अर्थ संबंध : अर्थस्तरावर शब्दांचा अभ्यास करताना शब्दार्थाच्या दोन बाजू विचारात घेतल्या जातात. १) शब्दांचे अंगभूत अर्थ २) शब्दांतील परस्पर अर्थसंबंध. प्रस्तुत नोंदीत मुख्यतः शब्दातील परस्पर अर्थसंबंध विचारात घेतले आहेत.

१. समाविष्ट-व्यापी किंवा प्रजाती-पोटजाती

इंग्रजीतील Hyponymy या शब्दार्थ-संबंधवाचक संज्ञेसाठी मराठीत समाविष्ट-व्यापी किंवा प्रजाती-पोटजाती असे दोन प्रतिशब्द प्रचलित आहेत. प्रत्येक भाषेमध्ये काही असे सर्वसामान्य व्यापक अर्थाचे काही शब्द असतात ज्यामध्ये तुलनेने मर्यादित किंवा विशिष्ट अर्थाचे शब्द सामावले जातात. यांतील व्यापक अर्थी किंवा समावेशक शब्दाला प्रजाती (Superordinate) व त्यात समाविष्ट शब्दांना पोटजाती (Hyponymy) असे म्हणतात. उदा. ‘मांजर’ हे ‘प्राणी’ या प्रजातीची पोटजात आहे तर ‘झाड’ हा शब्द ‘पारिजात’, ‘चाफा’ इ. विशिष्ट झाडे दर्शक समाविष्ट-व्यापी (प्रजाती) आहे. समाविष्ट व्यापी किंवा प्रजाती- पोटजाती यांतील अर्थसंबंध तालिका खालीलप्रमाणे दाखविता येतील.

                                                                                 वाद्य
                   तालवाद्य                     सूरवाद्य                     तंतुवाद्य
 तबला   ढोल    झांज  बासरी  पावा  बाजा  सतार  तंबोरा  व्हायोलीन

 

वाद्य या प्रजातीच्या तालवाद्य, सूरवाद्य व तंतुवाद्य या पोटजाती आहेत. तर तंतुवाद्य हे सतार या पोटजातीची प्रजाती आहे. शब्दकोशात पोटजातीची व्याख्या प्रजातीय शब्दांच्या संदर्भात केली जाते. उदा. ‘झांज’ हे एक तालवाद्य आहे. वाक्यस्तरावर प्रजाती-पोटजाती वाचक शब्दांचा उपयोग केला असल्यास त्या वाक्यांचे संबंध विशिष्ट प्रकारचे म्हणजे ‘अनुसरण’ (Entailment) युक्त असतात. १) ती तंबोरा वाजवते. २) ती वाद्य वाजवते. पहिल्या वाक्यात दुसरे वाक्य अनुस्यूत आहे, तसे दुसऱ्या वाक्यात पहिले वाक्य अनुस्यूत नाही.

२.अर्थसाधर्म्य किंवा समानार्थी (Synonyms)

