प्रागैतिहासिक कांस्य (ब्राँझ) युगातील इजीअन समुद्राच्या आसपासच्या प्रदेशात इ. स. पू. ३००० ते ११०० च्या दरम्यान नांदत असलेल्या संस्कृतीस सामान्यतः ‘इजीअनʼ ही संज्ञा देण्यात येते. यूरोपमधील ही पहिली प्रगत संस्कृती होय. ती इजीअन समुद्रातील लहानमोठ्या बेटांत, ग्रीसचा दक्षिण व आग्नेय भाग तसेच तुर्कस्तानचा पश्चिम व मुख्यत्वे वायव्य भाग यांत विस्तारली होती. क्रीट बेटावरील नॉसस व फायस्टॉस, ग्रीसमधील मायसीनी व टायरिन्झ आणि तुर्कस्तानातील ट्रॉय ही तिची प्रमुख केंद्रे होती. या संस्कृतीचा शोध जर्मन पुरातत्त्वज्ञ हाइन्रिख श्लीमान यांनी १८७० ते १८९२ च्या दरम्यान लावला. होमरच्या महाकाव्यात आणि ग्रीक पुराणकथांत वर्णिलेल्या व्यक्ती व स्थलनामे त्यापूर्वी केव्हातरी निश्चितच अस्तित्वात असली पाहिजेत, या दृढ विश्वासाने श्लीमान यांनी येथे उत्खनन केले. त्यांना येथे अनेक प्राचीन अवशेष उपलब्ध झाले. अर्थात त्यांचे उत्खनन शास्त्रशुद्ध नव्हते; त्यामुळे त्यांनी ठरविलेली कालनिश्चिती व उपलब्ध अवशेषांवरून काढलेली अनुमाने फारशी विश्वसनीय नव्हती. त्यानंतर वरील प्रदेशांत व्हिल्हेल्म डर्पफेल्ट, एव्हान्झ, जे. बी. वेस, अॅलन इ. पुरातत्त्ववेत्त्यांनी विस्तृत प्रमाणावर उत्खनने केली. इजीअन संस्कृतीचे सिक्लाडिक, मिनोअन आणि मायसीनीअन संस्कृती अशा भागांत विभाजन केले जाते.
मिनोअन संस्कृती क्रीट बेटाशी संबंधित होती. ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ आर्थर जे. एव्हान्झ (इ. स. १८५१-१९४१) यांनी १८९९ ते १९३५ पर्यंत येथे उत्खनन केले. त्यातून मिनोअन संस्कृतीचे अवशेष ज्ञात झाले. ग्रीक पुराणकथांतील क्रीट येथील मीनो राजाच्या उल्लेखावरून या संस्कृतीला मिनोअन हे नाव प्राप्त झाले. क्रीट हे विशाल बेट यूरोप, आफ्रिका आणि आशिया या तिन्ही खंडांना जवळ असल्यामुळे येथील लोकांना या सर्वांशी पूर्वी व्यापार करणे सोयीचे गेले आणि या व्यापारामुळे त्यांना संपत्ती प्राप्त झाली.
मिनोअन संस्कृती :
या संस्कृतीस हेलाडिक संस्कृती असेही म्हणतात. कालोत्क्रमाच्या सोयीसाठी पुढील तीन विभाग केलेले आहेत :
(१) मिनोअन क्रीट किंवा प्राचीन हेलाडिक (इ. स. पू. सु. २६०० ते २०००). या कालावधीला प्रासादांपूर्वीचा (Prepalatial) काळ असे ओळखतात.
(२) मध्य हेलाडिक (इ. स. पू. सु. २००० ते १६००). या काळाचे परत दोन भागांत विभाजन होते. या काळाच्या पहिल्या पर्वात प्रासाद बांधले गेले; परंतु साधारण इ. स. पू. १७०० च्या सुमारास नैसर्गिक आपत्तीमुळे सर्वच प्रासाद नेस्तनाबूत झाले. याला प्रासाद-पर्व (Protopalatial) काळ असेही म्हणतात. इ. स. पू. १७०० ते इ. स. पू. १५०० या काळात सर्व प्रासादांची पुनर्बांधणी करण्यात आली, म्हणून याला नव-प्रासाद (Neopalatial) काळ असेही म्हणतात.
