जहालमतवाद : जहालमतवाद म्हणजे मौलिक विचारप्रणालीवर आधारलेली नैतिक वा सामाजिक जीवनाची आधुनिक उपपत्ती. प्रस्थापित समाजव्यवस्था, माणसामाणसांचे संबंध, एकंदर जगाचे भवितव्य यांचे सर्वांगीण पृथक्करण व विवेचन करून नीतितत्त्वांची बौद्धिक उपपत्ती व संपूर्ण जीवनाला स्पर्श करणारी नव्या व्यवस्थेची, नव्या जगाची संकल्पना जहालमतवादात मांडलेली असते. जहालमतवादाचा उगम परंपरेवर आधारलेल्या नैतिक, सामाजिक वा राजकीय जीवनाबद्दल व संस्थांबद्दल असंतोष वा अविश्वास किंवा बौद्धिक असमाधान यांतून झाला आहे. सामाजिक वस्तुस्थितीच्या मौलिक समीक्षेतून जहालमतवादी उपपत्ती निघाली आहे.

एक कल्पनाचित्र

सतराव्या शतकातील बौद्धिक जागृतीने जहालमतवादाला चालना मिळाली. जहालमतवादी दृष्टिकोन हा सारखा बदलत जातो, विकास पावतो कारण जीवनाच्या व जगाच्या मौलिक समीक्षेला नवी नवी आव्हाने सारखी लाभतच असतात. आनुवंशिक राजेशाहीवरील हल्ला हा राजकीय जहालमतवादाचा पहिला आविष्कार होय. हा जहालमतवाद मुख्यतः यूरोपमध्ये अठराव्या शतकापासूनच अस्तित्वात आला. पाश्चात्त्य समाजात राज्य करण्याची बुद्धिमत्ता, हक्क व सत्ता ही फक्त काही मूठभर शिष्टजनांकडेच असू शकतात, असा समज होतो. जहालमतवादाने त्यांवर प्रखर हल्ला चढविला व व्यक्तिस्वातंत्र्य आणि जनतेचे सार्वभौमत्व ही तत्त्वे पुरस्कृत केली. लोकतांत्रिक जहालमतवादाचे वैशिष्ट्य हे की, त्याने मतपरिवर्तनाच्या मार्गावरच विश्वास ठेवला तसेच बुद्धीचे व तर्काचे शस्त्र वापरले.

फ्रेंच व अमेरिकन राज्यक्रांत्यांतही आधुनिक जहालमतवादाचा प्रभावी आविष्कार झाला. अर्थात त्या क्रांत्यांत सर्व प्रचलित जहालमतवादी प्रवृत्तींचा आविष्कार झालेला नव्हता तरी पण जॅकोबिनमध्ये प्रबोधनकाळातील आदर्शांना मूर्त स्वरूप देण्याचा प्रत्यक्ष प्रयत्न झाला. त्यांच्या संघटनातंत्राचा जहालमतवादाच्या प्रसारासाठी परिणामकारक उपयोग झाला. लोकानुवर्तित्व (पॉप्युलिझम) हा आणखी एक जहालमतवादाचा प्रकार होय. त्याची विविध स्वरूपे निरनिराळ्या देशांत प्रगट झाली. अमेरिकेत जेफर्सनच्या लोकशाही आदर्शात या प्रवृत्तीचा उगम शोधता येईल. लोकानुवर्तित्वाच्या भिन्नभिन्न आविष्कारांत काही सर्वसामान्य सूत्रे होती : निसर्गाच्या सान्निध्यात राहणाऱ्या माणसांचे हक्क तसेच माणसाच्या निर्माणशक्तीवर दृढ विश्वास आणि त्याची स्वाभाविक प्रतिक्रिया म्हणून मोठ्या केंद्रसत्तेला तसेच धंदेवाईक राजकीय प्रशासकांना विरोध, ही या जहालमतवादाची वैशिष्ट्ये होत.