अर्थविचारातील अर्थसाधर्म्य किंवा समानार्थी (Synonyms) हा एक प्रमुख अर्थसंबंध मानला जातो. जे शब्द एकाच अर्थाने वापरले जाऊ शकतात, ज्यांचा अर्थ पूर्णत: समान आहे, जे एकमेकांच्या बदली सहजतेने वापरले जाऊ शकतात. अशा शब्दांना ’समानार्थी’ असे म्हणतात. उदा. मूल-बाळ, छान-सुंदर, नर-पुरुष, स्त्री-बाई इ. मात्र वरवर पाहता समानार्थक वाटणारे शब्द नेहमीच एकमेकांची जागा घेऊ शकत नाहीत. अर्थविचारात संपूर्ण ‘अर्थसाधर्म्य’ ही एक दुर्मिळ गोष्ट आहे. अर्थसाधर्म्य ठरविताना भाषाशास्त्रात संदर्भाला अत्यंत महत्त्व आहे. शब्द हे शेवटी वाक्यातच वापरले जातात आणि शब्द बदलामुळे वाक्याच्या अर्थात जर फरक पडत असेल तर त्यांना समानार्थक म्हणता येणार नाही. अशावेळी अर्थसाधर्म्य असूनही ते शब्द ‘एकरूप’ असू शकत नाहीत. संदर्भानुसार समानार्थी शब्दांतून ठराविक शब्दांची/पदबंधाची निवड करावी लागते. उदा. जेवणे, खाणे, आस्वाद घेणे, अन्नग्रहण करणे, भोजन करणे, उदरभरण करणे इ. पदबंधाचा अर्थ वरवर पाहता एकच वाटला तरी ज्या संदर्भात ते वापरले जातात त्यातून त्यांच्या अर्थातील सूक्ष्म फरक/अर्थभेद लक्षात येतो. जेवणे, खाणे या सर्वसामान्यपणे वापरल्या जाणाऱ्या अविशिष्ट क्रिया आहेत. ‘अन्नग्रहण’, ‘भोजन’ यांना औपचरिकतेचा स्पर्श आहे तर ‘पोट भरणे’, ‘उदरभरण’ यांतून एक प्रकारची यांत्रिकता प्रतीत होते, जी ‘आस्वाद घेणे’ मध्ये अजिबात दिसत नाही. सर्वसामान्य परिस्थितीत एखादा माणूस दुसऱ्याला ‘ठार मारतो’, ऐतिहासिक किंवा पौराणिक संदर्भात मात्र अफझलखानाचा किंवा जरासंधाचा ‘वध केला’ जातो. तर माफियांच्या संदर्भात एखाद्याचा ‘गेम केला’ जातो.

३.विरुद्धार्थ (Antonyms)

अर्थाविचारात प्रस्तुत संज्ञा शब्दांतील विरोधार्थी नाते दर्शविण्यासाठी वापरतात. सर्व भाषांत विरोधार्थी संबंधांवर आधारित शब्दांच्या जोड्या प्रचलित असतात. त्या फक्त ‘हे’ किंवा ‘ते’ अशा दोनच शक्यता गृहीत धरतात. उदा. जिवंत-मृत, तरुण-म्हातारे/वृद्ध, सुख-दुख, स्वकीय-परकीय, सशक्त-अशक्त इ. मात्र सर्वच ठिकाणी असा टोकाचा अपरिवर्तनीय अर्थ विरोध असतोच असे नाही. विरोधार्थाच्या स्वरूपावरून त्याचे खालीलप्रमाणे प्रकार मानले जातात.

अ. द्विपर्यायी विरोध – विरोधार्थी शब्दांच्या जोड्या परस्पर विरोधाच्या फक्त दोनच शक्यता दाखवितात. उदा. जिवंत-मृत, नैसर्गिक-अनैसर्गिक, पास-नापास.

ब. बहुविध विरुद्धार्थी किंवा क्रमवार विरुद्धार्थी – यामध्ये टोकाचे विरोध दाखविणाऱ्या दोन शब्दांमध्ये विरोधाचा चढता किंवा उतरता क्रम दाखविणारे क्रमदर्शी शब्द येऊ शकतात. उदा. उष्ण-थंडगार या दोन अनुक्रमे कमाल व किमान तापमानदर्शक शब्दांच्या मध्ये उष्णतेकडून थंडपणा क्रमवार झुकत जाणारे शब्द येऊ शकतात. ‘उष्ण-गरम-कोमट-गार-थंडगार’ असे विरोधाचे क्रमदर्शी पर्याय असू शकतात.

क. परस्परावलंबी विरुद्धार्थी – ज्या शब्द-जोड्या विरोद्धार्थी असतात पण एकमेकांवर अवलंबूनही असतात. उदा. नवरा-बायको, गुरु-शिष्य, मालक-नोकर, देणे-घेणे इ. या शब्द-जोड्यांमध्ये नवरा, गुरु, मालक, देणे या शब्दांचे अर्थ अनुक्रमे बायको, शिष्य, नोकर, घेणे या विरुद्धार्थीच्या गृहीत अस्तित्वावरच अवलंबून आहेत.

