हिंदुस्थानी संगीतातील एक ललित गायनप्रकार. तो मियाँ शौरी यांनी (सु. १८१०) प्रवर्तित केला. ‘टप्पा’ हा शब्द ‘टप्’ (लघू किंवा लहान) यावरून आलेला आहे. टप्प्याची भाषा पंजाबी किंवा पुश्तू असून उंटांच्या कारवानांच्या गीतांवर टप्प्याची उभारणी झालेली आहे. पंजाबच्या हीर-रांझा या लोकमानसातील नायक-नायिकेचे प्रेम हा टप्पा-गीतांचा विषय. टप्पे हे ठुमऱ्यांप्रमाणेच जिल्हा-रागात (अर्थात खमाज, देस, काफी, भैरवी, पिलू, मांड इ.) व मध्यलयीत बांधलेले असतात. टप्पा-गायनाला गळ्याच्या अतिचपळ व विलक्षण तयारीची आवश्यकता असते. स्वरांचे सम-विषम असे अत्यालंकारिक आकृतिबंध, तानफिरतीची नजाकत, स्वरांचे विविध व विपुल अंकपाश, कंप, गिटकडी, मुरकी इ. अलंकार, चमत्कृतिजनक लयकारी, छोट्या छोट्या तानांच्या लडींची वेधक गुंफण, बढतीची चपलता ही टप्पा-गायनातील खास वैशिष्ट्ये होत. त्यामुळे टप्प्याचा विशिष्ट घाटाचा गायनप्रकार हा ख्याल-ठुमरीपेक्षा चटकन वेगळा असा ओळखू येतो. गावू, शादिखाँ (गावूचा पुत्र), बाबूराम साहाई, लखनऊवासी नबाब हुसेन अलीखाँ, मीर अलीसाहेब, मियाँ शौरी (मियाँ गुलामनबी शौरी), मास्तर कृष्णराव, कुमार गंधर्व, रसूलनबाई, सिद्धेश्वरीबाई, शरच्चंद्र आरोलकर, शरद साठे हे टप्पा गायक म्हणून प्रसिद्ध होते. तसेच अलीकडच्या काळात मालिनी राजूरकर इत्यादींनी उल्लेखनीय टप्पा-गायन केले आहे.

संदर्भ : 

  • भोळे, केशवराव, अस्ताई, मौज प्रकाशन, २०१२.

समीक्षक : पोटे, सुधीर