स्मिथ, कॅप्टन जॉन (Smith, Captain John) : (? जानेवारी १५८० — २१ जून १६३१). ब्रिटिश समन्वेषक, सैनिक, साहसी व्यक्ती, मानचित्रकार व लेखक. त्यांचा जन्म इंग्लंडच्या लिंकनशर परगण्यातील विलबी येथे एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचा बाप्तिस्मा ६ ते ९ जानेवारी १५८० यांदरम्यान झाला असावा. स्मिथ यांच्या जीवनाविषयीची माहिती प्रामुख्याने त्यांच्या आत्मचरित्रातील नोंदींवरून मिळते. प्राथमिक शिक्षणानंतर किशोरवयातच त्यांनी एका श्रीमंत व्यापार्‍याकडे नोकरी पत्करली. वडिलांच्या मृत्यूनंतर (१५९६) त्यांच्यावर घरच्या शेतीची जबाबदारी आली; परंतु शेतीत स्वारस्य नसल्यामुळे आणि धाडशी स्वभावामुळे वयाच्या सोळाव्या-सतराव्या वर्षीच ते ब्रिटिश लष्करात दाखल झाले. त्या वेळी ब्रिटिश फौजा नेदर्लंड्सच्या बाजूने स्पेनच्या विरोधातील लढाईत गुंतल्या होत्या. त्यात स्मिथ सामील झाले. साधारण चार वर्षे सैन्यात काढल्यानंतर थोडे दिवस ते स्कॉटलंडला गेले असावेत.

स्मिथ यांनी नेदर्लंड्सला परतल्यानंतर तुर्कांविरुद्ध कामगिरी करून आपले नशीब अजमावण्याचा धाडशी निर्णय घेतला. त्यासाठी समुद्रमार्गे फ्रान्स, इटली, ईजिप्त, ऑस्ट्रिया या प्रदेशांचे तसेच भूमध्य समुद्राचे समन्वेषण करून आल्यानंतर व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) येथे ते ब्रिटिश सैन्याला येऊन मिळाले. सैनिक म्हणून त्यांच्या चातुर्याची आणि धाडशीपणाची दखल घेऊन त्यांना प्रथम कॅप्टन व नंतर मेजर म्हणून हुद्दा देण्यात आला; परंतु त्यांना कॅप्टन म्हणवून घेणेच अधिक पसंत होते. एका चढाईत त्यांनी तीन तुर्की अधिकार्‍यांना ठार केल्यामुळे त्यांना इंग्लिश सद्गृहस्थाचा दर्जा व बैठे वेतन देऊन सन्मानित करण्यात आले. त्यानंतर दुर्देवाने ते जखमी झाले. स्मिथ यांच्या म्हणण्यानुसार तुर्कांकडून कैद करवून तुर्की पाशाच्या तरुण पत्नीचा सेवक म्हणून त्यांना कॉन्स्टँटिनोपलला पाठविण्यात आले. सुरक्षेच्या काळजीमुळे त्या तरुणीने त्यांना आपल्या भावाकडे पाठविले. तेथे स्मिथ यांना गुलाम म्हणून शेतीच्या कामात जुंपण्यात आले. अतिशय वाईट वागणुकीला व त्रासाला कंटाळून त्यांनी शेतमालकाचाच खून करून उत्तरेकडे मस्कोव्ही (मॉस्को) व तद्नंतर पोलंडमार्गे रोमला पलायन केले. त्यानंतर जर्मनी, फ्रान्स, स्पेन, मोरोक्को या देशांना भेटी देत, तसेच आफ्रिका खंडाच्या किनार्‍याजवळील युद्धात काही दिवस भाग घेऊन ते इ. स. १६०५ मध्ये इंग्लंडला परतले. त्यानंतर मात्र ते समन्वेषणाकडे वळले.

