चेंचुवार, चेंच्वार. प्रामुख्याने आंध्र प्रदेश राज्यातील नल्लमलईच्या जंगलामध्ये वास्तव्यास असलेली एक आदिवासी जमात. या राज्याशिवाय ओडिशा, कर्नाटक,  तेलंगणा  या राज्यांतही  यांचे वास्तव्य आढळते. आंध्र प्रदेशातील कुर्नूल, गुंतूर, चित्तूर, प्रकाशम या जिल्ह्यांत; तर तेलंगणामधील आदिलाबाद, करीमनगर, नलगोंडा, निझामाबाद, मेहबूबनगर, रंगारेड्डी, वरंगळ इत्यादी जिल्ह्यांमध्ये यांची संख्या जास्त दिसून येते. २०११ च्या जनगणनेनुसार यांची लोकसंख्या ६४,२२७ होती.

पारंपारिक वेशातील चेंचू लोक

चेंचूचा अर्थ ‘झाडाखाली राहणारे’ किंवा ‘उंदीर खाणारे’ असा आहे. या जमातीच्या निर्मितीबाबत प्रामुख्याने एक आख्यायिका प्रचलित आहे. एकेकाळी एक दांपत्य आंध्र प्रदेशातील श्रीशैलम मंदिराजवळ एका झोपडीमध्ये राहत होते. त्यांना संतान नव्हते. एकदा जंगलात शिकार करताना त्यांना मल्लिकार्जून देव भेटले. दांपत्याने त्यांची कहाणी देवाला सांगितली. तुम्हाला होणारे मूल तुम्ही मल्लिकार्जुनाला समर्पित करावे, या अटीवर देवानी त्यांची इच्छा पूर्ण करण्याचे वचन दिले. दांपत्याने अट मान्य केली. यथाकाल त्यांना झालेली मुलगी काही दिवसांनी त्यांनी मल्लिकार्जुनाला समर्पित केली. तीन वर्षांची ती मुलगी आई-वडिलांना सोडून जंगलामध्ये ‘चेत्तू’ या वृक्षाखाली राहत असे. त्यावरून तिचे ‘चेंचीता’ असे नाव पडले. एकेदिवशी तिची मल्लिकार्जुन देवाशी भेट झाली. ती त्यांच्या प्रेमात पडली. पुढे त्या दोघांचा विवाह झाला. त्यांचे वंशज म्हणेजच चेंचू अशी या जमातीची श्रद्धा आहे व पुराणांमध्ये यांचे विशेष स्थान आहे.

चेंचू लोक सडपातळ, मध्यम उंचीचे, रुंद चेहर्‍याचे, राठ व कुरळ्या केसांचे, गव्हाळ किंवा सावळ्या रंगाचे असतात. यांचे डोळे तपकिरी किंवा काळे असतात. बहुतेक पुरुष दाढी-मिशा वाढवितात; पण त्या तुरळक असतात. ते आपल्या केसांची काळजी घेतात. त्यांच्या डोक्याचा आकार थोडा मोठा असतो. भुवया जाड, तर नाक थोडे चपटे असते. पुरुष केस न कापता विंचरून बुचडा बांधतात, तर स्त्रिया मधोमध भांग पाडून अंबाडा घालतात. चेंचू स्त्रियांच्या कपाळावर व डोळ्यांच्या कडेला कानशिलावर गोंदलेले असते. पुरुषाच्या कमरेला झाडाच्या सालीपासून बनविलेला करगोटा (मोलतरु), चिंधीची लंगोटी (गोश बत्ता), पांघरायला सुती कपडा व तेच कधी कधी मुंडासे (रुमाल बत्ता) असा पारंपारिक पेहराव असतो. काहीजण उपरणे (पै बत्ता) वापरतात. झाडाच्या सालीपासून बनविलेल्या कपड्यांना ते ‘गची-बटा’ असे म्हणतात. हल्ली आजूबाजूच्या प्रगत लोकांच्या प्रभावामुळे चेंचूंच्या पेहेरावामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला असून ते सर्वसामान्यांप्रमाणे पेहराव करू लागले आहेत. ज्यामध्ये स्त्रिया लहान लुगडे, साडी व चोळी वापरतात, तर पुरूष धोतर, पायजामा यांचा वापर करतात. चेंचू स्त्रिया जंगलातील गुंजा, कापेपाक नावाच्या तपकिरी बिया, पुल्ली पुसल नावाच्या पांढर्‍या बिया, कलाब (हिरव्या बिया) इत्यादींच्या माळा, तसेच जस्त, तांबे इत्यादी धातूंची पारंपरिक आभूषणे वापरतात. यांशिवाय ते कपाळावर व हाताच्या वरच्या भागावर वेगवेगळ्या चिन्हांचे गोंदण करतात.

