ॲमन ही प्राचीन ईजिप्तमधील अत्यंत शक्तिशाली लोकप्रिय देवता होय. मुळात ॲमन ही उत्तर ईजिप्तमध्ये स्थानिक वायूदेवता व उत्पादकतेची/सुपीकतेची देवता म्हणून प्रसिद्ध होती. न्यू किंग्डमच्या काळात (इ.स.पू. १५५०–१०६९) जेव्हा थिबन सत्तेखाली उत्तर आणि दक्षिण ईजिप्तचे एकत्रीकरण झाले, तेव्हा त्या काळी संपूर्ण ईजिप्तची धार्मिक राजधानी म्हणून मान्यता पावलेल्या थीब्स शहराचा ॲमन आश्रयदाता मानला जात असे. थीब्समध्ये ॲमन, मूट आणि खोन्सू (खेन्सू) या देवतात्रयींची पूजा होत असे. हीलिऑपोलिसमध्ये ज्या आठ मुख्य देवतांची (Ogdoad) उपासना केली जात असे, त्यातही ॲमनचा उल्लेख आढळतो. कालांतराने ॲमन आणि हीलिऑपोलिसमधील सर्वांत जुन्या पंथाची देवता रा (सूर्यदेव) यांचे विलीनीकरण झाले आणि ईजिप्तमध्ये एकदेवतावाद आला. ॲमन ईजिप्तमधला सर्वांत शक्तिशाली देव झाला. इतर सर्व देवता ॲमनचेच स्वरूप मानल्या जाऊ लागल्या.

बाराव्या राजवंशातील राजा पहिला सेनूस्रेट (इ.स.पू. १९६५–१९२०) च्या कारनॅकमधल्या एका लेखात ॲमनला देवांचा सर्वोच्च राजा म्हटले आहे. त्या काळी ईजिप्तमधल्या काही राजस्त्रियांना ॲमनच्या पत्नीचा दर्जा दिला जायचा आणि त्यांना फारो इतकाच मान होता.

ॲमन देवतेचे वर्णन : डोक्यावर दोन पिसांचे उंच शिरोभूषण, मेंढ्याचे शीर असलेला बदकासारखा पक्षी किंवा बेडकाचे डोके असलेला असे ॲमनचे मानवी स्वरूप आढळते. शिंगे आत डोक्याच्या बाजूला वळलेला मेंढा अशीही त्याची कल्पना केली गेली आहे. पपायरसवरील एका पद्यात आवाज करणारे बदक (great honker primeval goose) असा त्याचा उल्लेख आला आहे.

काही ठिकाणी ॲमन देवतेचे संयुक्तीकरण उत्पादकतेची देवता मीनबरोबर दाखवले असून त्यांचे ॲमन-मीन किंवा ॲमन-कामूटेफ (Bull of his Mother) असे एकत्रित स्वरूप दिसते. पाचव्या राजवंशाच्या काळातील (इ.स.पू. २३५०‒२३४५) पिरॅमीडवरील एका लेखामध्ये ॲमनची पत्नी म्हणून ॲमूनेट देवतेचा उल्लेख आहे. अकराव्या राजवंशाच्या काळात (इ.स.पू. २०५५–१९८५) थीब्समध्ये ॲमनची उपासना त्याची सहचारिणी गिधाड मातृदेवता मूट आणि त्यांचा पुत्र चंद्रदेवता खोन्सू यांच्यासह केली जात असे.

तिसऱ्या आमेनहोतेपचा मुलगा आकेनातन (आक्नातन) याच्या राज्यात ॲमन देवतेची पूजा निषिद्ध मानली गेली; पण त्यानंतरच्या राजाने इ.स.पू. १३६१ मध्ये ॲमन देवतेची पुनर्नियुक्ती केली आणि तो स्वतःला तूतांखामेन म्हणजेच ॲमनचे मूर्त रूप म्हणवून घेऊ लागला. कालांतराने ॲमन देवतेचा महिमा इथिओपिया आणि लिबिया देशांपर्यंत पसरला.

ॲमनच्या मंदिराचे स्तंभावशेष, कारनॅक.

कारनॅक येथील उत्खननात ॲमन देवतेचे भव्य मंदिर, ॲमनची पत्नी मूट आणि पुत्र खोन्सू ह्यांची मंदिरे सापडली आहेत. ही सर्व मंदिरे एकाचवेळी बांधलेली नसून त्यांचे बांधकाम कित्येक वर्षे चालू होते. सर्वसाधारणतः इ.स.पू. २००० ते इ.स.पू. ३० ह्या काळात येथील वास्तूंच्या बांधकामास प्रत्येक राजाने हातभार लावला आहे. परंतु त्यांतील ॲमनचे मंदिर दुसरा रॅमसीझ ह्याने पूर्ण केल्याचे उपलब्ध पुराव्यांवरून दिसते. इतर बहुतेक अवशेष ईजिप्तच्या अठराव्या राजवंशाच्या कारकिर्दीतील आहेत. तेथील ऑबेलिस्क पहिला थटमोझ व राणी हॅटशेपसूट ह्यांनी उभारले. वास्तुशिल्पाच्या दृष्टीने ॲमनचे मंदिर हे एक अप्रतिम मंदिर समजण्यात येते. त्यातील १४० अजस्त्र स्तंभी दिवाणखाना (१०२ x ५२ मी.) भव्य असून त्यात भिंतींवर पहिला सेती आणि दुसरा रॅमसीझ ह्यांच्या जीवनातील प्रसंग चित्रित केलेले आहेत.

संदर्भ :

  • Oakes, Lorna; Gahlin, Lucia, Ancient Egypt, Pennsylvania, 2007.
  • Willis, Roy, World Mythology : The Illustrated Guide, London, 1993.
  • https://www.ancient.eu/article/885/egyptian-gods—the-complete-list/

                                                                                                                                                                    समीक्षक : शकुंतला गावडे