ)
शब्दार्थांच्या घटक विश्लेषणाची ही पद्धती वरवर पाहता पूर्ण वैज्ञानिक वाटली तरी तीत काही कमतरता आहेत. घटक-विश्लेषण पद्धती ज्यावर आधारलेली आहे त्या द्विमान पद्धतीत लवचिकतेचा अभाव आहे. या पद्धतीनुसार निर्देशित (Specified) अर्थगुण हा विशिष्ट शब्दात उपस्थित (+), अनुपस्थित (-) किंवा अनिश्चित (+/-) याच शक्यतांच्या चौकटीत बसवावा लागतो. त्यामुळे घटकविश्लेषण पद्धती फक्त अशाच मर्यादित अर्थक्षेत्रांना लागू केली जाऊ शकते ज्यातून निश्चित असे अर्थ-भेद/अर्थ विरोध सहजपणे वेगळे करता येतात. पण अशी अनेक अर्थक्षेत्रे आहेत ज्यातील शब्द अर्थविश्लेषणाच्या या चौकटीत बसू शकत नाहीत. उदा. रंगविषयक संज्ञांचे परिक्षेत्र पिवळा रंग लाल रंगाहून वेगळा दाखवण्यासाठी (+/-पिवळा) (+/-लाल) असे एकांगी विश्लेषण पुरेसे ठरू शकत नाही. शब्दांची अर्थ-वैशिष्ट्ये ही ध्वनींच्या उच्चारण वैशिष्ट्यांइतकी स्पष्ट व असंदिग्ध असू शकत नाहीत. विशिष्ट स्वन-उच्चारणाच्या प्रक्रियेत होणाऱ्या स्वरेंद्रियाच्या हालचाली प्रत्यक्ष निरीक्षणाच्या कक्षेत येतात. या उलट संकल्पनात्मक किंवा भावनात्मक शब्दार्थ-घटकांची सत्यता पडताळून पाहण्यासाठी आपण मानवी मेंदूच्या अंतरंगात डोकावू शकत नाही.
तरीही घटक-विश्लेषणाची उपयुक्तता पूर्णपणे नाकारता येणार नाही. शब्दार्थ संबंधांवर आधारित विरोधाभास (Paradox), विरोधार्थी शब्दांचे संलग्नीकरण (Oxymoron), पुनरावृत्ती (Tautology) व रूपक अशा काही भाषा व अर्थालंकारांचे भाषाशास्त्रीय स्पष्टीकरण देण्यात घटक-विश्लेषण महत्वाची भूमिका बजावू शकते.
संदर्भ :
• धोंगडे, र. वा., भाषाविज्ञान, दिलीपराज प्रकाशन, २००६, पुणे.
• Cruse, D. A., Lexical Semantics. Cambridge: CUP, 1986.
Keywords : #Componential Analysis, #Meaning component.