चेंचू लोक तेलुगू, आदिवासी, कृष्णा आणि बोन्ता अशा चार गटांमध्ये (कुळम्) विभागले गेले आहेत. तेलुगू आणि कृष्णा हे भिक्षेकरी असून नाच-गाणी करून ते भिक्षा गोळा करतात. चेंचू हिंदू परंपरेचे अनुकरण करतात. त्यामुळे त्यांच्या कुळमांना ते ‘गोत्र’ असेही म्हणतात. १९६१ च्या गणनेनुसार या जमातीमध्ये २६ कुळांचा उल्लेख केलेला आहे. गोत्रातील काही आडनावांची उत्पत्ती गाव, वस्तू, अन्न, वनस्पती किंवा प्राण्यांशी निगडित आहे; तर काही गोत्रांना त्यांच्या उत्पत्तीची माहिती देणार्‍या लोककथा आहेत. बालामुरी, मार्रेपाल्ले, अराती, तोटा, एरावाला, मामीडी मंडला, जोल्ला, निम्माला पित्तोलू, गुर्राम, माकाला, इंडिया, गुंडाम, थोकाला, भूमानी, चीगुरला, सावाराम, अवलावार्न, जुलामुत्तादू, कण्याबायनोडू, कुडूमुडुवादू, मानुलावरू, मारीपल्ली पाडी, म्याकाआलावारू, नालाबोटावार्न, वोरेगालिंगू, गोगुलवार्न ही त्यांची गोत्रे आहेत. चेंचू पितृप्रधान आहेत. एकाच वंशावर आधारित गटाला ते ‘कुटुंबम्’ म्हणतात. विभक्त कुटुंबाला ‘चिना कुटुंबम्’, तर विस्तारित (एकत्र) कुटुंबाला ‘पेड्डा’ म्हणतात. जमातीतील नातेसंबंध वर्गीकरण केलेले व उभयपक्षी आहेत.

चेंचूना स्वत:ची अशी स्वतंत्र बोलीभाषा नाही. ते त्यांच्या भौगोलिक स्थानानुसार तेलुगू भाषेच्या वेगवेगळ्या बोली बोलतात. त्यांच्या भाषेच्या चेंचुकुलम्, चेंच्वार, चेंस्वार किंवा चोन्चारु असेही म्हणतात. हे लोक उत्तम शिकारी असून झाडांवर शिताफीने चढणे, धनुष्यबाण व चाकू इत्यादी साधनांनी शिकार करणे यांत तरबेज आहेत. या जमातीचा आहार अत्यंत साधा असतो. पूर्वी जंगलातून मिळणारा मध, कंदमुळे, फळे प्राण्यांचे मांस हे त्यांचे प्रमुख अन्न असे. अलिकडच्या काळात मात्र ज्वारी किंवा मका यांची कण्हेरी (पेज), शिजवलेले किंवा भाजलेले कंद, तसेच त्यांचा संपर्क इतर समाजाशी आल्यामुळे इतर सर्व शाकाहारी व मांसाहारी अन्नाचा समावेश त्यांच्या आहारात दिसून येतो. हे लोक चिंचेच्या राखेमध्ये चिंच मिसळून खातात. गरोदर स्त्रियांना त्याचा चांगला उपयोग होतो, असे ते म्हणतात.

चेंचूच्या जीवनक्रमामध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रमुख सहा संस्कार दिसून येतात. बाळाच्या जन्मानंतर नवव्या दिवशी ‘निलाकिलाडीयादम’ विधी, तर ३ महिन्यांनी नामकरण (टोटेला) विधी केला जातो. १ ते ३ वर्षांपर्यंत जावळ (पुटेनटुकालू) काढले जाते. वयाची १२ ते १४ वर्षे तारुण्यावस्थेतील काळाला ते ‘पेद्दामाशी कवादम्’, एडीजीनाडी  किंवा पडुचू समुरथयनाडी म्हणतात. जीवनचक्रातील प्रत्येक महत्त्वाच्या विधीमध्ये हे लोक एखाद्या प्राण्याचा बळी देतात. चेंचू विवाह बंधनाला पेल्ली असे म्हणतात. मुले वयात आल्यावर त्यांचे विवाह करतात. विवाह संबंध जमातीतील प्रमुखांच्या संमतीने रीतसर बोलणी करून ठरविला जातो. यामध्ये जोडप्यांच्या पसंतीस प्राधान्य असते. विवाह विधी पारंपरिक पद्धतीने नवर्‍या मुलीकडे पार पडतो. वधूमूल्य म्हणून मोराचे पीस व १०० रु. देतात. आता याचे स्वरूप बदलत असून काही ठिकाणी वधूमूल्याची रक्कम वाढून घेतल्याचे दिसून येते. विवाह विधीमध्ये उत्तलुरी कुळाचे प्रमुख धर्मोपदेशक किंवा ‘कुलराजू’ म्हणून असणे अत्यंत महत्त्वाचे असते. या जमातीत एकपत्नित्व प्रचलित असून जमातीबाहेर लग्न, सगोत्र अथवा एका गावातील विवाहाला मान्यता नाही. नवीन जोडपे स्वत:चे घर बांधून राहतात. चेंचूंमध्ये पेद्दामनशी ही मानाची व्यक्ती असते. धर्मकृत्ये, भांडण सोडविणे अथवा मर्तिक विधी यांमध्ये पेद्दामंचीची भूमिका प्रमुख असून त्याचा आदेश मानला जातो. ज्या स्त्रीला नवरा आवडत नाही, ती घटस्फोट घेऊ शकते. घटस्फोट अथवा विधवाविवाहाला समाज मान्यता आहे. चेंचू स्त्रिया बहुप्रसव असतात. विवाहपूर्व लैंगिक संबंधांना मान्यता असते; मात्र आता काही ठिकाणी यास आई-वडीलांकडून विरोध असल्याचे दिसून येते.