४.विविधार्थी (Polysemy)

विविधार्थी मध्ये एकाच शब्दाचे संदर्भाप्रमाणे वेगवेगळे अर्थ होऊ शकतात. उदा. ‘सरळ’ या शब्दाचा मूळ अर्थ ‘वेडा वाकडा, वळणे नसणारा’ असा घेतल्यास त्याच्या सोबत येणाऱ्या शब्दांप्रमाणे तो वेगवेगळे लक्षार्थ धारण करतो. सरळ रस्ता (खाचखळगे नसणारा), सरळ (छक्केपंजे नसणारा) स्वभाव, सरळ (स्पष्ट) उत्तर असे सोबत येणाऱ्या शब्दांबरोबर ‘सरळ’ या शब्दांचे अनेकार्थ होतात. ‘सरळ’च्या मूळ अर्थाचे विस्तृतीकरण होते.

विविधार्थी हा अर्थ-संबंध केवळ शब्दस्तरावरच नव्हे तर रूपिमस्तरावरही आढळून येतो. उदा. ‘ला’ हा प्रत्यय मराठीच्या व्याकरणात चतुर्थी विभक्ती म्हणून साधारणतः वापरण्यात येतो व त्याचा अर्थ ‘साठी’ असा होतो. उदा. ‘मी त्याला एक शाल आणली’ या वाक्यात ‘ला’ प्रत्यय ‘तो’ चा लाभार्थी हा अर्थ दर्शवतो. पण प्रत्यक्षात ‘तो मुंबईला गेला’ मध्ये ‘ला’- उद्दिष्ट्य (goal) दाखवितो तर ‘मला सापाची भीती वाटते’ या वाक्यात ‘मी’ हा अर्थ-दृष्टीने ‘अनुभव-घेणारा/सोसणारा’ (experience) ठरतो.

५. समरुपी शब्द

समरुपी शब्द आणि विविधार्थी शब्द यातला फरक लक्षात घेणे गरजेचे आहे. विविधार्थी मध्ये एकाच शब्दाचे संदर्भाप्रमाणे अनेक लक्षणार्थ लक्ष्यार्थ होऊ शकतात. समरुपी मध्ये वेगवेगळे अर्थ असणाऱ्या शब्दांचे ध्वनी किंवा लिखित रूप एकच असते. रूप एक पण अर्थ वेगवेगळे. इंग्रजी मधील ‘Bank’ हा शब्द समरुपीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. ‘John went to bank’ या वाक्यात ‘bank’ म्हणजे नदीकिनारा की आर्थिक व्यवहार पाहणारी संस्था अशी अर्थसंदिग्धता निर्माण होऊ शकते. मराठीत ‘मला नाही आवडत तो माठ!’ या वाक्यातील ‘माठ’ म्हणजे मातीचा घडा, पालाभाजी किंवा एखादा बेअक्कल माणूसही असू शकतो. या उदाहरणात ‘माठ’ हा एकच शब्द नसून तीन वेगवेगळ्या अर्थाचे तीन स्वतंत्र शब्द आहेत. पण ते ‘समरूपी’ आहेत. अशा अर्थामध्ये संबंध नसलेल्या पण रुपामध्ये एकरूपता असणाऱ्या समरूपी शब्दांमुळे वाक्यार्थात संदिग्धता येऊ शकते.

संदर्भ:

• Lyons,John ,Semantics  Volume 2, Cambridge University Press, London,1977.

• धोंगडे,रमेश, भाषा आणि भाषाविज्ञान (वैचारिक/समीक्षात्मक), दिलीपराज प्रकाशन,२००६.

Keywords: #Sense relations, #Synonymy, #Antonymy, #Hyponymy, #Polysemy.