कॅबट, सीबॅस्चन : (१४७६/१४८२? – १५५७). ब्रिटिश मार्गनिर्देशक, समन्वेषक आणि मानचित्रकार. कॅबट यांची जन्मतारीख, जन्मस्थळ तसेच त्यांच्या बालपणाविषयी बरीच अस्पष्टता आहे. त्यांचा जन्म इंग्लंडमधील ब्रिस्टल किंवा इटलीतील व्हेनिस येथे झाला असावा. समन्वेषक जॉन कॅबट (John Cabot) हे त्यांचे वडील. वडिलांच्या १४९७ मधील उत्तर अमेरिकेकडील पहिल्या सफरीत आपण सहभागी होतो, असा दावा सीबॅस्चन करतात; परंतु त्यांच्या सहभागाचा इतर कोणताही सबळ पुरावा आढळत नाही. त्या वेळी ते अगदीच तरुण होते. याच सफरीत जॉन कॅबट यांनी न्यू फाउंडलंडच्या लॅब्रॅडॉर किनाऱ्याचा शोध लावला. त्या वेळी आपण चीनच्या किनाऱ्यावर पोहोचलो असल्याची चुकीची समजूत जॉन कॅबट यांची झाली होती.

सीबॅस्चन यांनी वेगवेगळ्या वेळी ब्रिटिश आणि स्पॅनिश राजसत्तेसाठी काम केले. वडिलांबरोबरच्या सफरीतील सहभागामुळे त्यांना उत्तर अमेरिकेच्या ईशान्य भागाची माहिती झाली होती. १५०५ पर्यंत सीबॅस्चन यांनी स्वतंत्रपणे एकही सफर केली नसली, तरी त्यांची मानचित्रकला आणि मार्गनिर्देशनातील निपुणता लक्षात घेऊन इंग्लंडचा राजा सातवा हेन्री यांनी त्यांना वार्षिक १० पौंडांचे निवृत्तिवेतन देण्याचा निर्णय घेतला. सीबॅस्चन यांच्या मते, नॉर्थवेस्ट पॅसेज (जलमार्गाने) चीनला पोहोचता येईल. त्यांच्या या दाव्याला स्पेन आणि इंग्लंडमधून मोठे पाठबळ मिळाले. इंग्लंडचा राजा सातवा हेन्री यांनी १५०८-०९ मध्ये सीबॅस्चन यांच्या नेतृत्वाखाली दोन जहाजांच्या माध्यमातून एक सफर पाठविली. उत्तर अमेरिकेला वळसा घालून किंवा उत्तर अमेरिकेच्या मधून आशियाकडे जाणारा नॉर्थवेस्ट पॅसेज शोधणे हा या सफरीचा उद्देश होता. आइसलँड, ग्रीनलंडमार्गे लॅब्रॅडॉरच्या किनाऱ्यापर्यंत ते पोहोचले. तेथून किनाऱ्या-किनाऱ्याने उत्तरेस आणि पश्चिमेस गेल्यानंतर (त्यांचा दावा खरा असल्यास) ते हडसन उपसागराच्या मुखाशी गेले असावे. हडसन उपसागर (Hudson Bay) हा उत्तर अमेरिकेच्या सभोवतालचा पाण्याचा भाग असावा, असा त्यांचा ग्रह झाला. हाच नॉर्थवेस्ट पॅसेज असून येथूनच पॅसिफिकमार्गे पूर्व आशियात पोहोचता येईल, असा त्यांचा दावा होता; परंतु नंतर त्यांच्या लक्षात आले की, आर्क्टिक महासागरातून पूर्व आशियाकडे जाता येण्यासारखा जलमार्ग मिळणे अशक्य आहे. या सफरीत तेथील हिमक्षेत्र त्यांना बरेच त्रासदायक ठरले. तेथून पुढे जाण्यास सहकाऱ्यांनी नकार दिल्यामुळे अमेरिकेच्या किनाऱ्याने दक्षिणेस येऊन त्यानंतर तो इंग्लंडला परतला. इंग्लंडला परतला तेव्हा सातव्या हेन्रींचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर गादीवर आलेल्या आठव्या हेन्रींना समन्वेषणात विशेष रस नव्हता.

