‘प्रमा’ म्हणजे यथार्थ ज्ञान व ज्या साधनाद्वारे ज्ञान प्राप्त होते त्याला ‘प्रमाण’ असे म्हणतात. योगदर्शनानुसार कोणत्याही वस्तूचे ज्ञान होण्यासाठी चित्ताची त्या वस्तूच्या आकाराची वृत्ती (चित्ताचा पदार्थाच्या रूपाने होणारा परिणाम) होणे आवश्यक असते. चित्ताने वस्तूचा आकार घेतल्यानंतरच त्या वस्तूचे ज्ञान होऊ शकते. चित्ताचा चैतन्यस्वरूप पुरुषाशी (आत्म्याशी) संयोग असल्यामुळे चित्त ज्या ज्या वस्तूचा आकार धारण करते, त्या त्या वस्तूचे ज्ञान आत्म्याला होते. चित्त वस्तूचा आकार घेते तेव्हा त्या आकाराला वृत्ती म्हणतात व पुरुष त्या वृत्तीद्वारे वस्तूचे ज्ञान प्राप्त करून घेतो, त्या ज्ञानाला प्रत्यय असे म्हणतात. चित्ताच्या वृत्तीशिवाय पुरुषाला प्रत्ययरूप ज्ञान होऊ शकत नाही, त्यामुळे ज्ञानाचे साधन वृत्ती असल्याने तिला प्रमाण वृत्ती म्हणतात.
योगदर्शनानुसार तीन प्रमाणे स्वीकारली जातात – प्रत्यक्ष, अनुमान आणि आगम.
(१) प्रत्यक्ष प्रमाण : ज्यावेळी इंद्रियांच्या माध्यमातून चित्त बाह्य वस्तूच्या संपर्कात येते, तेव्हा ते त्या वस्तूचा आकार धारण करते. चित्ताची ही वृत्ती इंद्रियांच्या माध्यमातून होत असल्याने तिला प्रत्यक्ष वृत्ती म्हणतात व ही वृत्ती बाह्य वस्तूचे यथार्थ ज्ञान करवून देत असल्याने तिला प्रमाण म्हटले जाते. उदाहरणार्थ, जेव्हा डोळ्यांचा समोर असलेल्या पुस्तकाशी संयोग होतो, त्यावेळी डोळ्यांच्या माध्यमातून चित्त त्या पुस्तकापर्यंत पोहोचते व त्याचा आकार घेते. चित्ताने पुस्तकाचा आकार घेतल्यावर चित्ताशी संयुक्त असलेल्या चैतन्यस्वरूप पुरुषाला पुस्तकाचे ज्ञान होते. पुरुषाला पुस्तकाचे ज्ञान होण्यासाठी चित्ताची वृत्ती आवश्यक असते व ती इंद्रियांच्या माध्यमातून होत असल्याने तिला प्रत्यक्ष प्रमाण असे म्हणतात. इंद्रियांचा जर वस्तूंशी संयोग असेल तरच प्रत्यक्ष वृत्ती होऊ शकते.
(२) अनुमान प्रमाण : जे दोन पदार्थ नेहमी साहचर्याने राहतात, अशा दोन पदार्थांच्या संबंधाचा आकार घेणारी चित्ताची वृत्ती म्हणजे अनुमान प्रमाण होय. ज्याप्रमाणे चित्त एखाद्या वस्तूचा आकार घेऊ शकते, त्याचप्रमाणे ते दोन पदार्थांच्या संबंधाचाही आकार घेऊ शकते. दोन पदार्थांच्या संबंधाचे ज्ञान प्राप्त करून त्यातील एका पदार्थाच्या प्रत्यक्ष ज्ञानाच्या आधारे दुसऱ्या अप्रत्यक्ष पदार्थाचे ज्ञान प्राप्त करवून देणारी वृत्ती म्हणजे अनुमान प्रमाण होय. उदाहरणार्थ, आपण एखाद्या मनुष्याला चालताना पाहतो व चालण्याच्या क्रियेमुळे तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेला हेही पाहू शकतो. एखादे वाहन जात असताना पाहू शकतो व ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेले हेही पाहू शकतो. अशा प्रकारची अनेक उदाहरणे पाहून ‘ज्या ज्या पदार्थांमध्ये गमनक्रिया (जाण्याची क्रिया) होते, ते ते पदार्थ आपली जागा बदलतात’, असा सर्वसाधारण नियम आपल्या लक्षात येतो. यावरून गमनक्रिया आणि जागा बदलणे (स्थानांतरण) या दोन गोष्टींचा संबंध आहे हे आपल्याला ज्ञात होते. हे ज्ञान प्राप्त केल्यानंतर जर आकाशात पूर्वेला चंद्र उगवलेला पाहून काही तासांनी तो पश्चिमेकडे आहे असे दिसले, तर चंद्राने जागा बदलली याचे प्रत्यक्ष ज्ञान होते. परंतु, चंद्राची जाण्याची क्रिया प्रत्यक्ष इंद्रियाद्वारे दिसत नाही, तर तिचे ज्ञान अनुमानाद्वारे होते. अशा प्रकारे गमनक्रिया आणि स्थानांतरण या दोन गोष्टींच्या संबंधाचा व त्याद्वारे चंद्राच्या अप्रत्यक्ष गमनक्रियेचा आकार घेणारी चित्ताची वृती म्हणजे अनुमान प्रमाण होय. चंद्राची गती प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसत नाही, त्यामुळे तिचे ज्ञान प्रत्यक्ष वृत्तीद्वारे होत नाही, तर अनुमान वृत्तीद्वारे होते.
