कर्झन, लॉर्ड जॉर्ज  नाथॅन्येल : (११ जानेवारी १८५९–२० मार्च १९२५). ब्रिटिशांकित हिंदुस्थानचा १८९८ ते १९०५ च्या दरम्यानचा गव्हर्नर जनरल व व्हाइसरॉय. हा केडलस्टन हॉल (डर्बिशर) येथे एका उमराव घराण्यात जन्मला. लहानपणी त्याच्यावर त्याची शिक्षिका व शिक्षक यांच्या शिस्तबद्ध वर्तणुकीचे फार मोठे संस्कार झाले. त्यामुळे भावी आयुष्यात तो एक शिस्तप्रिय प्रशासक म्हणून प्रसिद्ध पावला. ईटन स्कूल व बेल्यल (ऑक्सफर्ड विद्यापीठ) महाविद्यालयांत त्याचे शिक्षण झाले. पुढे त्यास काही दिवस ऑल सोल्स कॉलेजमध्ये अधिछात्रवृत्ती मिळाली. विद्यार्थीदशेत तो विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष होता. १८८५ मध्ये लॉर्ड सॉल्झबरीचा तो दुय्यम चिटणीस झाला.

१८८६ मध्ये लँकाशरच्या साउथपोर्ट विभागातर्फे तो पार्लमेंटवर निवडून आला. १८९१-९२ मध्ये त्याची भारताचा उपसचिव म्हणून नियुक्ती झाली. १८९५ मध्ये परराष्ट्रीय खात्यात तो काम करू लागला. दरम्यानच्या काळात अमेरिका, मध्य आशिया, तुर्कस्तान, इराण, चीन, रशिया, अफगाणिस्तान, सयाम, इंडोचायना इ. प्रदेशांचे दौरे काढून त्याने आपले अनुभव ग्रंथरूपाने प्रसिद्ध केले आणि त्यांत त्या त्या देशातील सामाजिक व राजकीय प्रश्नांचा ऊहापोह केला. १८९९ च्या जानेवारीत कर्झन जेव्हा हिंदुस्थानात व्हाइसरॉय म्हणून आला, त्यावेळी हिंदुस्थानात अनेक राजकीय प्रश्न निर्माण झाले होते. त्यामुळे कणखर परराष्ट्रीय धोरणाची आवश्यकता होती. त्या दृष्टीने कर्झनने अनेक सुधारणा केल्या. त्यांपैकी महसूल, शिक्षण, शेती व वायव्य सरहद्दीचे धोरण ह्या प्रमुख असून ह्यांशिवाय इतरही क्षेत्रांतील त्याच्या सुधारणा वाखाणण्यासारख्या आहेत. ह्या सुमारास वायव्य सरहद्द प्रांतावर संरक्षणासाठी लाखो रुपये खर्च होत असत; कारण त्या प्रदेशात वारंवार बंडे उद्‌भवत. अशी एक बंडाळी नुकतीच शमली होती, तेव्हा हा प्रश्न कायमचा मिटविण्याच्या दृष्टीने त्याने वायव्य सरहद्द प्रदेशातील स्वतंत्र टोळ्यांच्या प्रश्नात मुद्दाम लक्ष घातले आणि वायव्य सरहद्द प्रदेशाचा एक निराळा प्रांत तयार केला व तेथील लोकांशी मनमिळाऊ धोरण ठेवून त्यांच्यावर सदर प्रांताच्या संरक्षणाची जबाबदारी टाकली. रशियाच्या धोरणाबद्दल तो साशंक असल्यामुळे त्याने इराणबरोबरच्या ब्रिटिशांच्या व्यापारास उत्तेजन दिले व १९०३ मध्ये इराणच्या आखातास भेट दिली. त्याच वेळी ईशान्य सरहद्दीवरील १९०३ च्या तिबेट–मिशनद्वारा रशिया भारतात चंचूप्रवेश करील, अशी त्यास भीती वाटत होती. म्हणून त्याने इंग्रज वकिलांच्या संरक्षणासाठी सैन्याची योजना केली. तिबेटवर चीनची हुकमत असल्यामुळे तिबेट-मिशनला चीनचा आधार होता. म्हणून त्याने ल्हासापर्यंत प्रवेश केला आणि सप्टेंबर १९०४ मध्ये तह घडवून आणला. पुढे आपल्या सुधारणावादी धोरणास अनुसरून त्याने शिक्षण, पाटबंधारे, पोलीस व राज्ययंत्रणेच्या निरनिराळ्या शाखा यांच्या चौकशीसाठी विविध समित्या नेमल्या आणि व्हाइसरॉय म्हणून दुसऱ्‍यांदा नेमणूक झाल्यावर वरील समित्यांच्या शिफारशींप्रमाणे त्याने कायदे केले. १९०४ साली सहकारी पतपेढ्यांचा कायदा त्याने संमत करून घेतला. तसेच त्याने पुरातत्त्वखात्याची नव्याने कार्यक्षम रचना केली आणि पुराण स्मारक संरक्षण व भूमिगत निधी यांसंबंधी कायदे करून जुन्या संस्मरणीय वस्तू व वास्तू यांचा ऱ्‍हास व नाश थांबविण्याचा प्रयत्न केला. शैक्षणिक बाबतीत त्याचे धोरण मात्र काहीसे प्रतिगामी स्वरूपाचे होते. त्याने विद्यापीठीय, माध्यमिक व तांत्रिक शिक्षणास उत्तेजन देऊन, प्राथमिक शिक्षणाचा जोराने पुरस्कार व प्रसार केला. डायरेक्टर जनरल ऑफ एज्युकेशन हे उच्च शैक्षणिक पद त्याने शिक्षणाच्या सुधारणांसाठी निर्माण केले, तरी त्यात सरकारच्या हस्तक्षेपामुळे असंतोष निर्माण झाला. त्याचप्रमाणे भारतीय विद्यापीठांचा कायदाही संमत करण्यात आला.

