अनुभव वक्र. अनुभवाच्या उत्पादनखर्चावर होणाऱ्या परिणामाचे गणितिक प्रमाण. या वक्राला ‘विद्वता वक्रʼसुद्धा म्हणतात. १९३६ मध्ये प्रसिद्ध अमेरिकन वैमानिक आणि प्रशिक्षक थिओडोर पॉल राइट यांनी सर्वप्रथम अध्ययन वक्र या संकल्पनेची मांडणी केली.

अध्ययन वक्र ही संकल्पना उद्योगसंस्थेच्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा उत्पादन पद्धती, व्यवस्थापन, उत्पादन खर्च इत्यादींवर कसा परिणाम होतो, याचे स्पष्टीकरण करते. ज्ञानाच्या व अनुभवाच्या अनुकूल परिणामस्वरूप उत्पादनखर्चात घट होते. त्याचा फायदा उद्योगसंस्थेला होतो. म्हणूनच अध्ययन वक्र खालच्या आकृतीत दाखविल्याप्रमाणे खालच्या बाजूने घसरणारा असतो.

ज्ञान किंवा अनुभवामुळे उत्पादन खर्चात घट होण्याची प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे आहेत :

  • (१) अनुभवाच्या परिणामस्वरूप सुरुवातीच्या काळात मंद असलेल्या कर्मचाऱ्यांच्या कामाचा वेग नंतरच्या काळात वाढणे.
  • (२) अनुभवामुळे व्यवस्थापकांच्या कामात सुसंगती येऊन उत्पादनप्रक्रियेत अधिक प्रभावी नियंत्रण होणे.
  • (३) उपकरणे व यंत्र यांचा योग्य उपयोग करण्याचे कौशल्य अनुभवाने येणे.
  • (४) दीर्घकालीन ज्ञानामुळे निर्णयप्रक्रियेत अधिक व्यावसायिकता येणे.
  • (५) साधनसामग्रीचा अपव्यय टाळणे इत्यादी कारणांमुळे प्रत्येक टप्प्याला उत्पादनखर्च घटत जातो. त्यामुळे सरासरी खर्च म्हणजेच अध्ययन वक्र हा खालच्या बाजूला स्थलांतरित होतो.

अनुभवपरिणाम लाभ हा आपोआप प्राप्त होत नाही. त्यासाठी व्यवस्थापन आणि कर्मचारी या सर्वांकडून मनापासून काम करण्याची इच्छा असणे अपेक्षित असते. अनेक सर्वेक्षणांतून असे दिसून आले की, अनुभवपरिणामाच्या लाभामुळे सर्वसाधारणपणे २०% ते ३०% इतका सरासरी खर्चात प्रत्यय येतो.

आकारमानाच्या बचती आणि अध्ययन वक्र : आकारमानाच्या बचती आणि अध्ययन या दोन्हींचे परिणाम सरासरी खर्चातल्या घटस्वरूपात होतात; परंतु यांपैकी आकारमानाच्या बचतींचा परिणाम एकाच खर्च वक्रावर दाखवला जातो, तर अनुभवांमुळे होणाऱ्या सरासरी खर्चातील घटीचा परिणाम मूळ खर्च वक्राला खालच्या बाजूने स्थलांतरित करून दाखविला जातो, जे खालील आकृतीद्वारे स्पष्ट केले आहे.

समीक्षक : श्रीराम जोशी