इजीअन समुद्रातील बेटांमध्ये तसेच आसपासच्या प्रदेशात अश्मयुग (इ. स. पू. ७००० ते ३०००) व प्रागैतिहासिक कांस्य (ब्राँझ) युगात (इ. स. पू. सु. ३००० ते ११००) विकसित झालेल्या यूरोपमधील पहिल्या प्रगत संस्कृतीस ‘इजीअन संस्कृती’ असे म्हटले जाते. जर्मन संशोधक हाइन्रिख श्लीमान यांनी या संस्कृतीचा शोध लावला. इजीअन समुद्र हा पूर्व भूमध्यसागराचा उत्तरी भाग असून ह्याचा किनारा खाड्यांमुळे अनियमित झालेला आहे. त्याच्या मध्यभागी अनेक छोटी-मोठी बेटे तयार झालेली असून भौगोलिक दृष्ट्या ह्या प्रदेशात क्रीट (Crete), सिक्लाडीझ (Cyclades), ग्रीस (Greece) चा दक्षिण व आग्नेय भाग म्हणजे पेलोपनिससचे द्वीपकल्प तसेच आशिया मायनरचा पश्चिम किनारा (West coast of Asia minor) अर्थात तुर्कस्तानचा पश्चिम व मुख्यत्वे वायव्य भाग या भूभागांचा समावेश होतो.
इजीअन संस्कृतीत प्राचीन कलांमधील ग्रीक कला-संस्कृतीच्या आधीच्या अभिजात कलांमधील सामान्यत: अनुक्रमे सिक्लाडिक, मिनोअन व मायसीनीअन या तीन कलात्मक संस्कृतींचा समावेश होतो. क्रीट येथील कांस्ययुग संस्कृतीला येथील राजा मिनोज वरून मिनोअन असे ओळखले जाते, कारण नॉसस राजा मिनोज याच्यानंतर हे द्वीपसमूहाचे मुख्य केंद्र होते. प्रचंड मोठे प्रासाद, उत्तम कलाकुसर व लेखन आत्मसात करणारी क्रीटच्या बेटावर विकसित झालेली यूरोपियन मातीवरील ही पहिली प्रगल्भ संस्कृती. नंतरच्या काळात मुख्य भूप्रदेशाच्या लोकांनी क्रीट संस्कृतीशी जुळवून घेत हळूहळू त्यांची संस्कृती प्रस्थापित केलेली दिसते. सिक्लाडीझ बेटांवरील कांस्ययुगाला सिक्लाडिक (Cycladic) तर मुख्य भूप्रदेशाला येथील हेलास (Hellas – ग्रीसचे ग्रीक भाषेतील नाव) जातीच्या लोकांवरून हेलाडिक (Helladic) असे ओळखतात. इ.स.पू. सोळाव्या शतकापासून क्रीटच्या प्रभावाखाली आलेले मायसीनी हे मुख्य भूमीवरील ग्रीसमधील हेलाडिक संस्कृतीचे प्रमुख केंद्र होते. यावरूनच हा भूप्रदेश मायसीनीअन संस्कृतीच्या नावाने ओळखला जातो.
इजीअन संस्कृतीमध्ये नवाश्मयुग ते कांस्ययुगात होणारे संक्रमण तसेच कांस्ययुगातील प्रारंभिक, मध्य व उत्तर काळाचे विभाजन संशोधकांनी प्रत्येक स्वतंत्र संस्कृतीशी निगडित असलेले अवशेष, मृत्पात्रे व त्यांची बदलणारी शैली तसेच इतर उत्पादने व भौतिक बदलांवरून केलेले दिसते. इजीअन कलाकारांनी त्यांची स्वतंत्र शैली विकसित केल्याचे दिसते. इ. स. पू. ३००० ते २००० च्या दरम्यान धातूचा वापर करणाऱ्या संस्कृतींची भरभराट क्रीट, सिक्लाडीझ बेटांवर आणि मुख्य भूभागाच्या दक्षिणेकडील भागांत झालेली दिसते.