इसवी सन १५१२ मध्ये इंग्लंडचा राजा आठवा हेन्री यांच्याकडे सीबॅस्चन हे मानचित्रकार म्हणून काम करू लागले. त्या वेळी राजांसाठी त्यांनी नैर्ऋत्य फ्रान्समधील गॅस्कनी आणि गुयेन्ने प्रांताचा एक नकाशा तयार केला होता. ईशान्य स्पेनमधील ॲरागॉन राज्याचा राजा फेर्नांदो दुसरा यांना फ्रेंचांच्या विरोधात लढण्यासाठी मदत म्हणून आठव्या हेन्रीनी इंग्रज सैन्य पाठविले होते. त्यासोबत त्यांनी सीबॅस्चन यांना स्पेनमध्ये पाठविले (१५१२). सीबॅस्चन यांनी त्यानंतरची जवळजवळ ३६ वर्षे स्पेनमध्येच घालविली. या कालावधीत त्यांनी अनेक वेळा इंग्लंडला किंवा व्हेनिसला जाण्याचा विचार केला होता. १५१२ ते १५१६ पर्यंत त्यांनी फेर्नांदो दुसरा यांच्याकडे नकाशाकार म्हणून काम केले.

उत्तर अमेरिकेच्या ईशान्य किनाऱ्याची माहिती असल्यामुळे स्पॅनिश नौसेनेत त्यांना कॅप्टन पदावर नेमणूक दिली गेली; परंतु फेर्नांदो राजांचा मृत्यू झाल्यामुळे १५१६ मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली जाणारी मोहीम रद्द करण्यात आली. तरीसुद्धा होली रोमन सम्राट चार्ल्स पाचवा यांनी फेर्नांदो राजांची सेवा चालू ठेवली. सीबॅस्चन यांना १५१८ मध्ये न्यू इंडीजच्या स्पॅनिश मंत्रिमंडळाचे सदस्यत्व दिले गेले. तसेच स्पॅनिश मार्गनिर्देशक जॉन डायझ दे सॉलिस यांचा मृत्यू झाल्याने सीबॅस्चन यांची पायलट मेजर पदावरही नेमणूक केली गेली. त्यानंतर नकाशा तयार करण्याच्या कौशल्यामुळे स्पेनने त्यांची १५१८ मध्ये मार्गदर्शींचा अधिकृत परीक्षक म्हणून नेमणूक केली. पायलट मेजर या पदामुळे जागतिक समन्वेषणाचे जे प्रयत्न स्पेन करीत होता, त्याच्या अचूक नोंदी ठेवण्याची मुख्य जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली होती.

पूर्वेकडील आशियाई प्रदेशाशी व्यापार वाढविण्याच्या दृष्टीने १५२५ मध्ये सेव्हिल येथून तीन स्पॅनिश जहाजे पाठविली. त्या सफरीची जबाबदारी सीबॅस्चन यांच्यावर सोपविण्यात आली होती. आशियातील कॅथे (चीन) आणि ओफिर येथील श्रीमंतीची कल्पित वर्णने त्या वेळी बरीच चर्चेत होती. या प्रदेशाशी व्यापार वाढविणे हा या सफरीचा मूळ उद्देश होता. ही सफर दक्षिण अमेरिकेकडून पॅसिफिक महासागरमार्गे पूर्व आशियाई देशांकडे नेण्याचे ठरविण्यात आले होते. ब्राझीलच्या किनाऱ्याजवळून जात असताना एका फुटलेल्या गलबतातील लोक सीबॅस्चन यांना भेटले. त्यांनी तेथील प्रदेशात समृद्धी संस्कृती असल्याची माहिती सीबॅस्चन यांना दिली. त्या अविश्वसनीय बातमीवर विश्वास ठेवून सीबॅस्चन यांनी सफरीचा मूळ उद्देश बाजूला ठेवून दक्षिण अमेरिकेतील सांप्रत अर्जेंटिनातील रिओ दे ला प्लाता (प्लेट) नदी प्रदेशात आपली सफर नेली. तेथे त्यांनी पाराना, यूरग्वाय, पॅराग्वाय, बेरमेजो या नद्यांचे समन्वेषण केले. तेथील सुमारे तीन वर्षांच्या समन्वेषणानंतर रिकाम्या हाताने सीबॅस्चन स्पेनला परतले (१५३०). या सफरीच्या अपयशाबद्दल सीबॅस्चन यांना जबाबदार धरून शिक्षा म्हणून त्यांना तीन वर्षांसाठी हद्दपार करून आफ्रिकेत पाठविण्यात आले; परंतु दोन वर्षांनंतर त्यांची शिक्षा माफ करून पूर्वीच्याच नाविक प्रमुख पदावर कायम करण्यात आले.