ब्रिटिश व एतद्देशीय सत्ताधारी यांच्यामधील संबंध आणि संस्थानांच्या राज्यव्यवस्थेचा दर्जा सुधारावा, म्हणून त्याने ‘इंपीरिअल कॅडेट कोअर’ ची स्थापना केली. तो साम्राज्यवादी असल्याने येथील संस्थानिकांशी सबुरीचे धोरण अवलंबून ब्रिटिशांचे साम्राज्य कसे दृढमूल होईल, ह्याकडे त्याने लक्ष दिले व हैदराबादच्या निजामाचा (वर्‍हाडचा) प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. मिठावरील कर कमी केला व किरकोळ प्राप्तिकर भरणार्‍यांना सूट दिली. अवर्षण, सरहद्दीवरील युद्ध व रुपयाची कृत्रिम किंमत वाढल्यामुळे व्यापाराला आलेली मंदी ह्यांमुळे दुष्काळ पडला, म्हणून पाटबंधारे बांधून त्याने शेतीस उत्तेजन दिले व इन्स्पेक्टर जनरल ऑफ इरिगेशन हे पद निर्माण करून शेतीच्या बाबतीत संशोधनास आवश्यक तो पैसा पुरविला. प्लेग व हिवताप ह्यांसारख्या रोगराईंना तोंड देण्यासाठी लाखो रुपये खर्चून औषधोपचार चालू केले व अशा साथींना तोंड देण्यासाठी प्रतिबंधक उपाय योजले. कलकत्ता शहराचे सौंदर्य वाढविण्यात कर्झनचा मोठा वाटा आहे. त्याने व्यापाराचे स्वतंत्र खाते काढले व रेल्वेची वाढ करावयाचे ठरविले. सातव्या एडवर्डच्या राज्यारोहणानिमित्त दिल्लीस भरलेल्या १९०३ च्या दरबाराचा तो अध्यक्ष होता. त्या प्रसंगी पूर्वेकडील देशांत पूर्वी कधीही पाहावयास मिळाला नव्हता, असा भव्य दरबार भरवून त्याने राजेशाही थाटात सर्व सोहळा साजरा केला. मुदत संपताच त्यास पुन्हा गव्हर्नर जनरल करण्यात आले. तथापि ह्यावेळी हिंदुस्थानात राष्ट्रीय चळवळीस आरंभ झाल्यामुळे त्याच्या राजेशाही वागणुकीवर व साम्राज्यवादी धोरणावर टीका होऊ लागली. त्याने प्रशासनाच्या सोयीसाठी १९०५ साली बंगालची फाळणी केली; पण त्यामुळे बंगाली लोकांत विरोधाची लाट उसळली. ह्याच सुमारास कर्झन व सेनापती लॉर्ड किचेनर यांत गव्हर्नर जनरल व कमांडर इन चीफ यांच्या अधिकारांसंबंधी मतभेद निर्माण झाले. त्या प्रकरणात त्याच्या मताला दुजोरा मिळाला नाही. उलट भारतमंत्र्याने किचेनरला पाठिंबा दिला. तेव्हा कर्झन राजीनामा देऊन इंग्लंडला परत गेला. त्याच वर्षी त्यास सिंक पोर्ट्सचा लॉर्ड वॉर्डन नेमण्यात आले आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यास सन्मानार्थ पदवी दिली. १९०८ साली तो त्या विद्यापीठाचा चॅन्सलर झाला व आयर्लंडचा प्रतिनिधी पीअर म्हणून त्यास निवडण्यात आले. १९०९ ते १९१० च्या दरम्यान मजूरपक्षाविरुद्ध हाउस ऑफ लॉर्ड्सला पाठिंबा देण्याच्या बाबतीत त्याने पुढाकार घेतला. तो प्रथमपासून हुजूरपक्षाचा होता.