(३) मायसीनीअन किंवा उत्तर हेलाडिक (इ. स. पू. सु. १६०० ते ११२५). या काळाला प्रासादानंतरचा काळ (Postopalatial) असे म्हणतात.
इजीअनमधील मायसीनी, टायरिन्झ व ट्रॉय या शहरांच्या तत्कालीन रचनेवरून व त्यांतील राजवाड्यांवरून असे वाटते, की सर्वकाळी येथे राजेशाही अस्तित्वात असावी; परंतु नंतर मायसीनियन किंवा उत्तर हेलाडिक काळात लहान शहरांतून स्वतंत्र राजकीय गट असावेत आणि त्या सर्वांत नॉसस हे बलवत्तर असावे. काही खेड्यांच्या सभोवतालच्या तटबंदीवरून असे अनुमान करता येते, की त्यांचे आपापसांत हेवेदावेही असावेत. मिनोअन व मायसीनीअन जीवनपद्धतींत काही भेद निश्चितपणे आढळत असले, तरी मायसीनीत स्थायिक झालेल्या अॅकियन जमातींनी मिनोअन संस्कृतीच अधिक आत्मसात केलेली आढळते. स्थलकालसापेक्ष काही भेद आहेत.
मिनोअन (क्रीटन) कला :
कलाक्षेत्रांत इजीअन लोकांनी केलेली प्रगती उत्खननांतून मिळालेले त्यांचे राजप्रासाद व गृहबांधणीचे अवशेष, मूर्ती, मृत्पात्रे, शिल्पे यांवरून दिसून येते. या काळात विस्तीर्ण राजप्रासादांचे अवशेष आढळले आहेत. त्यांची रचना प्रशस्त सभागृहे, शयनगृहे, स्नानगृहे व सांडपाण्याची व्यवस्था लक्षात घेऊन केली असून प्रासादांत भिंतींवर उत्तम प्रकारचे चित्रकाम आढळले आहे.
वास्तुकला :
कांस्ययुगात क्रीटमध्ये कच्च्या विटांपासून वास्तूंची निर्मिती झाल्याचे अवशेषांवरून लक्षात येते. वास्तुनिर्मितीसाठी दगडांचाही वापर करीत. येथे अनेक प्रशस्त राजवाडे, हवेल्या, थडगी, प्रशस्त सभागृहे, शयनगृहे, स्नानगृहे व सांडपाण्याची व्यवस्था असे नगरांचे अवशेष आढळले आहेत. नॉसस आणि फायस्टॉस या ठिकाणी प्रेक्षागृहांचे अवशेष आढळले असून त्यांत मातृदेवतेची व तिच्या पुत्रांची पूजा-अर्चा व धार्मिक उत्सव साजरे करीत. राजा हाच मुख्य पुरोहित समजला गेल्याने प्रासादामध्येच छोटे देऊळ बांधले जात असे. नॉससला मध्य-मिनोअन काळातील थरांत सुप्रसिद्ध मिनॉसच्या राजप्रासादाचे अवशेष मिळाले. त्याची लांबी सु. १२५ मी. व रुंदी १४० मी. होती आणि मधला चौक २७×५५ चौमी. क्षेत्रफळाचा होता. अवशिष्ट वास्तूंत नॉससचा हा प्रासाद सर्वांत मोठा व प्रसिद्ध होता. साधारणतः दोन हेक्टर क्षेत्रामध्ये पसरलेला हा प्रासाद मिनोअन वास्तुकलेचा उत्तम नमुना मानला जातो. तो प्रथम इ. स. पू. २००० ते १९०० च्या सुमारास बांधण्यात आला; पण भूकंपामुळे इ. स. पू. १७०० व इ. स. पू. १४५० मध्ये त्याची पडझड झाली. नंतर त्याची पुनर्बांधणी करण्यात आली. पुढे इ. स. पू. १३७५ पर्यंत त्याचा वापर होता. याच्या भोवती निरनिराळी दालने होती. यातील राजसभा, स्वागतखोली प्रशस्त असून पश्चिमेकडील बाजूस अनेक गर्भगृहे होती. घराच्या