सिक्लाडिक कला :
सुरुवातीच्या काळात इजीअन कला अस्तित्वात आली ती ‘सिक्लाडीझ’ ह्या ग्रीसची मुख्य भूमी आणि तुर्कस्तान यांमधील समुद्रात असलेल्या अनेक छोट्या छोट्या बेटांच्या समूहावर. नॅक्सास (Naxos), मिलॉस (Melos), पॅरोस (Paros), थीरा (Thera), सिफनोस (Siphnos), आयोस (Ios), कीआ (Kea), अँड्रोस (Andros), टेनॉस (Tenos) आणि मिकोनोस (Mykonos) ही यांतील प्रमुख बेटे होत.
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ग्रीक पुरातत्त्वज्ञ क्रिस्टोझ त्सोन्टस (Christos Tsountas) ह्यांनी केलेल्या सिक्लाडीझ बेटांवरील संशोधनानंतर सिक्लाडिक संस्कृती उजेडात आली. सिक्लाडीझ बेटांवर साधारण इ. स. पू. ५००० वर्षांपूर्वीचे अवशेष सापडले असले तरीही खऱ्या अर्थाने येथील संस्कृती इ. स. पू. २६०० ते ११०० ह्या कालावधीतील कांस्ययुगात विकसित झाल्याचे दिसते: प्रारंभिक (इ. स. पू. ३०००-२२००), मध्य (इ. स. पू. २२००-१७००) व उत्तर (इ. स. पू. १७००-११००) कांस्य युग.
या बेटांवर सापडणारे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ज्वालामुखीच्या लाव्हापासून तयार झालेली ज्वालाकाच (obsidian). इजीअन संस्कृती आणि भूभागात ज्वालाकाचेची निर्यात मोठ्या प्रमाणात झालेली दिसते, तसेच तिचा उपयोग लोकांनी प्रामुख्याने कापण्यासाठी लागणारी हत्यारे बनविण्यासाठी केल्याचे आढळते. मिलॉस हे बेट ह्या अत्यंत उपयुक्त व्यापारी मालासाठी श्रीमंत होते. सिक्लाडीझ बेटांवर उपलब्ध असलेल्या संगमरवराचाही वापर तेथील लोकांनी विविधप्रकारे उदा., लाद्या, शिल्पे आणि शोभेची पात्रे बनविण्यासाठी केलेला दिसतो. सिक्लाडीझ बेटांवरून ज्वालाकाच व संगमरवराच्या निर्यातीबरोबर गंधक व तांबे यांचीही निर्यात मोठ्या प्रमाणात झाल्याचे इतर समकालीन संस्कृतींत मिळालेल्या अवशेषांवरून आढळते.
वास्तुकला :
प्रारंभिक सिक्लाडिक काळातील फार कमी वसाहतींचे अवशेष उपलब्ध झाले आहेत. अनेक इमारतींच्या दगडी पायांचे अवशेष सापडले आहेत. त्यावर बहुतेक कच्च्या मातीचे बांधकाम केलेले असावे. ते आता अस्तित्वात नाही. प्रारंभिक सिक्लाडिक काळाचे ग्रोत्ता-पेलोस (Grotta-Pelos), केरोस-सायरोस (Keros-Syros) व कास्त्री (Kastri) अशा तीन भागांत वर्गीकरण होते. त्यांतील तिसऱ्या ‘कास्त्री संस्कृती’तील सिरॉस (Syros) येथे मिळालेल्या भव्य तटबंदीवरून या काळातील लोकांनी संरक्षणात्मक वास्तुशास्त्राचे ज्ञान मिळविलेले होते, असे आढळते. सुरुवातीच्या काळातील इतर अवशेषांमध्ये सिरॉस (Syros) आणि अँड्रोस (Andros) येथे सापडलेली थडगी, विविध दफन पद्धती तसेच तटबंदी यांसाठी संगमरवराच्या लाद्यांचा वापर केलेला दिसतो.
