‘रूपांतरण वक्र’ (Transformation Curve). एका विशिष्ट वेळी दिलेल्या मर्यादित साधनसामग्रीच्या साह्याने एखादी उत्पादनसंस्था दोन वस्तूंच्या निरनिराळ्या नगसंख्येची किती संमिश्रे उत्पादित करू शकते, हे दर्शविणारा वक्र म्हणजे उत्पादन शक्यता वक्र होय. मानवाच्या गरजा अनंत आहेत; मात्र त्या भागविणारे साधने मर्यादित आहेत. त्यामुळे आपल्या महत्त्वपूर्ण गरजांच्या निवडीची समस्या कशी सोडवावी, हे स्पष्ट करण्याकरिता उत्पादन शक्यता वक्राचा उपयोग होतो. नवसनातनवादी (Neo-Classical) अर्थशास्त्रीय परंपरेतून उत्पादन शक्यता वक्र या संकल्पनेचा किंवा सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषण साधनाचा विकास झाला. उदा., दिलेल्या (स्थिर आणि निश्चित) श्रमसंख्येच्या आणि तंत्रज्ञानाच्या आधारे उत्पादनसंस्था क्ष या वस्तूचे १५ नग आणि य या वस्तूचे १० नग किंवा क्ष या वस्तूचे १० नग आणि य या वस्तूचे १५ नग उत्पादित करू शकते. अशा प्रकारे क्ष आणि य या वस्तूंचे नगांच्या अनेक संमिश्रांच्या (वेगवेगळ्या प्रमाणांत) उत्पादन शक्यता या वक्राद्वारे दर्शविले जातात.
कोष्टक : उत्पादन शक्यता (उत्पादन टनांमध्ये एकरी)
शक्यता |
१ | २ | ३ | ४ | ५ |
गहू |
० | १०० | १५० | २०० |
२५० |
ज्वारी | २५० | २३० | २०० | १५० |
० |
उत्पादन शक्यता कोष्टकाच्या आधारे आपल्याला गहू आणि ज्वारी या दोन वस्तूंच्या उत्पादनाच्या वेगवेगळ्या पाच शक्यता दिसतात. ज्वारीचे २५० टन उत्पादन केले, तर गव्हाचे ० टन उत्पादन होऊ शकते. याउलट, गव्हाचे २५० टन उत्पादन केले, तर ज्वारीचे ० टन उत्पादन होऊ शकते. ह्या दोन टोकाच्या शक्यता आहेत. उत्पादन शक्यता वक्राच्या गृहीतकानुसार दोनही वस्तूंचे उत्पादन होणे आवश्यक आहे. या दृष्टीने शक्यता २, ३, ४ महत्त्वाच्या आहेत. गव्हाचे उत्पादन वाढले, तर ज्वारीचे उत्पादन कमी होते. उदा., गव्हाचे उत्पादन १०० टनांवरून एकरी २०० टनांपर्यंत वाढते, तर ज्वारीचे उत्पादन २३० टनांवरून १५० टनांपर्यंत घसरते. याचाच अर्थ गव्हाचे अधिक उत्पादन करायचे असेल, तर ८० टन (२३० – १५०) ज्वारीच्या उत्पादनाचा त्याग करावा लागतो. याला ‘संधित्याग खर्च’ असे म्हणतात. उत्पादन शक्यता वक्र उत्पादनाबरोबरच रूपांतरणाचा दरही दर्शवीत असतो. उदा., गव्हाच्या अधिक नगांच्या रूपांतरणासाठी ज्वारीच्या किती नगांच्या रूपांतरणाचा त्याग करावा लागतो, हे रूपांतरणाच्या दराने पाहता येते.
https://www.youtube.com/watch?v=O6XL__2CDPU
आकृतीमध्ये दर्शविल्याप्रमाणे उत्पादन शक्यता वक्रावर अ, ब, क, ड आणि इ हे बिंदू गहू आणि ज्वारीच्या उत्पादनाच्या वेगवेगळ्या शक्यता दर्शवितात. उदा., अ बिंदू (० गहू आणि २५० टन ज्वारी किंवा इ बिंदू २५० टन गहू आणि ० टन ज्वारी) किंवा ब बिंदू (१०० टन गहू आणि २३० टन ज्वारी इत्यादी) यांतून उत्पादनाच्या वेगवेगळ्या शक्यता व्यक्त होतात. न बिंदू उत्पादन शक्यता आतल्या बाजूला आहे. या बिंदूने दर्शविलेल्या उत्पादनाच्या शक्यता सहज साध्य करता येतात; मात्र या पर्याप्त नसतात. कारण, उत्पादन साधनांचा पूर्ण उपयोग करून उत्पादित होतील अशी नगसंख्या त्या दर्शवीत नाहीत. म हा बिंदू उत्पादन शक्यता वक्राच्या बाहेर आहे. ह्या बिंदूने दर्शविली जाणारी नगसंख्या असलेल्या उत्पादन साधनांच्या साह्याने उत्पादित करणे एका विशिष्ट वेळेला शक्य नसते. दीर्घ कालावधीमध्ये तंत्रज्ञानात गुणवत्तापूर्ण सुधारणा झाली, तर अधिक उत्पादन शक्य असते. याचाच अर्थ असा की, उत्पादन शक्यता वक्रावरचा कोणताही बिंदू हा पर्याप्त किंवा अधिकाधिक उत्पादन दर्शवितो. उत्पादन शक्यता वक्र मूळ बिंदूपासून ‘बहिर्वक्र’ असतो. याचे कारण ‘रूपांतरणाचा सीमांत दर’ हा वाढत जाणारा असतो. उदा., अधिकाधिक गव्हाचे उत्पादन करायचे असेल, तर ज्वारीच्या उत्पादनाच्या सीमांत नगाचा त्याग अधिक संख्येने करावा लागतो. या सीमांत रूपांतरणाच्या दराकडून उत्पादन शक्यता वक्राचा उतार निश्चित होतो; मात्र उत्पादित केल्या जाणाऱ्या दोन वस्तू पर्यायी नसतील किंवा त्या वस्तू एकमेकींना पूर्णपणे पर्यायी असतील, तर उत्पादन शक्यता वक्र बाहेरील बाजूस वळणारा (बहिर्वक्र) नसेल.
उत्पादन शक्यता वक्र दोनच वस्तूंच्या उत्पादनाच्या शक्यतांचा विचार करतो. तो काही अवास्तव गृहीतकांवर आधारलेला आहे, अशी टीका केली जाते.
संदर्भ :
- सॅम्युएलसन, ए. पॉल; नॉर्डस डी. विल्यम्स; दी मॅक-ग्रॉ हिल, न्यूयॉर्क, २०१०.
- सॅल्वेटोर, डॉन्मिक, प्रिन्सिपल ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स, ऑक्सफर्ड, २००९.
समीक्षक – राजस परचुरे