श्रीलाल शुक्ल : (३१ डिसेंबर १९२५-२८ ऑक्टोबर २०११). भारतीय साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध हिंदी साहित्यिक. कथा, व्यंगकथा, कादंबरी, समीक्षा अशा विविध साहित्यप्रकारात श्रीलाल यांनी लेखन केले आहे. उत्तर प्रदेशातील लखनौ जिल्ह्यातील अजरौली गावी त्यांचा जन्म झाला. परिस्थिती गरीबीची. त्यांचे आजोबा संस्कृत, उर्दू आणि फारसी भाषेचे विद्वान होते आणि जवळच्याच शाळेत शिक्षक होते, पण नोकरी सोडून त्यांनी शेती करायला सुरुवात केली. त्यांच्या वडिलांना संगीताची खूप आवड होती; पण आजोबांमुळे ते त्यांच्याबरोबर शेती करू लागले. श्रीलालजी प्रयागमध्ये बी.ए. करीत होते, तेव्हा वडिलांचे निधन झाले. मग ते लखनौला आले आणि १९४८ मध्ये एम्.ए.ची परीक्षा दिल्यावर पुढे वकिली शिक्षणासाठी प्रवेश घेतला. पण ती सोडून १९४९ मध्ये पत्नीच्या प्रेरणेने ते नागरी सेवेत दाखल झाले.
लहानपणापासनूच त्यांना वाचनाची आवड होती. इंग्रजी, हिंदी, उर्दू आणि संस्कृत भाषेचे ते विद्वान होते. शास्त्रीय आणि सुगम संगीताचीही त्यांना आवड होती. स्वभाव विनोदी पण शिस्तप्रिय होता.कथा,कादंबरी,व्यंगकथा,समीक्षा इ. विविध साहित्य प्रकारात त्यांनी लेखन केले आहे.त्यांचे पुढील साहित्य प्रकाशित झाले आहे.कादंबरी – सूनी घाटी का सूरज (१९५७), अज्ञातवास (१९६२), राग दरबारी (१९६८), आदमी का ज़हर (१९७२), सीमाएँ टूटती हैं (१९७३), मकान (१९७६), पहला पड़ाव (१९७८), विश्रामपूर का संत (१९६८), बब्बर सिंह और उसके साथी (१९९९) ; कथासंग्रह – यह घर मेरा नहीं (१९७९),सुरक्षा तथा अन्य कहानियाँ (१९९१), उमरावनगर में कुछ दिन (१९९३), इस उम्र में (२००३), दस प्रतिनिधि कहानियां (२००३) ; विनोदी लेखन – अंगद का पांव (१९५८), यहां से वहां (१९७०), मेरी श्रेष्ठ व्यंग्य रचनाएँ (१९७९), कुछ ज़मीन पर कुछ हवा में (१९९०), आओ बैठ लें कुछ देर (१९९५), अगली शताब्दी का शहर (१९९६),जहालत के पचास साल (२००३) खबरों की जुगाली (२००५).याशिवाय त्यांचे निबंध,समीक्षात्मक लेखन आणि बालसाहित्यही प्रकाशित झाले आहे.
राग दरबारी ही श्रीलाल शुक्ला यांची उपहासात्मक कादंबरी श्रेष्ठ कादंबरी आहे. एका मोठ्या शहरापासून थोड्या अंतरावर असलेल्या शिवपालगंज या एका खेड्याच्या जीवनाशी संबंध असलेल्या या कादंबरीने हिंदी साहित्य जगतात खळबळ माजवली.स्वातंत्र्योत्तर काळातील भारतीय समाजातील, ढासळणाऱ्या मूल्यांवर त्यांनी यात भाष्य केले आहे.शुक्ल यांची राग दरबारी ही एक प्रभावी रचना आहे. किंबहुना श्रीलाल शुक्ला यांनी स्वातंत्र्योत्तर हिंदी उपहासात्मक कादंबऱ्यांच्या परंपरेचा बदल आपल्या राग दरबारी मध्ये सादर केला आहे. स्वातंत्र्यानंतर भारताच्या राजकीय व्यवस्थेचे असे तीक्ष्ण आणि व्यंग्यात्मक सादरीकरण प्रथमच झाले आहे.विश्रामपूर का संत ही समकालीन जीवनाची महागाथा आहे.एकीकडे भूदान आंदोलनाची पार्श्वभूमी असलेल्या या कादंबरीत स्वातंत्र्योत्तर भारताच्या सत्तेच्या राजकारणाचे दर्शन घडते.
श्रीलाल शुक्ल हे प्रेमचंदोत्तर काळातील लक्षणीय लेखक आहेत. स्वातंत्र्योत्तर भारतीय समाजाला समजून घेण्यासाठी ज्या लेखकांनी युक्तिवाद केला आहे अशा निर्मात्यांमध्ये श्रीलाल शुक्ल यांचे महत्त्व आहे. ते आपल्या काळाचे समर्थ भाष्यकार आहेत. त्यांच्या साहित्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते भारतीय जनमानसाच्या गुंतागुंतीच्या जीवनाबद्दल पूर्णपणे जागरूक आहेत असे दिसते. त्यांच्या लिखाणावर कोणत्याही चळवळीचा वा विचारसरणीचा प्रभाव नाही, तर त्यांच्या लेखनात भारतीय समाजातील विसंगतीचे चित्र प्रकट झाले आहे.
श्रीलाल शुक्ल रूढीवाद,अध्यात्मवाद आणि प्रेम या साहित्यातील समकालीन चिंता नाकारतात. त्यांच्या मते,एखाद्या लेखकासाठी त्याचा देश,कालावधी आणि एकंदरीत पर्यावरण हे साहित्याचे मुख्य प्रेरणा आणि प्रश्न असायला हवे.त्यांच्या साहित्यात व्यंग्य हे एक निवेदन वा आशय तंत्राऐवजी साहित्याचे एक शक्तिशाली माध्यम म्हणून प्रकटते.त्यांच्या कादंबऱ्या,कथा, निबंध यामध्ये उपहासात्मकता आढळते. त्यांनी भारतीय लोकशाहीच्या अपयशाची आणि लोकशाहीच्या बाजूने होणार्या हिंसाचाराचा निषेध केला आहे.साहित्यिक भूमिकेत ते भारतीय सत्तेचा विरोध दर्शवितात.
संदर्भ : स्नातक, विजयेन्द्र, हिंदी साहित्य का इतिहास, साहित्य अकादमी, न्यु दिल्ली, २००९.