इंग्लंडमध्ये आल्यानंतर उत्तर अमेरिकेत ब्रिटिश वसाहत स्थापण्याच्या उद्देशाने लंडनच्या व्हर्जिनिया कंपनीने आखलेल्या एका सफरीमध्ये ते सामील झाले. या कंपनीने क्रिस्टोफर न्यूपोर्ट, बार्थॉलोम्यू गॉझनोल्ड व जॉन रॅडक्लिफ या कप्तानांच्या नेतृत्वाखाली २० डिसेंबर १६०६ रोजी १४४ सदस्यांसह तीन जहाजे उत्तर अमेरिकेकडे पाठविली. २६ एप्रिल १६०७ रोजी ही सफर उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनार्‍यावरील चेसापीक उपसागरात पोहोचली. १३ मे रोजी ते सर्वजण तेथील जमिनीवर उतरले. त्याच ठिकाणी उत्तर अमेरिकेतील पहिल्या कायमस्वरूपी ब्रिटिश वसाहतीची स्थापना करण्यात आली. पहिला जेम्स या राजाच्या सन्मानार्थ या वसाहतीला जेम्सटाउन असे नाव देण्यात आले. तोपर्यंत सफरीतील १४४ पैकी १०५ वसाहतकरी जिवंत राहिले होते.

वसाहतीतील नेत्यांबरोबर स्मिथचे मतभेद होते. वसाहतकर्‍यांची अन्नविषयक समस्या सोडविण्यासाठी त्यांनी स्थानिक इंडियनांबरोबर मक्याचा व्यापार सुरू केला. दरम्यानच्या काळात त्यांनी तेथील नद्यांच्या प्रवाह-मार्गांचे समन्वेषण सुरू ठेवले. याचा फायदा त्यांना पुढे व्हर्जिनियाचा नकाशा तयार करण्याच्या कामी झाला. डिसेंबर १६०७ मध्ये चिक्हॉमनी नदीचे समन्वेषण करीत असतानाच पौअटन या इंडियन साम्राज्यातील लोकांनी स्मिथ व त्यांच्या सहकार्‍यांवर हल्ला करून त्यांना पकडले. वाहून सेनॅकॉक नावाने ओळखल्या जाणार्‍या पौअटन प्रमुखासमोर त्यांना हजर करण्यात आले; परंतु सुदैवाने त्या प्रमुखाच्या तरुण मुलीच्या मध्यस्थीमुळे स्मिथ यांची सुटका झाली. ते जेम्सटाउनला परतले, तेव्हा दोन वसाहतकर्‍यांच्या मृत्यूस जबाबदार धरून विरोधकांनी त्यांना मृत्युदंडाची शिक्षा देण्याचा निर्णय घेतला; परंतु त्याच वेळी इंग्लंडवरून नव्याने काही वसाहतकरी घेऊन आलेल्या कॅप्टन क्रिस्टोफर न्यूपोर्टच्या मध्यस्थीमुळे त्यांना जीवनदान मिळाले.

स्मिथ १० सप्टेंबर १६०८ पासून जेम्सटाउन वसाहतीचे अध्यक्ष बनले. सर्व वसाहतकर्‍यांनी कष्ट करावेत व धान्यासाठी इंडियनांबरोबर व्यापार सुरू ठेवावा, असा आदेश त्यांनी दिला. वसाहतीतील लोकांची उपासमार व इतर समस्या त्यांनी मोठ्या कौशल्याने हाताळल्या. लोकांसाठी लष्करी प्रशिक्षण सुरू केले. अल्प प्रमाणावर डांबर व साबणनिर्मिती सुरू केली. विहीर खोदली, घरे बांधली, शेती सुरू केली, नियमित मासेमारी सुरू केली आणि लगतच्या भागात किल्ले बांधले. त्यांनी कत्तलींपेक्षा मतपरिवर्तन, मुत्सद्देगिरी आणि वचक अशा धोरणांचा अवलंब करून पौअटन लोकांना उपसागराजवळच थोपवून ठेवले. सप्टेंबर १६०९ मध्ये बंदुकीच्या दारूच्या स्फोटात जखमी झाल्यामुळे त्यांना इंग्लंडला परतावे लागले. इंग्लंडला आल्यावर त्यांच्या विरोधात झालेल्या तक्रारींना त्यांना तोंड द्यावे लागले. इंग्लंडमध्ये असताना त्यांनी मॅप ऑफ व्हर्जिनिया, वुइथ ए डिस्क्रिप्शन ऑफ द कंट्री, द कमॉडिटीज, पीपल, गव्हर्नमेन्ट अँड रिलिजन हा व्हर्जिनियावरील अहवाल इ. स. १६१२ मध्ये प्रसिद्ध केला. त्यात त्यांनी व्हर्जिनियातील भौगोलिक परिस्थिती, वनस्पती, प्राणी व तेथील इंडियन लोकांचे वर्णन केले होते.

