अप्रिय वस्तूंप्रति असणारी क्रोधाची भावना म्हणजे द्वेष होय. महर्षी पतंजलींनी द्वेषाचा समावेश क्लेशांमध्ये केलेला आहे. द्वेषाचे स्वरूप त्यांनी ‘दु:खानुशयी द्वेष:’ (योगसूत्र २.८) या सूत्राद्वारे सांगितले आहे. व्यासभाष्यामध्ये द्वेष या क्लेशाचे स्पष्टीकरण करताना प्रतिघ, मन्यु व जिघांसा या तीन शब्दांचा प्रयोग केला आहे. दु:ख देणाऱ्या वस्तू किंवा व्यक्ती यांना प्रतिकार करण्याची भावना म्हणजे प्रतिघ; मनात असलेला क्रोध म्हणजे मन्यु आणि दुसऱ्या व्यक्तीला मारण्याची इच्छा म्हणजे जिघांसा होय.
एखाद्या वस्तूचा किंवा विषयाचा दु:खकारक अनुभव घेतल्यानंतर तो अनुभव चित्तामध्ये सूक्ष्म संस्कार उत्पन्न करतो आणि चित्तामध्ये त्या दु:खकारक वस्तूप्रति द्वेषाची आणि तिचा त्याग करण्याची तीव्र इच्छा उत्पन्न होते. दु:खकारक वस्तूशी संबंध थोड्या काळापुरता असला तरीही त्यानंतर उत्पन्न होणारा संस्कार आणि त्या वस्तूप्रति द्वेषाची भावना कायमस्वरूपी चित्तामध्ये राहते.
वस्तुत: सर्व जीवांना केवळ दु:खाप्रति द्वेष असतो. परंतु, ते दु:ख ज्या वस्तूमुळे किंवा व्यक्तीमुळे मिळते, त्या दु:खाच्या कारणांप्रति सुद्धा द्वेष उत्पन्न होतो. दु:खाशी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रीतीने संबंधित असणाऱ्या अनेक वस्तूंप्रति द्वेषाची भावना दृढ होत जाते. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीच्या मनात मद्यपानाविषयी द्वेष असेल, तर मद्य ज्या ठिकाणी मिळते, त्या ठिकाणांविषयीही त्याला द्वेष वाटू लागतो. अशी ठिकाणे ज्या रस्त्यावर आहेत, त्या रस्त्याने जाण्याचेही ती व्यक्ती टाळते. अशा प्रकारे मूलत: दु:खासाठी असणाऱ्या द्वेषाचा परीघ वाढतच जातो.
सांख्यदर्शनानुसार दु:खाचा संबंध हा रजोगुणाशी आहे. रजोगुण हा क्रियाशीलता, प्रेरणा, इच्छा, आकांक्षा यांच्याशी संबंधित आहे. कर्माचा किंवा क्रियेचा संबंध रजोगुणाशी असला, तरीही क्रिया कोणत्याही अपेक्षेशिवाय निष्काम भावनेने केली जाते, तेव्हा ती क्रिया सत्त्वगुणप्रधान होते. एखादे विशिष्ट फळ प्राप्त करण्याच्या हेतूने क्रिया केली जाते, तेव्हा ती क्रिया रजोगुणप्रधान असते. जेव्हा सकाम कर्म केले जाते, तेव्हा त्यापासून दु:खच उत्पन्न होते; त्यामुळे रजोगुणाचा संबंध दु:खाशी आहे.
सांख्यदर्शनात द्वेषाला ‘तमिस्र’ अशी संज्ञा वापरली आहे व त्याचे १८ प्रकार स्पष्ट केले आहेत. दु:खाच्या अनुभवानंतर उत्पन्न होणाऱ्या द्वेषाचे मूळ कारण अविद्या आहे. अविद्या नष्ट झाल्यावर द्वेष व अन्य क्लेशही नष्ट होतात.
पहा : अविद्या, क्लेश, दु:खत्रय, राग.
समीक्षक – कला आचार्य