जमिनी फरसबंद असून जमिनीखाली पाण्याचा योग्य प्रकारे निचरा व्हावा, म्हणून गटारे बांधली होती. प्रासाद टेकडीवर बांधलेला असल्याने बांधकाम एकाच पातळीवर आढळत नाही. त्याचा पाया व जमिनीलगतचा भाग दगडांनी बांधलेला असून हा प्रासाद बहुमजली, सपाट छतांचा व असंख्य लाकडी स्तंभांवर आधारित होता. हे स्तंभ वरील बाजूस व पायाकडे निमुळते होते. प्रासादाच्या भिंती व स्तंभ रंगवलेले होते. प्रासादात धान्य साठविण्यासाठी कोठारे व ठिकठिकाणी पाण्यासाठी रुंद जिने होते. प्रासादातील जमिनीवरील फरशी लाकूड, दगड व गिलाव्याने बनवलेली होती. त्यात पाणी, तेल व मदिरा आदी साठवून ठेवण्यासाठी विशाल पात्रे होती. विशेष म्हणजे जमिनीखालील पाण्यासाठी भुयारी पाटमार्गांनी या प्रासादात सर्वत्र पाणी पोहोचविण्याची सोय केलेली दिसते. येथील प्रसाधनगृहांची रचनाही विशेष उल्लेखनीय आहे. या प्रासादात देदालोस (Daedalus) या कारागीराने भूलभुलैय्याची निर्मिती केली होती, ज्यामध्ये एकदा आत गेलेला माणूस बाहेर पडू शकत नसे. ग्रीक पुराणकथांमध्येही हा प्रासाद चक्रव्यूह किंवा मयरचना (Labyrinth) नावानेही संबोधला गेला आहे.
चित्रकला :
राजप्रासादांतून व इतर घरांतून भिंतींवर विविध प्रकारची भित्तिचित्रे रंगविलेली होती. त्यांतून तत्कालीन समाजजीवन व्यक्त होते. ही भित्तिचित्रे ओल्या व कोरड्या अशा दोन्ही प्रकारच्या गिलाव्यांवर रेखाटलेली आहेत. त्यांत कोणती तंत्रपद्धती वापरली गेली याविषयी शास्त्रज्ञांमध्ये मतभेद आहेत. मिनोअन लोकांनी प्रासादात सार्द्र भित्तिलेपचित्रण (buon fresco) तसेच शुष्क भित्तिलेपचित्रण (Secco fresco) या दोन्ही तंत्रांचा अवलंब केलेला असावा. त्यांच्या सुरुवातीच्या चित्रणात हेमॅटाइटपासून तयार केलेल्या गडद तांबड्या रंगाचा वापर आढळतो. इतर रंगांमध्ये कार्बनयुक्त शंखापासून काळा, चुन्यापासून पांढरा, गेरूपासून पिवळा, तांब्याच्या खनिजापासून निळा आणि निळा व पिवळा यांच्या मिश्रणापासून हिरवा रंग तयार करून वापरत असत. मानवाकृती असलेले धार्मिक विधी, दिंडी, सण, समारंभ, बेटावरील समाजजीवनातील प्रसंग आणि बैलांच्या खेळांची अशी तत्कालीन लोकप्रिय दृश्ये येथे चित्रित केलेली दिसतात. नित्याच्या नैसर्गिक दृश्यांमध्ये लिली, गुलाब, लव्हाळे, क्रॉकस, आयव्ही (ivy) यासारख्या वेलींची दृश्ये तसेच डॉल्फिन व इतर मासे चित्रित केलेले दिसतात. भित्तिचित्रांत पक्षी, प्राणी, विविध वनस्पती असून व्यक्तिचित्रे भरपूर आहेत. त्यांत त्यांचे खेळ, कपडे, वेशभूषा यांचे दर्शन घडते. बैलांवरील कसरत तसेच मिरवणूक आणि राजपुरोहितांची धार्मिक कृत्ये किंवा नागदेवतांची पूजा ही चित्रेही आढळतात.
