धुलिया. भारतातील एक आदिवासी जमात. गुजरात राज्याच्या दक्षिण भागामध्ये (प्रामुख्याने सुरत व बलसाड जिल्ह्यांमध्ये) तसेच दमण-दीव, दाद्रा व नगरहवेली, महाराष्ट्र (ठाणे व पालघर जिल्हा) मध्यप्रदेश, कर्नाटक, राजस्थान या राज्यांमध्येही यांचे वास्तव्य दिसून येते. लोकसंख्या सुमारे ६,९०,००० (२०११).
धोडिया दमण व दीवमध्ये धोडी नावाने ओळखले जातात. धोडियाच्या उत्पत्तीविषयी काही कथा प्रचलित आहेत. महाराष्ट्रातील धुलिया गावावरून हे नाव आले असावे. या गावातील धानसिंग आणि रूपसिंग हे दोन राजपुत्र गुजरातमध्ये गेले. तेथील नायक जमातीच्या सुंदर मुलींशी त्यांचा विवाह झाला व जी नवीन जमात निर्माण झाली, ती धोडिया म्हणून ओळखली जाऊ लागली असे मानले जाते. दुसऱ्या एका कथेनुसार यांचे मूळ ठिकाण नर्मदा नदीच्या दक्षिण काठावरील धोलुका-धंधुका हे असून श्रीकृष्णाच्या वंशातील जाधव राजपूत हे त्यांचे पूर्वज असावेत. द्वारकेमधून ते त्यांच्या गुरा-ढोरांसह इकडे स्थायिक झाले असावेत. सुरुवातीच्या काळात ते ढोरवाला म्हणून ओळखले जात व गुजरातमधील सुरत आणि बलसाड या प्रदेशांत ते विखुरले गेले होते. भरुच, वडोदरा, अहमदाबाद, डांग या जिल्ह्यांतही धोडिया लोक आढळून येतात.
धोडिया ठेंगू, परंतु चपळ व मजबूत असतात. त्यांची वेगवेगळी कुळे असून त्यांचा दर्जा समान असतो. बऱ्याच कुळाचे साधर्म्य किंवा नावे जाधव-रजपूत यांनी ज्यांच्याशी संबंध जोडले, त्यानुसार तसेच देवकांनुसार ठेवली आहेत. उदा., देसरी, नायका, गारसिया, मेहता, जोशी, अहिर, रुपसरी, गायकवाड, सदू बामनिया, केदारीया इत्यादी. या कुळांना स्थानिक भाषेत ‘कुड’ म्हणून संबोधले जाते. प्रत्येक कुळाचा एक प्रमुख असतो. इतर जमातींच्या तुलनेत धोडियांचे समाजातील स्थान उच्च आहे. पारंपरिक वेशभूषेत बायकांच्या पायात गुडघ्यापर्यंत तांभ्या-पितळेचे वाळे असत. जरवाई व जोखाई ही यांची कुलदैवते आहेत. यांशिवाय भरमदेव, हरियादेव, शामलदेव, काकबलियो, मावली इत्यादी देवतांनाही ते भजतात. त्यांच्या उपाध्यायाला नाईक म्हणतात. सुगीच्या काळानंतर कसणारी (ग्रामदेवता) व मावली (कुलदेवता) यांना पहिले धान्य वाहण्याची त्यांची प्रथा आहे. ते धोडिया व भिल्ल या भाषा बोलतात. काही ठिकाणी त्यांच्या भाषेवर गुजराती व मराठी भाषांचाही प्रभाव दिसून येतो. हे लोक पूर्वी बांबूच्या झोपड्यांत राहत असत. तांदूळ व वाल हे त्यांचे मुख्य अन्न होय. यांशिवाय ते दूध, अंडी, मांस, मासळी इत्यादी पदार्थही त्यांच्या आहारात असतात. ते मद्याचे सेवन करतात. त्यांची जातपंचायत असते. गावाचा नाईक हाच सरपंच असतो. त्याचा अधिकार वंशपरंपरेने चालतो. वयात आलेल्या
सर्वांना पंचायतीत बसण्याचा अधिकार असतो. धोडियांमध्ये देवकप्रथा आहे. ‘दिवसो’ हा त्यांचा प्रमुख सण, घीर त्यांचे पारंपरिक लोकनृत्य आहे. प्रमुख सणाच्या दिवशी स्त्री-पुरुष हे नृत्य करतात.
धोडिया जमातीत परंपरेनुसार आते-मामे बहिणींशी विवाह मान्य नाही. मुलीचे लग्न वयाच्या १६ ते २० वर्षे दरम्यान, तर मुलाचे १८ ते २५ च्या दरम्यान करतात. विवाहितेला मूल होत नसेल, तर दुसरे लग्न करण्याची मुभा आहे. त्यांच्यात विधवा पुनर्विवाहालाही मान्यता आहे. मुलीसाठी देज द्यावे लागते. वधू-वराच्या पदराला गाठ मारणे हा लग्नविधी असतो. जातीतील दोन स्त्रीया याचे पौरोहित्य करतात. त्यांना ‘वेर्णो’ म्हणतात. त्यांच्या हातून ‘दोरो’ नावाचा चांदीचा गोप वधूच्या गळ्यात बांधला जातो. यांच्यात घटस्फोट घेतला जातो; मात्र आधी त्यास समाजाची मान्यता असावी लागते आणि जो घटस्फोट घेऊ इच्छितो त्यास दुसऱ्यास रोख भरपाई द्यावी लागते.
या जमातीत मृताचे दहन अथवा दफन केले जाते. प्रेतयात्रा वाजत-गाजत नेण्याची प्रथा आहे. तिसऱ्या दिवशी राखेवर ताडी शिंपडून ती राख गोळा करतात. पंधराव्या दिवशी भगताच्या हस्ते मृताच्या नावाचा एक दगड गावाबाहेर पुरण्याची व त्याची पूजा करण्याची प्रथा आहे. सणाच्या दिवशी मृताप्रित्यर्थ कावळ्यांना अन्नदान करतात.
धोडियांचा मुख्य व्यवसाय शेती आहे; परंतु काहींकडे शेतजमीन कमी असल्याने ते उदरनिर्वाहासाठी अन्य शेतकऱ्यांकडे नोकरी पतकरतात. शेतात मुख्यत्त्वे धान, ज्वारी, बाजरी, गहू इत्यादी पीके घेतात. तसेच काही लोक पावसाळ्यात मासेमारी करून आपला उदरनिर्वाह करतात. यांच्याती काही लोक काम करण्यासाठी आखाती देशांत गेल्याचे दिसून येते. सांप्रत या जमातीत इतर अनेक जातींचे लोंक समाविष्ट झालेले असून अजूनही अन्य जातींच्या माणसांना ते आपल्यात सामावून घेत आहेत. अलिकडच्या काळात हा समाज बहुसंख्य सुशिक्षित झाला असून यांचे राहणीमानही सुधारले आहे. विविध व्यवसाय-उद्योग तसेच शिक्षक, नर्स, डॉक्टर इत्यादी सरकारी नोकऱ्यांमध्येही या जमातीचे लोक कार्यरत आहेत.
समीक्षक : माधव चौंडे; लता छत्रे
https://www.youtube.com/watch?v=ekpuPTq_eOo