सीबॅस्चन यांच्या १५३३ ते १५४७ या कालावधीतील आयुष्यक्रमाविषयी विशेष माहिती मिळत नाही. कदाचित त्यांनी स्वत:ला मानचित्रकलेत गुंतवून घेतले असावे. १५४४ मध्ये त्यांनी जगाचा पहिला अप्रतिम नकाशा तयार केला. त्या नकाशाची प्रत फ्रान्समधील पॅरिस येथे असलेल्या ‘बिब्लीओथीक नॅशनल’ या राष्ट्रीय ग्रंथालयात ठेवण्यात आली आहे. १५४७ मध्ये इंग्लंडमध्ये सहावा एडवर्ड राजा गादीवर आले. त्याच वेळी आठव्या हेन्रींचा मृत्यू झाला. त्या वेळी सीबॅस्चन यांनी इंग्लंडला जाण्याचा निर्णय घेतला; कारण उत्तरेकडील प्रदेशाच्या शोधात स्पेनला विशेष रस नव्हता आणि सीबॅस्चन यांची दुसरी पत्नी कॅटॅलिना मेद्रानो हिचेही निधन झाले होते. त्यामुळे स्पेनमध्ये राहण्यात त्यांना स्वारस्य उरले नव्हते. त्यांनी स्पेनचा राजा चार्ल्स पाचवा यांना न सांगताच इंग्लंडला निघून गेले (१५४८). इंग्लंडचा राजा सहावा एडवर्ड यांनी सीबॅस्चन यांची नाविक दलात नेमणूक केली. त्यांनी ती स्वीकारली. त्यांना निवृत्तिवेतनही दिले. इंग्लंडने त्यांच्यावर यूरोपपासून पूर्वेकडे जाण्यासाठी नॉर्थईस्ट पॅसेजचा शोध घेण्याच्या दृष्टीने भौगोलिक मार्गनिर्देशकपदाची जबाबदारी सोपविली. त्यामध्ये त्यांना यश आले नाही; परंतु नॉर्थवेस्ट पॅसेजच्या शक्यतेच्या सीबॅस्चन यांनी केलेल्या दाव्यामुळे सोळाव्या शतकात इंग्रज मार्गनिर्देशकांना हा मार्ग शोधण्याचा मोठा आवेग आला. १५५३ मध्ये दोनशे इंग्लिश व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन मस्कोव्ही या व्यापारी कंपनीची स्थापना केली. त्याचे गव्हर्नरपद सीबॅस्चन यांना दिले. या कंपनीमार्फत ईशान्य, उत्तर आणि वायव्य भागांत नव्या भूमीचा शोध घेऊन त्याचा आपल्याकडे ताबा घ्यायचा आणि तेथे व्यापारीसंबंध प्रस्थापित करायचे. यासाठी प्रोत्साहन व आर्थिक मदत देण्याचे धोरण ठरविले होते. या कंपनीने नॉर्थईस्ट पॅसेज शोधण्याचाही प्रयत्न केला. त्यासाठी १५५६ मध्ये स्टीफन बरोच्या नेतृत्वाखाली एका छोट्या जहाजाद्वारे पाठवावयाच्या सफरीचे सीबॅस्चन यांनी नियोजन केले. त्यांची ही शेवटची सफर ठरली. सीबॅस्चन यांना त्यांच्या तरुणपणापासूनच नॉर्थवेस्ट पॅसेजचा शोध घेण्यात विशेष रस होता, तर त्यांच्या कंपनीने पहिल्यांदा नॉर्थईस्ट पॅसेजचा शोध घेण्याचे ठरविले होते. अखेरच्या काळात ते इंग्लिश सागरी कप्तानांना आकाशातील ग्रह, तारे आणि सूर्य यांच्या साहाय्याने प्रवास कसा करावा, याचे मार्गदर्शन करीत होते.

समीक्षक संतोष ग्या. गेडाम

प्रतिक्रिया व्यक्त करा