चित्रकला :
सिक्लाडिक काळातील इमारतींचे अवशेष कमी मिळाल्याने भित्तिचित्रेही फार कमी प्रमाणात उपलब्ध झाली आहेत. मिलॉस येथून उत्तर सिक्लाडिक (इ. स. पू. १६००) काळातील काही चित्रांचे अवशेष मिळाले आहेत. येथील एका चित्रात उड्या मारत असलेले समुद्रातील मासे असे दृश्य दाखवलेले असून हे भित्तिलेपचित्रण तंत्राने केलेले आहे. आता हे चित्र अथेन्समधील राष्ट्रीय पुरातत्त्व संग्रहालयामध्ये जतन करून ठेवलेले आहे. सर्वांत महत्त्वाचे भित्तिलेपचित्रांचे अवशेष थीरा येथील अक्रोतिरी (Akrotiri) येथील इमारतींच्या वरच्या मजल्यावरील छपरावर व भिंतीवर सापडले आहेत. यांतील काही लघुचित्रे असून ती सामान्यत: एखाद्या व्यक्तीच्या डोळ्याच्या पातळी इतकी उंचीवर केलेली आहेत. या खोलीच्या भिंतीवरील वरच्या भागातील शोभेच्या पट्ट्यांमधील लघुचित्रांमध्ये लहान लढाऊ जहाजांचा तांडा तसेच नौदलाची लढाईची दृश्ये दाखवलेली आढळतात. अक्रोतिरी येथील या भित्तिलेपचित्रांमध्ये सफेद, काळा, तांबडा, निळा आणि पिवळा असे वनस्पती आणि खनिज द्रव्यापासून तयार केलेले रंग वापरलेले दिसतात. चित्रांमध्ये एकांडी मानवाकृती, सागरी जीवनाची दृश्ये, फुले वा फळे तोडताना, केशर गोळा करताना दाखवलेली दृश्ये, उपासना करणाऱ्या मानवाकृती, तसेच इतर धार्मिक विषय दाखवलेले दिसतात.
शिल्पकला :
वैशिष्ट्यपूर्ण कलाकृतींमध्ये समाविष्ट होणाऱ्या संगमरवरातील अत्यंत शैलीबद्ध अशा मानवाकृती शिल्पांची संपूर्ण सिक्लाडिक कलासंस्कृतीमध्ये निर्मिती झालेली दिसते. ह्या शिल्पांची उंची काही इंचांपासून काही फुटांपर्यंत आढळते. सुरुवातीच्या सिक्लाडिक काळात, ‘रजस्राव कालातील स्त्री’ ही प्रतीकात्मकरीत्या व्हायोलिनच्या (violin) स्वरूपात दाखवलेली दिसते. नंतरच्या कालावधीत, शिल्पाकृतींमध्ये उजवा हात डाव्या हाताखाली अशी हातांची घडी घातलेल्या, चेहऱ्यावर नाकाव्यतिरिक्त इतर कोणतेही बारकावे नसलेल्या, नग्न स्त्री-आकृत्यांचे प्रमाण अधिक दिसते. ही स्त्री-शिल्पे स्त्री व पुरुष दोहोंच्या थडग्यांत पुरल्याचे दिसून आल्याने काही तज्ज्ञांच्या मते बहुतकरून ही स्त्री-शिल्पे अंत्यकर्म विधीसाठी वापरात असावीत. वाद्य वाजवणाऱ्या पुरुष-आकृतींमध्ये प्रामुख्याने बसून तंतुवाद्य वाजवणारी त्रिमितीय शिल्पे तर उभ्याने पावा वाद्य वाजविणारे पुरुष-शिल्प प्रसिद्ध आहे.