चेंचू  ‘भागाबान तारू’ (भगवंतरू-ईश्वर) देवाला मानतात. हा देव आकाशात राहतो व चेंचूंच्या सर्व कामांवर लक्ष ठेवतो, असे ते मानतात. ते गरेलमैसम्मा या देवीची पूजा करतात. तिला शिकारीची व वनदेवता मानतात. ती चेंचूंना जंगलातील संकटांपासून वाचवते, अशी त्यांची श्रद्धा आहे. यांशिवाय शिव, पोतसम्मा (पोस्तम्मा), गंगामा, लिंगमय्या, मयासम्मा (मैसम्मा) इत्यादी देवतांनाही ते पूजतात. पोतसम्मा ही कांजिण्यांसारख्या आजारांपासून, तर मायसम्मा शत्रूपासून रक्षण करते, अशी त्यांची श्रद्धा आहे. गंगामा ही पाण्याची देवता आहे. चेंचू दिपावली, शिवरात्री, उगाडी इत्यादी सण साजरे करतात. कुलदेवाची पूजा श्रावण महिन्यात केली जाते.

चेंचू जमातीत मृत्यूला ‘दिनूला’ म्हणतात. ते मृताचे दफन किंवा दहन करतात. मृताच्या तिसर्‍या दिवशी शिजवलेले अन्न थडग्यावर ठेवतात. या विधीला चिन्न दिनाल (चिन्न दिनामू) म्हणतात. मोठे श्राद्ध (पेद्दा दिनाल किंवा पेद्या दिनामू) अकराव्या किंवा शंभराव्या दिवशी करतात. या वेळी गावजेवण असल्याने खर्चाचे दृष्टीने सवडीप्रमाणे करतात.

चेंचू जमातीची घरे

पूर्वी चेंचू जंगलामध्ये भटकंती करत आणि झाडाखाली किंवा खडकांच्या कपारींमध्ये राहत असत. आधुनिक काळात मात्र ते गावामध्ये वस्ती करून राहतात. त्यांच्या वस्तीला पेंटा म्हणतात. पेंट्यामध्ये नातेसंबंधानुसार झोपड्या जवळपास किंवा एकमेकींपासून काही अंतरावर असतात. ही घरे विखुरलेली असून शिस्तबद्ध पद्धतीने मधमाशीच्या पोळ्याच्या आकाराची बांधलेली असतात. तात्पुरत्या कामासाठी वापरली जाणारी घरे गवताने किंवा झाडाच्या फांद्या वापरून कच्ची बनवली जातात; तर पक्की घरे बहुतेक बांबूने किंवा कुंपणाच्या तट्ट्यांचा कचरा वापरून बनविलेल्या भिंतींची, शंकूच्या आकाराच्या छपाराची असतात. पूर्वी हे लोक जंगलामध्ये फळे, कंदमुळे, मध, मांस यांवर उदरनिर्वाह करीत; मात्र अलिकडच्या काळात हे पदार्थ तसेच मोहाच्या फुलांपासून दारू, तेंदूच्या पानांच्या पत्रावळी, द्रोण, तंबाखूच्या पानांपासून विड्या इत्यादी वस्तू बनवून त्यांची बाजारात विक्री करून ते आपला उदरनिर्वाह चालवतात. ते स्त्री-पुरुषांत कामाची विभागणी करतात. मध गोळा करणे, टोपल्या बनविणे इत्यादी कामे पुरुष करतात, तर स्त्रिया स्वयंपाक व घरकामे करतात. आज आंध्र सरकारकडून चेंचू जमातीतील लोकांना शेती कसण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे. त्यामुळे काही चेंचू शेती करीत असून शेतीमध्ये तंबाखू, बाजरी, ज्वारी, मका इत्यादी पिके घेतात. धान्यसामग्री गोळा करण्याचे काम दोघे मिळून करतात.

सध्या काही चेंचू गावांमध्ये आणि लहान शहरांमध्येसुद्धा वस्ती करून राहत आहेत. ते इतर समाजाच्या संपर्कात आल्यामुळे त्यांच्यातील काही लोक आपल्या मुलांना शिक्षणासाठी सरकारी शाळांमध्ये पाठवीत आहेत. तसेच या जमातीची आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक व इतर प्रगती व्हावी यासाठी आंध्र प्रदेशातील अनेक एजीओ प्रयत्न करीत आहेत.

संदर्भ :

  • P. Dash Sharma, Anthropology of Primitive Tribes in India, 2006.
  • P. K. Mohanty, Encyclopedia of primitive tribe in India, vol. 2, Delhi, 2004.

समीक्षक : माधव चौंडे; लता छत्रे