जलप्रवाह आपल्या पात्राचा तळ ज्या निम्‍नतम पातळीपर्यंत झिजवू शकतो, ती पातळी म्हणजे आधारतल. जलप्रवाह समुद्राला मिळत असेल, तर ही पातळी समुद्रसपाटीइतकी असते. आधारतल गाठण्यासाठी लागणारा कालावधी प्रावाहाच्या क्षरणक्रियेच्या प्रमाणावर व तिच्या तळभागाच्या खडकांच्या प्रकारावर अवलंबून असतो. नदीप्रवाह मोठा तसेच वेगवती असल्यास त्याच्या तळाची झीज लवकर होते. त्याचप्रमाणे जर तो प्रवाह ठिसूळ व मऊ खडकांवरून गेला असेल, तर त्याचा तळ लवकर झिजून तो आधारतल लवकर गाठतो. नदी वाहण्यासाठी थोडातरी उतार आवश्यक असल्यामुळे फक्त अगदी मुखाजवळ ती आधारतल प्रत्यक्ष गाठू शकते. नदीचा प्रवाह कठीण आणि मऊ अशा खडकांच्या फळ्यांवरून वाहत असेल, तर कठीण खडकांची फळीच तिचे स्थानीय व तात्पुरते आधारतल बनते. याचा परिणाम तिच्या वरच्या टप्प्यातील ऊर्ध्वगामी क्षरणावर होतो. कालांतराने कठीण खडकांची फळीही झिजते आणि अधिक खालच्या आधारतलाकडे क्षरणकार्य चालू होते. सरोवरेही त्यांना येऊन मिळणाऱ्या नद्यांची तात्पुरत्या स्वरूपाची आधारतले बनतात. नदीवर धरणे असल्यास ती देखील तात्पुरती आधारतल होतात.

सर्वच खंडीय प्रदेशांचा आधारतलापर्यंत झीज होण्याकडे कल असतो; परंतु पृथ्वीच्या भूकवचाचे उत्थान व सागरजलाच्या पातळीतील चढउतार हे या क्रियेतील प्रमुख अडळे आहेत. अमेरिकन भूगोलज्ञ व भूवैज्ञानिक विल्यम मॉरिस डेव्हिस यांनी आपला ‘अपक्षरणचक्राचा सिद्धांत‘ (सायकल ऑफ इरोजन) यामध्ये मोठ्या नद्या आधारतलापर्यंत खणन करतात, असे म्हटले आहे. प्रसिद्ध अमेरिकन भूवैज्ञानिक जे. डब्ल्यू. पॉवेल यांनी ‘बेस लेव्हलʼ ही संज्ञा १८७५ मध्ये प्रथम वापरात आणली.

समीक्षक : वसंत चौधरी; अविनाश पंडीत