सर्वच सिक्लाडिक मानवाकृती शिल्पे पाचारटी-शरीरयष्टी असलेली म्हणजे सपाट, भौमितिक आकार-शैलीत केलेली आढळतात. शिल्पांचे चेहरे अंडाकृती, फक्त डोळे व नाकाची बाह्यरेषा असलेले, कोणत्याही हावभावाशिवाय केलेले
दिसतात. या काळात उच्च प्रतीच्या पांढऱ्या संगमरवरापासून विशिष्ट कला-तंत्राचा वापर करून पात्रे बनविल्याचे दिसते. या तंत्रात संगमरवराला हवा तो आकार देण्यासाठी, त्यामध्ये पोकळ वेताचा छिद्रण किंवा वेधणासाठी (boring) गरगर फिरवून तसेच त्यात अपघर्षणासाठी नॅक्सॉसहून आणलेल्या कुरुंद (emery) अथवा वाळूचा उपयोग केला जात असावा.
मृत्पात्री :
सिक्लाडिक कला-संस्कृतीतील सुरुवातीच्या टप्प्यातील मृत्पात्रांवर नागमोडी रेषा, धावती चक्रे, जहाज वा गलबते अशी सागरी जीवनाची प्रतीके असलेली रूपचिन्हे चित्रित केलेली आढळतात. कांस्ययुगातील या मृत्पात्रांमध्ये, प्रामुख्याने खोदीव रेषा अथवा पांढऱ्या रंगाने केलेले नक्षीकाम असलेली गडद रंगातील मृत्पात्रे मुबलक प्रमाणात उपलब्ध झालेली दिसतात. उदा., लहान ताटलीसारखी पसरट भांडी, पेय पिण्याकरिताची भांडी, सॉस अथवा रस्सा ओतण्याचे अंडाकृती खोलगट वाडगे (sauce or gravy-boat), तळण्यासाठी वापरले जाणारा खोल तवे (frying-pan).
अंडाकृती खोलगट वाडगे हे धातू आणि माती अशा दोन्ही माध्यमात केलेले दिसते. या वाडग्याला एका बाजूस धरण्यासाठी मूठ असते, तर मुठीच्या विरुद्ध बाजूस रस्सा ओतण्यासाठी चोच असते. या वाडग्याला तळाशी उभे करण्याकरिता एक कडे अथवा पादपीठ असते. या वाडग्याचा उपयोग सॉस, रस्सा, आसव, तेल यांसारखे द्रवपदार्थ ओतण्यासाठी केला जात असावा. प्रारूपिक गुळगुळीत तांबडे वा गडद रंगाचे लेपन असलेले ‘सॉस ओतण्याचे वाडगे’ म्हणजे प्रारंभिक कांस्ययुगाच्या मुख्यभूमीचे खास वैशिष्ट्य होते.
प्रारंभिक सिक्लाडिक-II काळातील प्रामुख्याने सिरॉस येथील थडग्यांतून मिळालेली अभिलाक्षणिक मृत्पात्रे म्हणजे तळण्यासाठी वापरात असलेला खोल तवा. ‘तळण-तवा’ धरण्यासाठी छोटी दुहेरी अथवा चौकोनी मूठ असलेले हे तळण-तवे पक्वमृदेमध्ये (टेराकोटामध्ये) केलेले असून त्यांच्या तळपृष्ठावर तसेच बऱ्याचदा तव्याच्या कडांवर बाहेरील बाजूस कोरीव आणि दबाव तंत्राने चित्रण केलेले दिसते.
गडद रंगातील पृष्ठभागावरील कोरीव चिरा व ठसे हे केओलीन (kaolin) या खडूसारख्या घट्ट पदार्थांनी भरलेले असल्याने ते उठून दिसतात. खूपदा तव्याच्या मुठीच्या तळपृष्ठावर तर कधीकधी मुठीच्यावरील पृष्ठावरही चित्रण केलेले आढळते.
ह्या तळण-तव्यांवर असलेल्या चित्रणातून तत्कालीन नौवाहनाचा विकास आणि त्याचे सिक्लाडिक संस्कृतीच्या जीवनात असलेले महत्त्व प्रत्ययास येते. प्रारंभिक सिक्लाडिक कालातील चित्रणात जहाजांचे प्रकार चित्रित केलेले दिसतात. चित्रणात नौकामुख तसेच वल्हे दाखविलेले असले, तरी शीड दाखवलेले आढळत नाही. याव्यतिरिक्त भौमितिक आकार जसे समकेंद्रित वर्तुळे, चक्राकार व नागमोडी रेषा, तारा अथवा चौफुलीचे रूपचिन्ह असे सूर्य व समुद्र दर्शविणारे आकार तळण-तव्यांच्या तळपृष्ठावर चित्रित केलेले आढळतात.