येथील सागरी उत्सवाच्या दिंडीचे (The Ship Fresco / Ship Procession) भित्तिलेपचित्र विशेष उल्लेखनीय आहे. सहा मीटर लांब असलेल्या या भित्तिलेपचित्रात आठ मोठ्या जहाजांची व तीन लहान बोटींची लांब रांग दाखविलेली आहे. जहाजे व बोटी वल्हवणाऱ्या माणसांसोबत जहाजात प्रवासीही बसलेले दाखविले असून या प्रवाशांच्या वेशभूषेवरून ते उच्च वर्गातील असावेत. ही जहाजे एका बंदरावरून दुसऱ्या बंदरावर जाताना दाखविलेली आहेत. जहाजांवर फुले, फुलपाखरे, पाकोळी आदी नैसर्गिक प्रतीकांचे नक्षीकाम केलेले दिसते. मिनोअन कला फक्त कार्यात्मक आणि आलंकारिक नसून तिला राजकीय पार्श्वभूमी असावी. कारण भित्तिलेपचित्रांत दाखविलेल्या धार्मिक समारंभात राज्यकर्ते रेखाटलेले दिसतात.
मृत्पात्रे :
क्रीटन संस्कृतीत मृत्पात्रकलेचा विकास मोठ्या प्रमाणावर झाला. मिनोअन काळातील कुंभार या क्षेत्रात प्रगल्भ असल्याचे मृत्पात्रांवरून लक्षात येते. या मृत्पात्रांची निर्यातही होत होती. इ. स. पू. २०००च्या सुमारास क्रीटमध्ये तयार झालेली मृत्पात्रे ही मिलॉस, ईजिप्त, सायप्रस व ग्रीसच्या इतर प्रदेशांत निर्यात होत आणि त्यांच्या बदल्यात काही भांडी क्रीटमध्ये त्या वेळी आयात होत. इ. स. पू. १६०० नंतर क्रीटची बहुतेक मृत्पात्रे भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावरील प्रदेशांत जात असावीत. मिनोअन मृत्पात्रांचे घाट अतिशय डौलदार व त्यावरील शैलीदार अलंकरणामुळे लगेच नजरेत भरतात. ही मृत्पात्रे घोटीव, विविध आकारांची, नक्षीकामाने व चित्रकामाने सुशोभित केलेली आढळतात. त्यांपैकी काही मृत्पात्रे अंड्याच्या कवचासारखी पातळ, अत्यंत चकचकीत व सुडौल असत. कुंभार त्यांच्या बनावटीत चाकाचा उपयोग करीत. यात काळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर पांढऱ्या व लाल रंगांनी सापासारख्या गतिमान रेषा व वनस्पतींचे आलेखन चित्रित केलेले दिसते. परंपरागत प्रतीके, भौमितिक आकृतिबंधापासून ते कठीण आलंकारिक रूपापर्यंत या कलेचा विकास क्रमशः झाला.
शिल्पकला :
मिनोअन काळात फार कमी शिल्पमूर्ती आढळल्या आहेत. देवता आणि राजांना समर्पित केलेल्या या मुर्ती फार मोठ्या आकारांत सापडत नाहीत. मृत्तिका, लाकूड, हस्तिदंत, धातू तसेच दगडाच्या माध्यमांत या शिल्पमूर्तींची निर्मिती केलेली आढळते. येथील पहिली सर्प मातृदेवतेची मृत्स्नामुद्रा एव्हान्झ यांना १९०३ मध्ये नॉसस प्रासादाच्या देवळात सापडली. इ. स. पू. १६०० मधील या मूर्तीत देवतेच्या दोन्ही हातांत सर्प दाखविले आहेत. डोक्यावर मुकुट असून त्यावर मांजर बसलेली दाखविली आहे. देवीने कमरेपर्यंत लांब झगा घातलेला असून तिचा वक्षभाग उघडा आहे. कमरेवर जाड पट्टा लावलेला दाखविला आहे. या मूर्तीत नैसर्गिक जिवंतपणा आढळतो.
प्रासादातील अन्य दोन मूर्ती एखाद्या पवित्र स्थळाच्या भिंतीवरील उठावशिल्पे असावीत. एका मृत्स्नामुद्रेमध्ये शेळी व तिचे पिल्लू असून ते स्तनपान करताना दाखविले आहे, तर दुसऱ्या मुद्रेमधे गाय व तिचे वासरू असून तेही स्तनपान करताना दाखविलेले दिसते. पलाइकास्त्रो कोरोस (Palaikastro Kouros) हे हस्तिदंती नग्नपुरुषाचे शिल्प क्रीट पलाइकास्त्रो येथून मिळाले. साधारण ५० सेंमी. उंच असलेल्या या शिल्पाचे धड, पाय, हात व पायाच्या तळव्यांवर सोन्याचा मुलामा दिलेला आढळतो. त्याच्या शिराची घडण धडापेक्षा वेगळी दिसेल, अशी बनविलेली दिसते. डोळे करड्या-हिरव्या रंगातील सर्पेंटिनाइट (serpentinite) या स्फटिकाचे करून बसविलेले आहेत.
