ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलातील नव्वदावे सूक्त. विश्वपुरुष व त्याच्यापासून निर्माण झालेली सृष्टी यांचे वर्णन करणारे हे सूक्त असून त्यात सोळा ऋचा आहेत. सूक्ताचा नारायण हाच ऋषी म्हणजे द्रष्टा व देवता पुरुष (परमेश्वर) आहे. हे मुख्यत्वे अनुष्टुप् छंदामध्ये असून यांच्या शेवटच्या मंत्रात मात्र त्रिष्टुप् छंद वापरलेला आहे. षोडशोपचार पूजा करताना पुरुषसूक्तातील एकेक ऋचा म्हणून एकेक उपचार अर्पण केला जातो. महाग्निचयनामध्ये अग्नीच्या उपस्थानासाठी तसेच विष्णुयागातही पुरुषसूक्ताचा विनियोग (वापर) सांगितला आहे. याशिवाय पूजा, आरत्यांनंतर म्हटल्या जाणार्या मंत्रपुष्पांजलीतही पुरुषसूक्तातील सोळाव्या मंत्राचा विनियोग केला जातो.
ऋषी म्हणतात, विराट अशा ह्या पुरुषाला हजारो डोळे आणि हजारो पाय आहेत. तो पृथ्वीला सर्वस्वी व्यापून आणि दहा बोटे वर उरलाच आहे. हे जग म्हणजे हा विराट आदिपुरुषच आहे. तो अमृतत्त्वाचा स्वामी आहे. निव्वळ लीला म्हणून तो प्राणिमात्रांना निमित्तभूत असणार्या अन्नाद्वारे या जगात प्रकट झाला आहे. विश्वापेक्षा तो कितीतरी मोठा आहे. जग त्याचा केवळ एक चतुर्थांश भाग आहे. द्युलोकात (आकाशात) तेजोरूपाने राहिलेल्या या आदिपुरुषाचा केवळ एक अंश उत्पत्ती, स्थिती, आणि लय अशा प्रकारे या विश्वात पुनः पुन्हा आविर्भूत होतो. त्याच आदिपुरुषापासून विराट व त्यापासून एक पुरुष उत्पन्न झाला.
देवतांनी नंतर या पुरुषाच्या स्वरूपाचाच हविर्भाग (यज्ञात टाकावायाचे द्रव्य) करून मानसिक यज्ञ आरंभिला. त्यात वसंत ऋतू हे तूप, ग्रीष्म हे इंधन आणि शरद हा हविर्भाग होता. त्या यज्ञपशूरूप पुरुषावर प्रोक्षण (सिंचन) करण्यात आले. त्या प्रथम झालेल्या जीवांनी यज्ञ केल्यामुळे सृष्टी उत्पन्न करण्यास समर्थ देव आणि सृष्टी संरक्षण करण्यास आवश्यक ज्ञान देणारे ऋषी उत्पन्न झाले. ह्या यज्ञापासून दही, तूप इ. पोषणास आवश्यक असे पदार्थ तयार झाले. त्याचप्रमाणे वन्य आणि पाळीव पशू हेही या यज्ञापासून तयार झाले. या यज्ञापासूनच ऋग्वेद, सामवेद, छंद, आणि यजुर्वेद तयार झाले. याच यज्ञापासून घोडे, इतर पशू, गायी, मेंढ्या वगैरे प्राणी तयार झाले.
ऋग्वेदाच्या अखेरच्या कालखंडातील या पुरुषसूक्तात ब्राह्मण, राजन्य (क्षत्रिय), वैश्य व शूद्र हे एकाच विश्व पुरुषाचे अवयव असून ब्राह्मण मुख, क्षत्रिय बाहू, वैश्य जंघा व शूद्र पाय असे वर्णन आलेले आहे. सामाजिक वर्ग भेदभाव या काळात दिसू लागला होता, असे दिसते; परंतु एकाच पुरुषाचे अवयव, ह्या कल्पनेमध्ये आर्य व शूद्र असा वंशभेद नसावा, असे सूचित होते. या विश्व पुरुषाच्या मनापासून चंद्र, डोळ्यापासून सूर्य, तोंडापासून इंद्र आणि अग्नी, तसेच प्राणापासून वायू उत्पन्न झाला. याच्या नाभीपासून अंतरिक्ष, मस्तकापासून द्युलोक (आकाश), पायापासून भूमी (पृथ्वी), कानांपासून दिशा उत्पन्न झाल्या. इतर सर्व लोकही याच्यापासूनच उत्पन्न झाले आहेत. या यज्ञात गायत्री वगैरे सात मुख्य छंदांच्या सात परिधी; आणि बारा मास, पाच ऋतू, तीन लोक, व एक आदित्य अशा एकवीस समिधा अशी कल्पना करून देवांनी यज्ञ केला. त्या विराट पुरुषाला त्यांनी यज्ञीय पशू कल्पिला. देवांनी यज्ञस्वरूप अशा प्रजापतीचे पूजन केले. तीच कृत्ये मुख्य धर्म झाली. ज्या ठिकाणी साधक देव असतात, ते स्वर्गरूपी स्थान, उपासकांना प्राप्त होते.
हेच सूक्त तैत्तिरीय आरण्यकातही आढळून येते. तेथे त्यात अठरा मंत्र आहेत. अधिकचे दोन मंत्र असे :
वेदाहमेतं पुरुषं महान्तम् आदित्यवर्णं तमसस्तु पारे ।
सर्वाणि रूपाणि विचित्य धीरः नामानि कृत्वाऽभिवदन्यदास्ते ॥१७॥
धाता पुरस्ताद्यमुदाजहार शक्रः प्रविद्वान्प्रदिशश्चतस्त्रः।
तमेवं विद्वानमृत इह भवति नान्यः पन्था अयनाय विद्यते ॥ १८॥
पुरुषसूक्तात प्रथमच चार वर्णांचा स्पष्ट उल्लेख येतो; परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मात्र सविस्तर अभ्यासाच्या आधारे ह्या दोन ऋचा प्रक्षिप्त (मागाहून भर घातलेल्या) मानल्या आहेत. ह्याच सूक्ताच्या आधारे पुरुषमेधाचा पुरावा दिला जातो. परंतु, बहुतेक भाष्यकारांनी पशू हा शब्द ‘पश्यति इति’ असा सोडवून सर्वद्रष्टा परमेश्वर असा त्याचा अर्थ लावला आहे. शिवाय येथील बहुतेक वर्णन मानसयज्ञाचे आहे. सृष्ट्युत्पती होताना एखाद्या पुरुषाच्या अंगांपासून विश्वाचे वेगवेगळे भाग तयार होण्याची कल्पना जगभरातील पुराकथांमध्ये आढळून येते. पुरुषसूक्तातील पुरुषाचीच परिणती उपनिषदांतील ब्रह्म आणि सांख्यदर्शनातील पुरुषामध्ये झाली असावी, असे अभ्यासक मानतात.
संदर्भ :
- काशीकर, चिंतामणी गणेश; सोनटक्के, नारायण श्रीपाद, संपा. सायणभाष्यासह ऋग्वेद, चौथा खंड, वैदिक संशोधन मंडळ, पुणे,१९४६.
- शास्त्री, हरिदत्त; कृष्णकुमार, ऋक्सूक्तसंग्रह, साहित्य भण्डार, मेरठ,१९९६.
समीक्षक : निर्मला कुलकर्णी