ख्रिस्ती धर्माला सुरुवात झाल्यानंतर शे-पाचशे वर्षे धार्मिक वृत्तीची मंडळी ‘संन्यस्त’ म्हणून रानावनात मनन-चिंतन करत एकएकटे राहात. पुढे स्व-संरक्षणार्थ त्यांतली काही मंडळी एकत्र आली. त्यांतून समविचारी लोकांचे संघ उभे राहिले. त्यांत मठवाशांची ‘बेनेडिक्टन’ संघटना ही प्रमुख होती. परंतु खरे गोरगरिबांचे ‘संघ’ निर्माण झाले ते पहिल्या सहस्रकानंतर. त्यांत फ्रान्सिस्कन, डॉमिनिकन, ऑगस्टीनियन आणि जेज्वीट या चार संघांचा अंतर्भाव महत्त्वाचा होता. सुरुवातीला आपल्या स्वत:च्या वर्तणुकीत सुधारणा करण्याची व ईश्वराची मर्जी संपादन करण्याची ह्या संघीयांची आंतरिक इच्छा होती. ‘धर्मप्रचार करणे’ अथवा ‘मिशनरी कार्य करणे’ हे सुरुवातीला त्यांचे प्रमुख उद्दिष्ट नव्हते. धर्माचरणाच्या बाबतीत यूरोपमध्ये अधूनमधून नैतिक घसरण सुरू होई. धर्माचरणाच्या या उतरंडीला आळा घालण्यासाठी हे विविध संघ वेगवेगळ्या शतकांत वेगवेगळ्या ठिकाणी स्थापन झाले.

भारतात जलमार्गाने येण्याचा शोध जेव्हा यूरोपियनांना लागला, तेव्हा भारतातील लोकांना ख्रिस्ती धर्माची देखील ओळख झाली पाहिजे, असे तेथील धर्माधिकाऱ्यांना तसेच सामान्य जनतेला वाटू लागले. ही जबाबदारी काही संघांनी आपल्या शिरांवर घेतली. त्याला धर्माधिकाऱ्यांचे पाठबळ मिळाले. या प्रत्येक संघाची उभारणी तीन प्रमुख व्रतांवर झाली होती. द्रव्यसंग परित्याग (Poverty), शुचिर्भूतपणा (Chastity) व वरिष्ठांचे आज्ञापालन (Obedience) ही आमरण व्रतांची त्रिसूत्री होती.

संदर्भ :

  • Mausofe, A. J. M.; Mausolfe, J. K. Saint Companisons, Bandra, 2004.

समीक्षक : फ्रान्सिस दिब्रिटो


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.