पश्चिमी संगीतातील काउंटरपॉइंटचा (एकाचवेळी एकापेक्षा अधिक सुसंगत रचनांची प्रस्तुती) एक प्रकार. ह्या प्रकारात अनुकरणाचे तत्त्व अत्यंत काटेकोरपणे पाळलेले असते. ह्या संगीतप्रकारात केलेल्या रचनेच्या आरंभीच्या भागाचे अनुकरण नंतरचे सर्व भाग करीत असतात, म्हणूनच आरंभीच्या भागाला ‘डक्स’ (अग्रणी) आणि नंतरच्या सर्व भागांस ‘कम्स’ (साथी) असे म्हटले जाते. कम्स गाणारे किंवा वाजवणारे अनेक जण असू शकतात. दोन व्यक्तींच्या संभाषणात एकाने ‘कसे काय?’ असे विचारल्यावर दुसऱ्यानेही ‘कसे काय?’ ह्या प्रतिप्रश्नाने त्याला उत्तर द्यावे, साधारण त्याप्रमाणे ह्याची रचना असते. कॅननचा पहिला भाग चालू असतानाच त्याची अनुकृती असलेला दुसरा भाग सुरू होतो आणि त्यानंतरचा भागही ह्याच प्रकारे सुरू होतो. सबंध संगीतरचना संपेपर्यंत हे सत्र चालू राहते. त्या सत्रातील संगीतानुकृती एकाच स्वरस्तरावरून गायल्या वा वाजवल्या जातात असे नाही. डक्सपासून चौथा किंवा पाचवा स्वर घेऊन किंवा त्याच्यापासून संपूर्ण सप्तकाचे अंतर ठेवून कॅननचा दुसरा भाग सुरू होतो.

‘थ्री ब्‍लाइंड माइस’ हे एक इंग्रजी बालगीत उदाहरणादाखल घेता येईल. प्रथम एक आवाज ‘थ्री ब्लाइंड माइस’ एवढा भाग म्हणतो. त्यानंतर त्याची पुनरावृत्ती पहिल्या आवाजाकडून होत असतानाच दुसरा आवाज ‘थ्री ब्‍लाइंड माइस’ म्हणू लागतो.

कॅननचे अनेक प्रकार आहेत. Sumer is icumen in हे इंग्रजी वसंतगीत हे कॅननचे विशेष लोकप्रिय उदाहरण. सतराव्या–अठराव्या शतकाच इंग्‍लंडमध्ये कॅनन अत्यंत लोकप्रिय झाले होते. तेथे त्यांना ‘कॅच’ आणि ‘राउंड’ अशी नावे होती. बाक, बेथोव्हन यांसारख्या विख्यात संगीतकारांनी कॅननचा यशस्वी रीत्या उपयोग करून घेतला. हा प्रकार प्रथमत: तेराव्या शतकात वापरला गेला. एका ग्रीक वाद्यासही ‘कॅनन’ अशी संज्ञा आहे.

संदर्भ :

  • Scholes, Percy A. Ed. The Oxford Companion to  Music, London, 1963.

समीक्षक : सुधीर पोटे