(३) आगम प्रमाण : आगम प्रमाणालाच शब्द प्रमाण असे म्हणतात. एखाद्या व्यक्तीने प्रत्यक्ष किंवा अनुमान प्रमाणाद्वारे जाणलेल्या वस्तूचे जर दुसऱ्या व्यक्तीला वर्णन करून सांगितले तर ते ऐकल्यानंतर ऐकणाऱ्याच्या चित्तामध्ये वर्णन केलेल्या वस्तूचा आकार उत्पन्न होतो. शब्द ऐकल्यानंतर शब्दाद्वारे वर्णन केलेल्या वस्तूचा आकार चित्त घेते व पुरुषाला त्या वस्तूचे यथार्थ ज्ञान प्राप्त होते. अशा प्रकारे ज्ञानाचे साधन शब्द असल्यामुळे या वृत्तीला आगम/शब्द प्रमाणरूपी वृत्ती समजले जाते. उदाहरणार्थ, जर एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला सांगितले की ‘माझ्याकडे योगसूत्रांचे पुस्तक आहे’, तर हे वाक्य ऐकून दुसऱ्या व्यक्तीच्या चित्तामध्ये त्या पुस्तकाच्या आकाराची वृत्ती उत्पन्न होते व त्याला पुस्तकाचे ज्ञान होते. जरी दुसऱ्याने ते पुस्तक स्वत: पाहिले नसले तरी त्याला त्या पुस्तकाचे शब्दाद्वारे ज्ञान होते, त्यामुळे शब्दाद्वारे बोधित वस्तूच्या आकाराची वृत्ती म्हणजे आगम प्रमाण होय. सर्व शब्द हे प्रमाण नसतात. कारण कधी कधी मनुष्य खोटेही बोलू शकतो. जे शब्द वस्तूचे यथार्थ ज्ञान करवून देतात, तेच प्रमाण आहेत आणि जो वस्तूचे यथार्थ वर्णन करतो, त्यालाच आप्त असे म्हणतात.
अशा प्रकारे प्रत्यक्ष, अनुमान आणि आगम या तीन प्रकारच्या वृत्ती यथार्थ ज्ञान (प्रमा) उत्पन्न करून देतात, त्यामुळे त्यांना प्रमाण असे म्हणतात. यापैकी चित्ताची प्रत्यक्ष प्रमाणरूपी वृत्ती वस्तूच्या विशेष स्वरूपाचे ज्ञान करवून देते व अनुमान आणि शब्द प्रमाणरूपी वृत्ती वस्तूच्या सामान्य स्वरूपाचे ज्ञान करवून देतात. प्रत्येक पदार्थाचे स्वरूप दोन प्रकारचे असते – सामान्य व विशेष. ज्या पदार्थाचे इंद्रियांद्वारे ज्ञान होत आहे, त्या पदार्थाचे व त्यासारख्या इतर पदार्थांचे स्वरूप समान असेल, तर ते सामान्य स्वरूप होय. एखाद्या वस्तूचे स्वत:चे असाधारण स्वरूप असते, त्याला विशेष स्वरूप असे म्हणतात. दुसऱ्या व्यक्तीकडून ऐकून होणारे पुस्तकाचे ज्ञान आणि प्रत्यक्ष स्वत: पुस्तक पाहिल्यावर त्याचे होणारे ज्ञान उत्पन्न करणाऱ्या चित्ताच्या वृत्ती यात फरक असतो. हे दोन्ही प्रकारचे ज्ञान हे पुस्तकाचेच ज्ञान आहे, पण तरीही इंद्रियाद्वारे (डोळ्यांनी पाहून) पुस्तकाच्या विशेष स्वरूपाचे ज्ञान होते व शब्दाद्वारे पुस्तकाच्या सामान्य स्वरूपाचे ज्ञान होते.
योगदर्शनामध्ये केवळ तीनच प्रमाणे मानली आहेत. प्रत्येक दर्शनामध्ये स्वीकारलेल्या प्रमाणांचे स्वरूप व संख्या वेगवेगळी आहे. भारतीय दर्शने व त्यांनी स्वीकारलेली प्रमाणे पुढीलप्रमाणे आहेत – चार्वाक (प्रत्यक्ष); वैशेषिक आणि बौद्ध (प्रत्यक्ष, अनुमान); सांख्य आणि योग (प्रत्यक्ष, अनुमान, शब्द); न्याय (प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान); मीमांसा – प्राभाकर संप्रदाय (प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान, अर्थापत्ती); मीमांसा – भाट्ट संप्रदाय आणि वेदान्त (प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान, अर्थापत्ति, अनुपलब्धि); जैन (प्रत्यक्ष, परोक्ष).
संदर्भ :
ब्रह्मलीन मुनि, पातञ्जल योगदर्शन, चौखम्भा संस्कृतसंस्थान, वाराणसी, २००३.
समीक्षक : कला आचार्य