१८२९ मध्ये मिलॉस येथील थडग्यांतून ब्रिटीश नाविक दलाचे अधिकारी कॅप्टन कोप्लान्ड (Capt. Copeland R. N.) यांना प्रारंभिक सिक्लाडिक काळातील (इ. स. पू. २३०० ते २२००) जार (Jar) सारख्या मृत्पात्रांबरोबर पक्वमृदेतील एक विशिष्ट धारकपात्र मिळाले; या धारकपात्राला ‘केरनॉस’ (kernos) असे संबोधतात, ज्याचा वापर विविध वस्तू अर्पण करण्यासाठी केला जात असावा. ह्या केरनॉसची त्याच्या पायासह उंची ३४.६ सें. मी. इतकी असून आतील बाजूस ९ व बाहेरील बाजूस १६ अशा एकूण २५ तोट्या पायावर जोडलेल्या आहेत.
सिक्लाडीझ लोक सांस्कृतिक दृष्ट्या अनातोलिआ (Anatolia) व ग्रीस मुख्य भूमीशी प्रारंभिक काळापासूनच जोडलेले होते. ईआसोस (Iasos), मिलेटस (Miletus), लिमन टेपे (Liman Tepe), बक्ला टेपे (Bakla Tepe) आणि ट्रॉय (Troy) येथे मिळालेल्या दफन विधीच्या पद्धतीपासून मृत्पात्री आणि इतर सिक्लाडिक अवशेषांवरून आयात निर्यातीच्या व्यापाराचा पुरावा मिळतो.
इजीअन भूबेटांवरील ग्रीक मुख्य भूमी, क्रीट आणि पश्चिम ॲनातोलिआवर इ. स. पू. ३००० नंतर म्हणजे कांस्ययुगापासून सिक्लाडिक संस्कृतीचा प्रभाव दिसून येतो. इ. स. पू. २००० पासून शिडाच्या नौका वापरणारे तसेच या नौका वा बोटी बनवण्याच्या तंत्रज्ञानात अग्रेसर असणाऱ्या दर्यावर्दी मिनोअन लोकसंस्कृतीने इजीअन समुद्रावर वर्चस्व गाजविण्यास सुरुवात केलेली दिसते. सिक्लाडिक कला-संस्कृती क्रीट येथील संस्कृतीच्या आधीची असल्याने आरंभीच्या काळात सिक्लाडिक संस्कृतीचा मिनोअन संस्कृतीवर-क्रीटन कलेवर-प्रभाव पडलेला दिसतो. मिनोअन कलाकारांनी सिक्लाडिक तंत्रांचा अवलंब केल्याचे अघिया फोशिया (Aghia Photia) व नॉसस (Knossos) येथे सापडलेल्या सुरुवातीच्या कलाकृतींवरून दिसून येते.
संदर्भ :
- Betancourt, Philip P., Introduction to Aegean Art, 2007.
- Bosanquet, Robert Carr. 1896–1897. “Notes from the Cyclades.” Annual of the British School at Athens, 3: nos. 8, 60, p. 58.
- Cline, E.H., The Oxford Handbook of the Bronze Age Aegean, USA, 2012.
- Doumas, Ch., The Wall-Paintings of Thera, Athens, 1992.
- Hafner, German, Art of Crete, Mycenae, and Greece, New York, 1968.
- Vasif Sahoglu, Lecture given on Tuesday, 8 March 2016., ‘Cycladica’ around the Urla Peninsula, Izmir during the 3rd and 2nd Millennia BC. Archaeology Newsroom.
समीक्षण : नितीन हडप