एक आसनप्रकार. या आसनामध्ये पद्मासनाप्रमाणे दोन्ही पाय एकमेकांवर न आणता फक्त एकच पाय मांडीवर ठेवायचा असतो. म्हणून याला अर्धपद्मासनही म्हणतात. या आसनाच्या विशिष्ट रचनेमुळे साधक अधिक दृढ व धैर्यवान वा खंबीर होतो म्हणून कदाचित या आसनाला वीरासन म्हटले असावे.

वीरासन : कृती.

कृती : हठप्रदीपिकेनुसार वीरासनाची कृती पुढीलप्रमाणे दिली आहे – प्रथम दण्डासनात बसावे. उजवा पाय वाकवून पाऊल डाव्या मांडीवर पोटाला लागून ठेवावे. डावा पाय दुमडून पाऊल डाव्या मांडीखाली ठेवावे (हठप्रदीपिका १.२१).

घेरण्डसंहितेनुसार वीरासनाचीकृती पुढीलप्रमाणे दिली आहे – एक पाय दुसऱ्या मांडीवर चढवावा व दुसरा पाय पहिल्या पायाच्या मागे सरकवावा (घेरण्डसंहिता २.१७). हठप्रदीपिकेची कृती तुलनेने स्पष्ट व सोपी आहे.

प्रचलित पद्धतीनुसार या आसनाची कृती पुढीलप्रमाणे आहे – हातांची ज्ञानमुद्रा करून ते त्या त्या गुडघ्यांवर ठेवावेत. डोळे मिटून शांत बसावे. आपोआप सुरू असणाऱ्या श्वास-प्रश्वासाकडे साक्षीभावाने बघत राहावे. यालाच प्राणधारणा म्हणतात. आसनाचा अवधी आपल्या क्षमतेनुसार १ ते १० मिनिटे किंवा त्याहीपेक्षा जास्त ठेवता येईल. आसन सोडताना एकेक पाय सोडवून पुन्हा दण्डासनाच्या स्थितीत यावे.

वीरासन 

लाभ : ज्यांना गुडघ्यांच्या वेदनांमुळे पद्मासन जमत नाही, त्यांनी हे आसन जरूर करावे. या आसनाने गुडघ्यांची लवचिकता हळूहळू वाढते. गुडघ्यांचा ताठरपणा कमी होतो. कटिप्रदेश (कंबर) व त्याच्या निरनिराळ्या सांध्यांना हळूहळू सवय होते. या आसनाने शारीरिक व मानसिक स्थिरता प्राप्त होते. मन:शक्ती व धैर्य वाढते. आत्मविश्वास वाढतो. प्राणायाम, ध्यान यासाठी लागणारी स्थिर बैठक या आसनाने मिळते.

विधिनिषेध : गुडघे जमिनीला स्पर्श करतील असे ठेवावेत. मेरुदंड, डोके सरळ रेषेत ठेवावेत. पाय बदलून हे आसन पुन्हा करावे. या आसनात बसण्याचा काळ हळूहळू वाढवावा. गुडघ्याला वेदना होतील इतका प्रयत्न करू नये. आसन सुखपूर्वक असले पाहिजे.

पहा : पद्मासन.

समीक्षक : साबीर शेख