नॉससच्या प्रासादात वळूचे डोके (इ. स. पू. १६००–१५००) असलेले स्टिअटाइटमध्ये कोरलेले सु. २६ सेंमी. आकारातील एक शिल्प मिळाले असून, त्याच्या बसविलेल्या लाकडी शिंगांना सुवर्णविलेपन केलेले आहे. डोळे लाल रंगातील सूर्यकांत मण्याचे (jasper) लावलेले असून, नाकाभोवती शंख अथवा संगमरावराच्या जडावकामात पांढऱ्या रेषा दाखविल्या आहेत. बैलाच्या डोक्यावरील केस बारीक रेषांनी कोरलेले दिसतात.
क्रीटच्या समुद्रकिनाऱ्यावरील हेजिया त्रियादा (Hagia Triada) येथे मिळालेली दगडातील गोल भांड्यांवरील उठावशिल्पे विशेष उल्लेखनीय आहेत. यांतील पीक घेणारे भांडे (Harvester Vase) सर्पेंटिनाइट दगडातून शहामृगाच्या अंड्याच्या आकारांत कोरून काढलेले आहे. मूलतः हे भांडे सोन्याच्या वर्खामधे आच्छादलेले होते. भांड्यावर धान्यलागवड करतानाची दृश्ये कोरलेली आहेत. तसेच स्टिअटाइटमध्ये बनविलेले सु. ४७ सेंमी. इतक्या उंचीचे मुष्टियोद्धा भांडे (Boxer Vase) हे एखाद्या प्राण्याच्या शिंगासारखे सडपातळ आहे. भांड्याच्या तोंडाजवळ जाड कडा असून भांडे हाताळायला कान कोरलेला दिसतो. भांड्याचा संपूर्ण पृष्ठभाग चार भागांत विभाजित केलेला असून त्यांत वेगवेगळ्या दृश्यांचा समावेश आहे. वरच्या व खालच्या दोन भागांत मुष्टियुद्ध आणि कुस्ती असे खेळ दाखवलेले असून कुस्ती खेळणाऱ्या खेळाडूंनी शिरस्त्राण परिधान केलेले दाखविले आहे. मधल्या भागात वळू-उडवण्याचा खेळ कोरलेला दिसतो. पिळदार स्नायू असलेल्या खेळाडूंची केवळ कंबर झाकलेली असून त्यांना हातमोजे, उंच बूट घातलेले दाखविले आहेत. त्यांची शरीररचना, त्यांच्या चेहऱ्यावरील-शरीरावरील ताण आणि त्यांची खेळतानाची शारीरिक हालचाल सफाईदारपणे कोरली आहे. त्यात जिवंतपणा आढळतो.
धातुकाम :
मिनोअन लोकांची धातुकामातील प्रगती उल्लेखनीय आहे. त्यात विविधता आढळते. बाहेरून आयात केलेले सोने, चांदी, कांस्य हे धातू वितळवून ते अनेक प्रकारच्या वस्तू बनवीत असत. उठावरेखन (embossing), सुवर्णलेपन (gilding), नियलो जडावकाम (niello inlay), मृत्स्ना (faience) व मेणाच्या वस्तू बनवून केलेले ओतकाम (lost wax casting) अशा विविध तंत्रांमध्ये वस्तू त्यांनी बनविल्या. मालिया येथील थडग्यातून मिळालेले मध्य मिनोअन काळातील सोन्यामध्ये केलेले मधमाशीचे पदक (bee pendant), तसेच देवळाचे दृश्य दर्शविणारी सोन्यात कोरलेली अंगठी या वस्तू मिनोअन सृजनशीलतेची साक्ष देतात.
संदर्भ :
- Betancourt, Philip P. Introduction to Aegean Art, Philadelphia, 2007.
- Hafner, German, Art of Crete, Mycenae and Greece, New York, 1968.
- Higgins R. Minoan and Mycenaean Art, Thames & Hudson, 1997.
- Nelson, Glenn C. Ceramics : A potter’s handbook, Duluth, 1971.