मेरी लायटर ह्या अमेरिकेच्या एका धनाढ्य युवतीशी त्याचे १८९५ मध्ये लग्न झाले, तिच्यापासून त्यास एक मुलगी झाली व तीच पुढे त्याची वारस ठरली. त्यास जगातील अनेक देशांना भेटी देण्याची संधी लाभली. प्रवासातील त्याचे अविस्मरणीय अनुभव ग्रंथरूपाने साकारले आहेत. रशिया इन सेंट्रल एशिया (१८८९), पर्शिया अँड द पर्शियन क्वश्चन (१८९२), प्रॉब्लेम्स ऑफ द फार ईस्ट (१८९४), द पामीर्स अँड द सोर्स ऑफ द ऑक्सस (१८९५) इ. त्याची पुस्तके प्रसिद्ध आहेत. शेवटच्या पुस्तकातील संशोधनामुळे त्यास जागतिक कीर्तीचे भूगोलाचे बक्षीस मिळाले. त्याची विद्वत्ता व कलासक्ती उल्लेखनीय आहे. त्याच्या वागण्यात व राहणीत एक प्रकारचा राजेशाही थाट होता आणि तो साम्राज्यवादाचा मोठा पुरस्कर्ता होता, त्यामुळे गव्हर्नर जनरलच्या पदावरून मुक्त झाल्यानंतर त्यास अनेक उच्चपदांच्या जागा मिळाल्या; पण इंग्लंडचा पंतप्रधान होण्याची त्याची महत्त्वाकांक्षा पूर्ण झाली नाही. वयाच्या सहासष्टाव्या वर्षी तो लंडन येथे मरण पावला. अत्यंत कर्तबगार गव्हर्नर जनरल व कार्यक्षम प्रशासक म्हणून कर्झन ख्यातनाम होता. त्याच्या काटेकोर वागणुकीमुळे तो प्रजेत अप्रिय झाला, तरी त्याच्या वागणुकीत सचोटी व कणखरपणा होता. प्रचंड कार्यशक्ती आणि स्वकर्तव्यावरील दृढ श्रद्धा हे कर्झनचे प्रमुख गुण होते. त्याने केलेल्या सुधारणांचे महत्त्व लोकांना बंगालच्या फाळणीच्या वादळानंतर १९११ मध्ये पटू लागले. “हिंदुस्थानातील लोक राज्यकारभार करण्यास संपूर्णतया नालायक असून इंग्रजांनी हिंदुस्थानचे राज्य चालवावे, हा ईश्वरी संकेत आहे व त्यामुळे हिंदी लोकांना राजकीय सवलती देणे, म्हणजे ईश्वरी संकेताचा अवमान करणे होय”, असे त्याचे प्रामाणिक मत होते. जेव्हा भारतात व इतर प्रदेशात ब्रिटिशांची सत्ता संपुष्टात येईल, तेव्हा ब्रिटनची गणना तिसऱ्‍या दर्जाच्या राष्ट्रात होईल, असे भाकित त्याने वर्तविले होते. त्याच्या साम्राज्यवादी धोरणामुळे पुढे राष्ट्रीय जागृती मात्र झपाट्याने झाली.

संदर्भ :

  • Diks, David, Curzon in India, London, 1969.
  • Fraser, Lovat, India under Curzon and After, New Delhi, 1968.