लंडनच्या एका व्यापारी गटाने १६१४ मध्ये स्मिथ यांना उत्तर अमेरिकेकडे पाठविले. या वेळी त्यांनी मेन व मॅसॅचूसेट्स किनार्‍याचे समन्वेषण करून उत्तरेस पनाबस्कॉ उपसागरापासून ते दक्षिणेस केप कॉड उपसागरापर्यंतच्या किनार्‍याचा नकाशा तयार केला. या संपूर्ण प्रदेशाला त्यांनी न्यू इंग्लंड असे नाव दिले. दरम्यानच्या काळात त्यांना चाचांनी पकडले. तीन महिन्यानंतर आपली सुटका करून घेतल्यावर मासे, फर इत्यादी मालासह ते इंग्लंडला परतले. स्मिथ यांनी १६१५ मध्ये पुन्हा उत्तर अमेरिकेकडे जाण्याचा प्रयत्न केला; परंतु त्या वेळी ते चाचांच्या तावडीत सापडले. त्यानंतर १६१७ मध्ये परत एकदा त्यांनी अमेरिकेकडे जाण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यात त्यांना यश आले नाही. दरम्यानच्या काळात त्यांनी ए डिस्क्रिप्शन ऑफ न्यू इंग्लंड (१६२५) हा न्यू इंग्लंडवरील अहवाल प्रसिद्ध केला. त्यात त्यांनी या प्रदेशाचा एक सुंदर नकाशाही दिला होता.

अमेरिकेकडे जाणे शक्य न झाल्यामुळे इंग्लंडमधील वास्तव्यात त्यांनी बरीच पुस्तके लिहिली. आपल्या लेखनात त्यांनी अमेरिकेतील वसाहती, आपले दर्यावर्दी जीवन व अनुभव यांविषयी सविस्तर वर्णन केलेले आहे. त्यात त्यांनी न्यू इंग्लंडमध्ये वसाहतीच्या दृष्टीने उत्तम भविष्य असल्याचे आवर्जून सांगितले. स्मिथ यांच्या इतर प्रकाशनांमध्ये द जनरल हिस्टरी ऑफ व्हर्जिनिया, न्यू इंग्लंड, अँड द समर आइल्स (१६२४); द ट्रू ट्रॅव्हल्स, ॲडव्हेंचर्स अँड ऑब्झर्व्हेशन्स ऑफ कॅप्टन जॉन स्मिथ इन यूरोप, एशिया, आफ्रिका अँड अमेरिका ही महत्त्वपूर्ण आहेत (१६३०).

स्मिथ हे एक विश्वासू निरीक्षक आणि राष्ट्रीय विभूती असल्याचे अठराव्या शतकाच्या अखेरीस व एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात मानले जाई; परंतु काही समकालीन इतिहासतज्ज्ञांनी स्मिथ यांचे कार्य व लेखनाबद्दल साशंकता व्यक्त केली असून, त्यांच्या युक्तिवादानुसार ते आत्मप्रौढीसाठी खूप उतावीळ झालेले गृहस्थ होते. त्यांच्या सुरुवातीच्या काळातील युद्धांमधील सहभागाबद्दलही साशंकता व्यक्त केली जाते. त्यांच्यावर काही आक्षेप असले, तरी त्यांचे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे.

स्मिथ यांचा अज्ञात आजारपणात लंडनमध्ये मृत्यू झाला.

समीक्षक : ना. स. गाडे