इंग्लंडमधील सैद्धांतिक जहालमतवाद्यांत बेंथॅमची गणना प्रामुख्याने करावी लागेल. तात्त्विक जहालमतवाद (मौलिकतावाद) मांडणारा पहिला विचारवंत बेंथॅम होय. मानवी अनुभवावर आधारलेले तत्त्वज्ञान, मानवी सुखदुःखांच्या हिशेबावर आधारलेले नीतिशास्त्र व शासनाची उपयुक्ततेच्या सिद्धांतांनुसार पुनर्रचना, या मौलिक दृष्टिकोनांची मांडणी बेंथॅमने केली. त्याला नवी विवेकनिष्ठ अशी समाजव्यवस्था अभिप्रेत होती. मात्र अशी समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी डावपेच म्हणूनसुद्धा हिंसेचा उपयोग त्याला मान्य नव्हता.

जहालमतवादाचा अत्यंत प्रखर आणि अत्यंत पद्धतशीर आविष्कार अराज्यवादात आढळून येतो. अराज्यवादाचे विवेचन प्रथम विल्यम गॉडविन याने केले. माणसाला बुद्धीनुसार आचरण करण्याची सक्ती अनावश्यक ठरते, तर बुद्धीनुसार न वागण्याची सक्ती करणे अन्यायाचे असते, हे गॉडविन याचे एक प्रमुख सूत्र होते. या सूत्राच्या आधारावर समाजातील सर्व संस्था बरखास्त कराव्यात, असे त्याने आवाहन केले. प्रूदाँने अराज्यवादाला आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम दिला. खाजगी मालमत्ता हे अपहरण आहे, असे प्रूदाँचे तत्त्व होते. त्याच्या मते, समाज एक नैसर्गिक सजीव घटक असून मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. शासनसंस्था व प्रचलित आर्थिक व्यवस्था नष्ट केली पाहिजे. स्वतंत्र संस्था व विकेंद्रित आणि नियंत्रित शासन कसे निर्माण होईल, याच्या अनेक योजना त्याने आखल्या होत्या. क्रपॉटक्यिन या अराज्यवादाच्या दुसऱ्या भाष्यकाराने डार्विनच्या उत्क्रांतिवादावर कडाडून हल्ला केला. जो पात्र असेल तो जगेल, हा निसर्गाचा कायदा नसून पात्र नसलेले जीवसुद्धा निसर्ग संभाळतो. आदिम समाजातच नव्हे, तर प्राणिसृष्टीतही परस्परसहकार्य व मदतीचे नाते असते, अशी क्रपॉटक्यिनची भूमिका होती. श्रमविभागणी अथवा आर्थिक चलन यांवर अधिष्ठित नसलेली पण कम्यूनवर आधारलेली अर्थव्यवस्था व संपूर्ण कम्युनिष्ट समाजाची निर्मिती, हा त्याचा आदर्श होता. जॉर्ज सॉरेल या अराज्यवादी सैद्धांतिकाच्या विचारांत माणसाचा चांगुलपणा अथवा व्यक्तिस्वातंत्र्य याला विशेष महत्त्व दिलेले नाही. त्याच्या रिप्लेक्शन्स ऑन व्हायोलन्स  या ग्रंथात कामगारवर्गाला भांडवलशाही सत्ता अशी उलथून पाडता येईल, याचे विवेचन केले आहे. सार्वत्रिक संप हे तो प्रमुख हत्यार मानतो. प्रस्थापित कामगार संघटनांचा क्रांतीसाठी उपयोग करण्याचे त्याचे तंत्र होते. त्यातूनच अराज्यवादी संघसत्तावाद जन्माला आला.

एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या काळापर्यंत जहालमतवादात बरीच एकवाक्यता होती; परंतु एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापासून त्यात उजवा व डावा असा फरक झाला. उजवा जहालमतवाद हा प्रस्थापित राष्ट्रसत्तांनाच अधिक शक्तिशाली करण्याच्या प्रवृत्तीतून निर्माण झाला. विशिष्ट राष्ट्रवंशाला ऐतिहासिक कार्य असते, ही श्रद्धा उजव्या जहालमतवादात आधारभूत आहे. वांशिक एकरूपता व प्रादेशिक सार्वभौमत्व यांचा परस्परसंबंध एकोणिसाव्या शतकात सर्वमान्य झाला होता व त्यांच्या आधारावर पहिल्या महायुद्धानंतर व्हर्सायच्या तहानुसार यूरोपचे राजकीय विभाजन करण्यात आले. पहिल्या महायुद्धानंतरच्या पहिल्या दोन दशकांत अतिरेकी राष्ट्रवादाचे अत्यंत जहाल स्वरूप इटली-जर्मनी-जपानमधील सर्वंकष हुकूमशाहीत प्रगट झाले. या हुकूमशाह्यांचे सैद्धांतिक अधिष्ठान थोड्याफार फरकाने सारखेच होते. वंश अथवा सांस्कृतिक वारसा वा दोन्हींवर आलटून पालटून भर दिला जाई. अतिरिक्त देशभक्ती, स्वतःच्या वांशिक गटाच्या सर्वश्रेष्ठतेचा अहंकार आणि युयुत्सू साम्राज्यवाद ही या तीनही हुकूमशाहींची वैशिष्ट्ये होती. हिटलरचा नाझीवाद आणि मुसोलिनीचा फॅसिझम हे दोन्ही व्यक्तिस्वातंत्र्याचे कट्टर वैरी होते. व्यक्ती म्हणजे केवळ प्रजा. स्वतंत्र माणसे म्हणून त्यांना फॅसिस्ट समाजात स्थान नव्हते. प्रजातांत्रिक जहालमतवाद आणि अराज्यवाद यांनी पुरस्कारिलेली स्वातंत्र्याची सर्व मूल्ये फॅसिझममध्ये झिडकारण्यात आली. समानता व शांतता ही फॅसिझमला अमान्य होती. वंशश्रेष्ठत्वासाठी सर्व माणसांच्या समानतेचा धिक्कार करणे व या श्रेष्ठ वंशाची सत्ता सर्वत्र प्रस्थापित करण्यासाठी शांततेच्या ऐवजी युद्धाचाच गौरव करणे, हे नाझीवाद व फॅसिझम यांमधील सूत्र होते. स्त्रियांना बाळंतपणाची तशी पुरुषांना युद्धाची गरज असते, असे मुसोलिनी म्हणत असे. दुसऱ्या महायुद्धात या तीनही हुकूमशाहांचा संपूर्ण नाश झाला, तरी त्यांचे तत्त्वज्ञान मानणारी काही राष्ट्रे आहेत.

उजवा जहालमतवाद हा प्रस्थापित राजकीय सत्तेशी एकरूप झालेला आणि त्याचा समर्थक बनल्यामुळे यापुढे जहालमतवाद, म्हणजे डावा जहालमतवाद, असे समीकरण रूढ झाले. डावा जहालमतवाद हाही एकसूत्री अथवा एकजिनसी राहिलेला नसून त्याच्यात अनेक प्रवृत्ती निर्माण झाल्या आहेत. त्यांचे साधारणपणे तीन गट करता येतील : (१) अराज्यवादी, (२) मार्क्सवादी-लेनिनवादी (माओवादी, ट्रॉट्स्कीवादी यांचा समावेश या गटात होईल), (३) मार्क्सवाद न मानणारे जहालसमाजवादी, अतिजहाल अराज्यवादी. हे सर्वसामान्य राजकीय प्रक्रियेपासून अलिप्तच राहिले आहेत. स्पेनच्या यादवीत अराज्यवाद्यांनी जहाल आघाडीत सामील होऊन फ्रँकोच्या आक्रमणाला तोंड दिले. फ्रान्समध्ये झालेल्या १९६८ च्या विद्यार्थिक्रांतीतही अराज्यवादी गटाने कामगिरी केली. यूरोपीय देशांत ठिकठिकाणी अराज्यवादी गटांचा प्रभाव आढळून येतो.

