राजकीय विचार : राजकीय विचार ही एक राज्यशास्त्रातील उप विद्याशाखा आहे. राजकीय विचार निश्चित करण्याच्या  दोन कसोट्या आहेत. दोन कसोट्यावर आधारित निवड केली जाते. १) राजकीय तत्त्वज्ञानात ज्या विचारवंतांनी मोलाची भर घातली त्यांचा समावेश राजकीय विचारांमध्ये केला जातो. २) ज्यांच्या विचारांचा राजकीय जीवनावर प्रभाव पडलेला आहे. अशा विचारवंतांच्या विचारांचा समावेश राजकीय विचारांमध्ये केला जातो. अशा दोन्ही प्रकारच्या विचारवंतांचा अभ्यास करणारी राजकीय तत्त्वज्ञानाची ही एक शाखा आहे.

राजकीय विचार ही उप विद्याशाखा सातत्याने विस्तारत गेलेली आहे. आरंभी पाश्चिमात्य राजकीय विचार केंद्रित ही शाखा होती ; परंतु नंतर या शाखेची व्याप्ती वाढत गेली. राजकीय विचारांची व्याप्ती तीन क्षेत्रांशी संबंधित आहे. १) राजकीय विचारांचा इतिहास हे एक महत्त्वाचे क्षेत्र आहे. राजकीय विचारांचा इतिहास प्राचीन राजकीय विचार, मध्ययुगीन राजकीय विचार, आधुनिक राजकीय विचार, समकालीन राजकीय विचार अशा पध्दतीने विभागला आहे. २) राजकीय तत्त्वज्ञानाचा अभ्यास राजकीय विचारांमध्ये केला जातो. त्यामुळे राजकीय विचारांच्या व्याप्तीचा हा एक भाग आहे. ३) राजकीय विचारप्रणालीचा राजकीय विचारांच्या संदर्भात अभ्यास केला जातो. राजकीय विचारांच्या अभ्यासाची ही तीन मोठे क्षेत्र आहेत.

पाश्चिमात्य राजकीय विचार ही एक प्रस्थापित शाखा आहे. सॉक्रेटिस, प्लेटो, ऍरिस्टॉटल यांचा समावेश विशेष करून पश्चिमात्य राजकीय विचारांमध्ये केला जातो. पाश्चात्य राजकीय विचारांच्या ग्रीक राजकीय विचार व रोमन राजकीय विचार अशा दोन परंपरा आहेत. पाश्चिमात्य राजकीय विचार वगळता प्राचीन भारतीय राजकीय विचार ही दुसरी जगातील एक महत्त्वाची राजकीय विचारांची शाखा आहे. कौटिल्य यांचे अर्थशास्त्र विषयक विचारांचा यामध्ये समावेश केला जातो. चिनी राजकीय विचार आणि मुस्लिम राजकीय विचार यांच्यापेक्षा प्राचीन भारतीय राजकीय विचार हा जास्त महत्त्वाचा आहे. मध्ययुगीन राजकीय विचार ही देखील राजकीय विचारांमधील एक महत्वाची विद्याशाखा आहे. आधुनिक राजकीय विचार ही आधुनिक काळात उदयाला आलेले महत्वाचे राजकीय विचारांची शाखा आहे. आधुनिक काळातील आरंभीचे विचारवंत निकलो मकियाव्हेली होते. त्यांनी राज्यसंस्था सार्वभौमत्व, लोकशाही, घटनावाद असे आधुनिक विचार मांडले. त्यानंतर या परंपरेमध्ये सामाजिक करारवादी विचारवंतांचा समावेश केला जातो. मार्क्स व मार्क्सवादी राजकीय विचार, युरोपियन राजकीय विचार, अमेरिकन राजकीय विचार, समकालीन राजकीय विचार, आफ्रिकन राजकीय विचार, आधुनिक भारतीय राजकीय विचार इत्यादींचा समावेश केला जातो.

राजकीय विचारांचा अभ्यास दोन प्रकारे केला जात होता. परंतु १९९० नंतर हा अभ्यास विविध पद्धतीने केला जातो. १) महत्त्वाच्या विचारवंतांचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ प्लेटो, ऍरिस्टॉटल, कार्ल मार्क्स, महात्मा गांधी, इत्यादी. २) राजकीय विचारप्रणालीचा अभ्यास राजकिय विचारवंतांच्या संदर्भात केला जातो. तसेच राजकीय संकल्पनांच्या संदर्भात देखील राजकीय विचारवंतांचा अभ्यास केला जातो. यामुळे राजकीय विचारप्रणाली आणि राजकीय संकल्पनांचा विकास हा राजकीय विचारांचा अभ्यासाचा एक भाग आहे. उदाहरणार्थ उदारमतवाद, मार्क्सवाद, समाजवाद, रूढीवाद  इत्यादी. राजकीय विचारात विचारवंतांच्या विचारावर विशेष लक्ष केंद्रित केले जाते. यामुळे अभ्यासाची स्कूल्स उदयाला आले आहेत. उदाहरणार्थ फॉकफ्रुट स्कूल इत्यादी.

३) राजकीय विचारांचा अभ्यास प्रादेशिक आणि देशांच्या संदर्भात केला जातो. उदाहरणार्थ अमेरिकन राजकीय विचार, आफ्रिकन राजकीय विचार, ऑस्ट्रेलियन राजकीय विचार, चायना राजकीय विचार, भारतीय राजकीय विचार, इस्लामी राजकीय विचार, जपानचा राजकीय विचार इत्यादी.  राजकीय विचारांचा अभ्यास प्रकरण आधारित केला जातो. उदाहरणार्थ सकारात्मक कृती, प्राण्यांच्या हक्क युरोपियन ऐक्य, स्त्रीवाद, मानवतावादी हस्तक्षेप आणि  आंतरराष्ट्रीय कायदा, वंश आणि वंशवाद इत्यादी.

४) अत्यंत महत्त्वाचे क्षेत्र निश्चित करून त्या क्षेत्राच्या संदर्भात राजकीय विचारांचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ आर्थिक मानसशास्त्रीय कायदा आणि धर्म इत्यादी. परंतु तात्विक समस्यांचा अभ्यास केला जात नाही. या सौक्ष्मिक अर्थाने  राजकीय तत्त्वज्ञानापासून राजकीय विचार ही विद्याशाखा वेगळी आहे असेही दिसते. परंतु साकलिक अर्थाने ही विद्याशाखा राजकीय तत्त्वज्ञानापासून वेगळी केली जात नाही. तसेच राजकीय विचारांमधून अनुभवनिष्ठ सिद्धांत आणि राजकीय विश्लेषण वगळले जाते. यामुळे राजकीय विचार ही विद्याशाखा सिद्धांत आणि विश्लेषण यापेक्षा वेगळी ठरते.

संदर्भ : पवार, प्रकाश, समकालीन राज्यशास्त्र  – राज्यशास्त्राच्या उपविद्याशाखा आणि अभ्यासपद्धती, डायमंड प्रकाशन, पुणे, २०१२.