भातखंडे वर्गीकरणपद्धतीनुसार या थाटातील मुख्य राग फक्त तीन होत : तोडी, गुजरी आणि मुलतानी. त्यांतही तोडी व गुजरी यांत फक्त एकाच (पंचम) स्वराचा फरक मानण्यात आला असला, तरी मियाँकी तोडी ही श्री अंगाची आहे आणि गुजरी ही मारवा अंगाची आहे, असे मानले जाते.

आपल्या नावात उत्तर भागात ‘तोडी’ नाव जोडणारे अनेक राग प्रचारात असले, तरी त्यांच्या स्वरूपनिश्चितीविषयी संदिग्धता असल्याचे पं. भातखंडे यांनी नमूद केले आहे. लाचारी, लक्ष्मी, बहादुरी, मुद्रा, अहीरी, हुसेनी, अंजनी इ. रागांचा या संदर्भात त्यांनी उल्लेख केला आहे. ग्रंथात वर्णन केलेला तोडी थाट सध्याच्या भैरवी थाटासारखा आहे. काही पंडितांच्या मते ‘तोडी’ हे नाव ग्रीक संगीतातील ‘डोरिक’ या मेलावरून आले असावे, अशीही माहिती पं. भातखंडे यांनी दिली आहे. निरनिराळ्या रागस्वरूपाशी मेल करून विभिन्न तोडी प्रकारांची निर्मिती होते.

हिंदुस्थानी तोडी थाटास कर्नाटक पद्धतीतील तुल्य थाट ‘शुभपंतुवराळी’ म्हणून ओळखला जातो.

संदर्भ :

  • भातखंडे, वि. ना., भातखंडे संगीतशास्त्र (भाग चौथा), हाथरस, १९५७.

समीक्षक : सुधीर पोटे