सूरी, निर्मल चंद्र : (२६ जुलै १९३३). भारतीय हवाई दलाचे माजी प्रमुख व एक निष्णात वैमानिक. त्यांचा जन्म सुशिक्षित व सुसंस्कृत मातापित्यांच्या पोटी झाला. सुरुवातीचे शिक्षण कोलकात्यातील सेंट झेव्हिअर विद्यालयात घेऊन त्यांनी प्रिन्स ऑफ वेल्स इंडियन मिलिटरी स्कूल (डेहराडून) येथे पुढील शिक्षण घेतले आणि रॉयल इंडियन मिलिटरी कॉलेज (डेहराडून)–राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी खडकवासला, पुणे या संस्थेची पूर्वशाखा– मधून पदवी संपादन केली (१९५२). त्यांची भारतीय हवाई दलात चार क्रमांकाच्या स्क्वॉड्रनमध्ये (लढाऊ विमानांची तुकडी) फ्लाइट लेफ्टनंट म्हणून नियुक्ती झाली (१९५२). त्यांनी उड्डाणविषयक प्रशिक्षणानंतर आक्रमक वैमानिकाचा अभ्यासक्रम (प्रशिक्षकाचा) पूर्ण केला (१९६०) आणि नंतर ते स्क्वॉड्रन क्रमांक २० मध्ये कमांडंट पदावर रुजू झाले.
त्यांनी अनेक वैमानिक तुकड्यांचे आधिपत्य गाजविले. आपल्या अखत्यारीतील स्क्वॉड्रनमध्ये सुधारणा केल्या. त्यांनी दोन स्क्वॉड्रन व दोन फायटर किंग पथकाचे हवाई निदेशक म्हणून ए-वन प्रमाणपत्र मिळविले. भारत-पाकिस्तान युद्धात (१९६५) एका पूर्ण हवाई दलाची बाजू सांभाळली. त्यानंतर डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजमध्ये (वेलिंग्टन) संदर्भ साहित्याचा धांडोळा घेऊन ‘मिलिटरी हिस्टरी’ हा शोधनिबंध लिहिला व तो अलाहाबाद विद्यापीठात सादर करून एम.एस्सी. पदवी मिळविली (१९६९). १९७१ मध्ये शैक्षणिक कामानिमित्त त्यांनी इराकला धावती भेट दिली. त्यानंतरच्या भारत-पाकिस्तान युद्धात (१९७१) त्यांनी विशेष धैर्य दाखवून नेत्रदीपक कामगिरी केली. याशिवाय त्यांनी हवाई दलाच्या मुख्यालयात व संचालनालयात अनेक मान्यवर पदे भूषविली. ते वैमानिकी आक्रमक हल्ल्याचे प्रशिक्षक, गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख, कर्मचारी वर्गाचे कार्याध्यक्ष आणि काही काळ संचालकही होते. लोहगाव (पुणे) येथील कार्यालयाचे विंग कमांडर असताना (१९७९–८२) त्यांना उत्तम कार्याबद्दल एव्हीएसएम पुरस्कार मिळाला.
त्यांनी पदोन्नतीने स्क्वॉड्रन लिडर, विंग कमांडर, ग्रुप कॅप्टन, एअर कमांडर, एअर व्हाइस मार्शल (१९८७), एअर मार्शल (अलाहाबाद मध्यवर्ती हवाई कार्यदलात) वगैरे उच्च पदे भूषविली. एअर चीफ मार्शल एस्. के. मेहरा यांच्या निवृत्तीनंतर (१९९१) केंद्र शासनाने त्यांची हवाई दलाचे प्रमुख म्हणून १ ऑगस्ट १९९१ रोजी नियुक्ती केली. या पदावरून ते ३१ जुलै १९९३ रोजी निवृत्त झाले. त्यांच्या प्रमुखपदाच्या कारकिर्दीत भारतीय हवाई दलाचा सुवर्ण महोत्सव धुमधडाक्यात संपन्न झाला. त्या वेळी या दलातील काही ऐतिहासिक सुवर्णक्षण एका चित्रफितीत संग्रहित केले. ती चित्रफीत ‘सॉल्ट ऑफ दी अर्थ’ या नावाने प्रकाशित करण्यात आली व विविध हवाई दल केंद्रांतून दाखविण्यात आली. याशिवाय प्रथमच सूरींनी हवाई दलात स्त्रियांची अधिकारी पदावर कार्यालयातून नियुक्ती करण्याचा पायंडा पाडला आणि काही तरुणींना प्रशिक्षित करून विमानचालक (पायलट) पदीही त्यांची नियुक्ती केली.
त्यांच्या हवाई दलातील कार्यक्षम कार्यकर्तृत्वाबद्दल त्यांना अनेक मानसन्मान लाभले. त्यांपैकी वायुसेना पदक (१९६९), अतिविशिष्ट सेवापदक (१९८२), परमविशिष्ट सेवापदक (१९८८) ही महत्त्वाची व प्रतिष्ठित होत. त्यांनी राष्ट्रपतींचे परिसहायक (ए.डी.सी.) म्हणून १९८८ मध्ये काम केले. निवृत्तीनंतर त्यांना नेदर्लंड्सच्या विद्यापीठाने पीएच्.डी. (१९९६) पदवी प्रदान केली. त्यांच्या सुविद्य पत्नी आझा यांनी त्यांच्या लष्करेतर सामाजिक कार्यात सहकार्य केले असून त्या ‘वायुसेना स्त्री : स्वास्थ्य संघठन’ या संस्थेच्या अध्यक्षा होत्या.
विद्यार्थिदशेपासून सूरींनी मुष्टियुद्ध, जलतरण, मच्छ पारध (फिशिंग स्पोर्ट), संगीत इ. छंद जोपासले आहेत. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील त्यांच्या मित्रमंडळीत ते ‘भारती गोवाला’ या नावाने प्रसिद्ध होते. आपल्या प्रदीर्घ हवाई दलातील कारकिर्दीत त्यांनी सु. ६,२०० तासांचा विमानोड्डाणाचा पराक्रम केला.
उर्वरित जीवन ते वाचन-लेखन व आपले छंद जोपासण्यात नोएडा येथे व्यतीत करीत आहेत.
संदर्भ :
- http://www.bharat-rakshak.com/IAF/personnel/chiefs/265-nc-suri.html
- https://indianairforce.nic.in/content/nirmal-chandra-suri-pvsm-avsm-vm-adc-cas-0
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.