ब्राझीलमधील एक प्रमुख नदी. सॅन फ्रँसीश्कू किंवा रीओ साऊँ फ्रँसीश्कू या नावांनीही ती ओळखली जाते. ब्राझीलच्या पूर्व भागातील मीनास झिराइस या राज्याच्या नैर्ऋत्य भागात सेरा दा कानास्रा डोंगररांग आहे. या डोंगररांगेत सस.पासून १,२७६ मी. उंचीवर तिचा उगम होतो. साऊँ फ्रँसीश्कू व तिच्या उपनद्यांनी मिळून तयार झालेली नदीसंहती ही ब्राझीलियन उच्चभूमी प्रदेशातील सर्वांत मोठी नदीसंहती आहे. तिचे संपूर्ण खोरे ब्राझीलमध्येच आहे. नदीची एकूण लांबी २,९१४ किमी. असून जलवाहन क्षेत्र ६,३१,१३३ चौ. किमी. आहे. ब्राझीलियन उच्च प्रदेशातून प्रथम उत्तरेस, त्यानंतर ईशान्येस व शेवटी आग्नेयीस ही नदी वाहत जाऊन आराकाझूच्या उत्तरेस सु. १०० किमी.वर अटलांटिक महासागराला मिळते.

साऊँ फ्रँसीश्कूचा बराचसा प्रवाह ब्राझीलच्या पूर्व किनाऱ्याला साधारण समांतर असणाऱ्या खचदरीतून वाहत जातो. नदीप्रवाहाच्या तीन टप्प्यांपैकी पहिला टप्पा हा उगमापासून मीनास झिराइस राज्याच्या उत्तरमध्य भागातील पीरापॉरा शहराजवळील द्रुतवाहापर्यंतचा असून तो जलवाहतुकीस उपयुक्त नाही. ही नदी लहान-लहान द्रुतवाह व प्रपातमालिकांधून उत्तरेस खाली उतरत जाते. पीरापॉरा शहराजवळ ती सस.पासून ४७० मी. पर्यंत खाली उतरली आहे. पीरापॉरा ते बाईआ राज्याच्या उत्तर भागातील झ्वाझेरू यांदरम्यानच्या मधल्या टप्प्यातील १,३६८ किमी. लांबीचा तिचा प्रवाह नियमितपणे जलवाहतुकीस उपयुक्त आहे. उजवीकडून मिळणारी रीओ दास वेल्हास तसेच डावीकडून मिळणाऱ्या पाराकाटू , कारीन्हान्हा, कॉरेंटे व रीओ ग्रांदे या तिच्या प्रमुख उपनद्या असून त्याही जलवाहतुकीस उपयुक्त आहेत.

साऊँ फ्रँसीश्कू नदीवरील पाउलू आफोंसू धबधबा

साऊँ फ्रँसीश्कू नदी खालच्या टप्प्यात झ्वाझेरूपासून पुढे सुमारे १६० किमी. अंतरावरील काब्रोबो येथे काटकोनात एक मोठे वळण घेऊन आग्नेयवाहिनी होते. तेथून पुढे तिच्या सुमारे ४८० किमी. लांबीच्या प्रवाहमार्गात अनेक प्रेक्षणीय द्रुतवाह व धबधबे आढळतात. मुखापासून आत सुमारे २४० किमी.वर असलेल्या पाउलू आफोंसू या जलप्रपाताचे पाणी ८२ मी. खोल पडते. द्रुतवाह व जलप्रपातांनी युक्त प्रवाहमार्ग ओलांडल्यानंतर सुमारे २४० किमी. वाहत गेल्यावर सेरगिपे-देल-रे नगराजवळ ही नदी उत्तरेकडील आरीकारी व दक्षिणेकडील फ्रँसीस्को दो सूल अशा दोन मुखांनी अटलांटिक महासागराला मिळते. मुखाजवळ तिचे पात्र १.६ किमी. रुंदीचे आहे. ब्राझीलमधील ही एक प्राचीन नदी असून एकेकाळी मोठ्या वळणाच्या ईशान्येस साऊँ रोक भूशिराजवळ ती अटलांटिकला मिळत असावी. जेथे काटकोनातील वळण प्राप्त झाले आहे, तेथेच नदीचौर्य कार्यामुळे नदीचे पात्र बदलले गेले असावे. नदीचा खालचा टप्पा बराच लहान असून तो जलवाहतूकयोग्य आहे. या टप्प्यात गाळाची सुपीक पूरमैदाने निर्माण झाली आहेत. हा भाग ईशान्य ब्राझीलमधील आर्द्र प्रदेश असून तेथे भातशेती केली जाते.

नदीच्या वरच्या टप्प्यातील खोऱ्यात काटेरी वनस्पती आढळत असून त्यांत प्रामुख्याने कॅरोआ (तंतू उत्पादक), मॅमोना (तेल उत्पादक), खजूर, काजू , रबर इत्यादी प्रकारचे वृक्ष आढळतात. तसेच तेथे कृषी प्रदेशही आहे. मधल्या टप्प्याच्या वरच्या भागात शुष्क हवामानामुळे गवताळ प्रदेश व निम पानझडी वृक्षांची अरण्ये आढळतात. येथे उदरनिर्वाहासाठी शेती व पशुपालन व्यवसाय केला जातो.

नदीतील पाण्याचे वार्षिक सरासरी प्रवाहमान प्रति सेकंदाला २,९०० घ.मी. असून ऋतुनुसार त्यात चार ते पाच पटीने फरक पडतो व पाण्याच्या पातळीत १० मी.ची तफावत आढळते. तिच्या बहुतांश उपनद्या हिवाळ्यात कोरड्या पडलेल्या असतात; कारण नदीखोऱ्यात प्रामुख्याने उन्हाळ्यात वृष्टी होत असून वर्षातील उर्वरित काळ शुष्क असतो. नदीची संभाव्य जलविद्युतनिर्मिती क्षमता सुमारे ५२० द. ल. किवॉ. इतकी आहे. टेनेसी व्हॅली ऑथॉरिटीच्या धर्तीवर साऊँ फ्रँसीश्कू खोऱ्यात पाउलू आफोंसू धबधब्याजवळ १९४९ मध्ये जलविद्युतनिर्मिती प्रकल्पाच्या उभारणीस सुरुवात करण्यात आली. ईशान्य ब्राझीलला विद्युत पुरवठा करणे, अवर्षणग्रस्त भागाला पाणीपुरवठा करून शेतीउद्योगाला प्रोत्साहन देणे, ईशान्य ब्राझीलमधील राज्यात औद्योगिकीकरणाला चालना देणे इत्यादी दीर्घकालीन योजनांचा यात समावेश आहे. या नदीच्या प्रमुख उपनद्यांचाही या योजनेत समावेश करण्यात आला आहे. ट्रेस मारिआस (पाउलू आफोंसू), इटापारिका, सोब्रादिन्हो व मोक्सोटो हे या नदीखोऱ्यातील प्रमुख जलविद्युतनिर्मिती प्रकल्प आहेत. साऊँ फ्रँसीश्कू नदीसंहती म्हणजे ब्राझीलच्या अंतर्गत भागांतील प्रमुख जलमार्ग आहे. नदीतील मत्स्योत्पादनही महत्त्वाचे आहे.

समीक्षक : माधव चौंडे