मार्क्सवादी साम्यवाद्यांनी एक प्रबळ अशी आंतरराष्ट्रीय संघटना उभारली होती. त्यांना पहिल्या महायुद्धानंतर रशियन क्रांतीत मोठे यश मिळाले व रशियात मार्क्सवादी सत्ता स्थापन झाली. मार्क्सवादाला अभिप्रेत असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रांतीला प्रथम एका राष्ट्रसत्तेचा आधार मिळाला; परंतु साम्यवादी आंतरराष्ट्रीय संघटनेची एकता फार टिकली नाही. स्टालिन व ट्रॉट्स्की यांच्या मतभेदामुळे ट्रॉट्स्कीला रशियातून हद्दपार करण्यात आल्यानंतर त्याने वेगळी आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन केली. ती अद्याप कार्य करीत आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर एकीकडे पूर्व यूरोपमध्ये सर्वत्र साम्यवादी सत्ता अस्तित्वात आली. चीन, व्हिएटनाम, उ. कोरिया येथेही यशस्वी क्रांत्या होऊन साम्यवाद  प्रस्थापित झाला; परंतु त्याचबरोबर साम्यवादी आंदोलनात नवीन फूट पडली. यूगोस्लाव्हिया, चीन यांनी रशियन नेतृत्व झुगारून दिले. पश्चिम यूरोपमध्ये इटली, फ्रान्स, पोर्तुगाल व स्पेन या देशांतील साम्यवाद्यांनी कामगारांच्या हुकूमशाहीच्या मार्क्सवादी सिद्धांताचा व रशियाच्या आंतरराष्ट्रीय नेतृत्वाचा धिक्कार केला. फ्रान्समधील नवीन जहाजमतवाद्यांनी एकूण मार्क्सवाद व रशिया-चीनचे प्रतिमान झुगारून दिले आहे. हे नवीन डावे गट व्यक्तिस्वातंत्र्याचे मूल्य महत्त्वाचे मानतात. आर्थिक विकेंद्रीकरण व प्रत्यक्ष लोकशाही यांचा ते पुरस्कार करतात. त्यांना राजकीय, आर्थिक व शैक्षणिक अशी सर्वांगीण पुनर्घटना अभिप्रेत आहे.

जहालमतवादाची दुसरी धारा उत्क्रांतिवादी समाजवादाची किंवा लोकशाही समाजवादाची आहे. ब्रिटन, प. जर्मनी, स्कँडिनेव्हियन देश यांमध्ये लोकशाही समाजवादी मधूनमधून सत्तेवर येतात. राजकीय आणि आर्थिक सत्तेच्या केंद्रीकरणामुळे अखेर हुकूमशाही निर्माण होते म्हणून ते संमिश्र अर्थव्यवस्था व लोकशाहीच पसंत करतात. साम्यवादी व लोकशाही समाजवादी यांच्यात लेनिनच्या काळपासूनच तीव्र संघर्ष निर्माण झाला होता. रशियन नेतृत्व व कामगारांची हुकूमशाही या दोन्हींचा साम्यवाद्यांनी त्याग केला असला, तरी ते बहुपक्षीय लोकशाही व व्यक्तिस्वातंत्र्य, वृत्तपत्रस्वातंत्र्य, न्यायालयाचे स्वातंत्र्य हे प्रामाणिकपणे सुरक्षित ठेवतील की नाही याबद्दल विश्वास नसल्यामुळे, त्यांच्याशी सहकार्य वा एकजूट करण्यास लोकशाही समाजवादी तयार नसतात, असे पुष्कळदा दिसून येते.

दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात जहालमतवादाचा प्रसार आशिया, आफ्रिका व लॅटिन अमेरिका यांतही झाला. विशेषतः, यूरोपीय वसाहतवादाच्या गुलामगिरीतून मुक्त झालेल्या देशांत जहालमतवादाचा विशेष प्रभाव आढळून येतो. त्यात राष्ट्रवाद आणि लोकशाही समाजवाद किंवा हुकूमशाही मानणारा साम्यवाद अशा दोन्ही प्रवृत्ती आढळून येतात. आशियातील साम्यवाद्यांतही (चीन, उ. कोरिया, व्हिएटनाम) स्वतंत्रपणे साम्यवादी समाजाची उभारणी करणे व रशिया-चीन संघर्षात तटस्थ राहणे, असा या धोरणाचा प्रभाव  आढळतो. लॅटिन अमेरिकेत, क्यूबात कास्ट्रोने यशस्वी क्रांती केल्यानंतर त्याच्या गनिमी युद्धतंत्राचा व त्या तंत्राचा श्रेष्ठ प्रतिनिधी म्हणून चे गेव्हारा याचा जगभर लौकिक झाला. विशेषतः यूरोपीय तरुणांत तो अतिशय लोकप्रिय झाला व त्याच्या नावाने युवक-गट अस्तित्वात आले. या गनिमी युद्धतंत्राच्या प्रभावातून आता शहरी गनिमांचाही पंथ पश्चिम यूरोपमधील काही देशांत उदयास आला आहे. अति-जहालमतवादाचा हा अत्यंत नवीन आविष्कार होय.

अशा रीतीने जगाच्या सर्व भागांत निरनिराळ्या स्वरूपाचा, निरनिराळ्या वैचारिक प्रणाली व क्रांतितंत्रे मानणारा जहालमतवाद अस्तित्वात आहे. मानवी समाजाचे नियमन बुद्धीच्या-तर्काच्या आधाराने व्हावे, बळाने होऊ नये, मनुष्य संघटनेचा गुलाम बनू नये, त्याचे स्वातंत्र्य जास्तीत जास्त विकसित व्हावे, त्याला विकासाची जास्तीत जास्त संधी मिळावी, राज्य बुद्धीचे असावे, शक्तीचे असू नये, असा जहालमतवादाचा मूळचा ध्येयवाद होता. या ध्येवादासाठी जहालमतवाद्यांनी निष्ठापूर्वक परिश्रम केले; परंतु ठिकठिकाणी त्यांनीच ज्या सत्ता अस्तित्वात आणल्या, त्या सत्ताच या ध्येयवादाशी विसंगत व विरोधी स्वरूप दाखवू लागल्या व त्यामुळे जहालमतवाद्यांतच असंतोष निर्माण झाला. स्वातंत्र्य, समता, सर्व जनतेचे कल्याण या उद्देशांसाठी स्थापन केलेल्या संस्था अमानुष अन्यायाचे साधन बनल्या व त्यांच्यावर कठोर टीका करण्याचे काम जहालमतवाद्यांना करावे लागले. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात जहालमतवाद प्रस्थापित व्यवस्थेला अनेक प्रकाराची आव्हाने देत आला आहे, त्याचप्रमाणे जहालमतवादालाही अनेक प्रकारच्या आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. माणसाचे दूरीभवन म्हणजे स्वतःच्या नैसर्गिक वृत्ती व व्यवस्था यांपासून दुरावणे, ही संज्ञा आता पुनःपुन्हा उच्चारली जात आहे. विशेषतः औद्योगिक व विकसित समाजात ही एक गंभीर समस्या होऊन जाते. जहालमतवादापुढे हे नवे आव्हान खडे आहे.

संदर्भ :

• Gombin, Richard, The Origins of Modern Leftism, 1975.

• Halevy, Elie (Trans.), Morris, Mary, The Growth of Philosophic Radicalism, London, 1972.

• Horowitz, I. L., Radicalism and the Revolt Against Reason, London, 1961.