तांब्याची ऑक्सिडीकरण अवस्था +१ असल्यास क्युप्रस व +२ असल्यास क्युप्रिक संयुगे मिळतात. +३ अवस्था असणारी तांब्याची अस्थिर संयुगे माहीत आहेत. क्युप्रस आयन जलीय विद्रावात अस्थिर असल्याने त्याचे क्युप्रिक संयुगात व धातवीय तांबे यांत जलद अपघटन (मोठ्या रेणूचे लहान रेणूंत तुकडे होणे) होते.

2 Cu+ → Cu + Cu+2

म्हणून क्युप्रस अवस्था अविद्राव्य लवणांतच आढळून येते. तसेच ती अवस्था जटिल संयुगांतही आढळते.

ऑक्साइडे : क्युप्रस ऑक्साइड (Cu2O) : या ऑक्साइडाचे स्फटिक लाल रंगाचे असतात. हे निसर्गात क्युप्राइट म्हणून आढळते. हायड्रोजन, कार्बन मोनॉक्साइड, लोणारी कोळसा अथवा लोखंड यामुळे त्याचे क्षपण होऊन धातवीय तांबे मिळते. हे खनिज अम्लात विरघळते व रंगहीन क्युप्रस लवणे तयार होतात. ह्या लवणांचे ऑक्सिडीभवन होऊन क्युप्रिक अवस्थेत रूपांतर होते.

उपयोग : काच तयार करताना याचा वापर केल्यास लाल रंगाची काच मिळते. जहाजाच्या डूबरेषेखालील (Plimsoll line) भागास लावण्यासाठी लागणाऱ्या रंगात याचा उपयोग करतात.

क्युप्रिक ऑक्साइड  (CuO) : हे एक काळे चूर्ण असून ते तांब्याचे कार्बोनेट, हायड्रॉक्साइड वा नायट्रेट भाजून तयार करतात. ते खनिज अम्लात विरघळते व निळ्या किंवा हिरव्या रंगाचा विद्राव मिळतो.

उपयोग : काचेला हिरवा रंग देण्यासाठी त्याचा उपयोग करतात. कार्बनी संयुगाचे त्याच्यामुळे जलद ऑक्सिडीभवन होते. या गुणधर्मामुळे त्याचा उपयोग प्रयोगशाळेत व उद्योगधंद्यात करण्यात येतो.

 

हॅलाइडे : क्युप्रस क्लोराइड (CuCl ) : हे क्युप्रिक क्लोराइडचा विद्राव (किंवा क्युप्रस ऑक्साइडाचा विद्राव) हायड्रोक्लोरिक अम्ल व धातवीय तांबे यांच्याबरोबर उकळवून तयार करतात.

उपयोग : क्युप्रस क्लोराइडाच्या हायड्रोक्लोरिक अम्लातील विद्रावात ॲसिटिलीन, कार्बन मोनॉक्साइड इ. वायू जलद शोषले जातात. यामुळे त्याचा उपयोग वायु–विश्लेषणात करण्यात येतो. याशिवाय खनिज तेलातील गंधक व रंग नाहीसे करण्यासाठी, कार्बनी व अकार्बनी संयुगांच्या निर्मितीत उत्प्रेरक (catalyst) म्हणून इत्यादींसाठी त्याचा उपयोग करतात.

क्युप्रिक क्लोराइड (CuCl2) : हे क्युप्रिक ऑक्साइड हायड्रोक्लोरिक अम्लात विरघळवून तयार करतात. ह्यांचे हिरव्या रंगाचे स्फटिक असून ते पाणी, अमोनिया व अल्कोहॉल यांत विरघळते.

उपयोग : रंगद्रव्यनिर्मितीत मूळ पदार्थ म्हणून त्याचा उपयोग करतात. सोने आणि चांदी यांच्या शुद्धीकरणात, सजल पद्धतीने खनिजांपासून पारा मिळविण्यासाठी, शोभेच्या दारूकामात, कापड छपाईत रंगबंधक इ. उपयोगांसाठीही त्याचा वापर करतात.

क्युप्रिक ब्रोमाइड (CuBr) : हे पांढऱ्या रंगाचे असते. Cu (II) च्या अशुध्दींमुळे इतर रंगांची त्याला छटा येते.

उपयोग : याचा वापर सँडमेयर विक्रियेमध्ये विक्रियाकारक म्हणून केला जातो. या विक्रियेमध्ये डायॲझोनियम लवणांचे ॲरिल ब्रोमाइडामध्ये रूपांतर होते.

ArN2+ + CuBr → ArBr + N2 + Cu+

कॉपर आयोडाइड (CuI) : याला क्युप्रस आयोडाइड असेही म्हणतात. हे संयुग पांढऱ्या रंगाचे असते, परंतु अशुध्दींमुळे काळपट रंगाचे दिसते.

उपयोग : याचा वापर विक्रियाकारक म्हणून करतात. मेघ बीजीकरण (cloud seeding) प्रक्रियेमध्ये याचा वापर होतो.

यांशिवाय तांब्याची क्युप्रिक ऑक्सिक्लोराइड, क्युप्रस ब्रोमाइड, क्युप्रस फ्ल्युओराइड, क्युप्रिक फ्ल्युओराइड ही औद्योगिक दृष्ट्या साधारण महत्त्वाची हॅलाइड संयुगे तयार करण्यात येतात.

 

सल्फाइडे व सल्फेटे : क्युप्रस सल्फाइड (Cu2S) : हे निसर्गात कॅल्कोसाइट रूपात सापडते. तसेच उच्च तापमानावर तांबे व गंधक तापवून ते तयार करतात. हे संयुग खनिज अम्लांत अविद्राव्य आहे.

उपयोग : हे संयुग जहाजाच्या जलकीटरोधी (पाण्यातील विद्राव्य पदार्थांचा थर बसू न देणाऱ्या) रंगासाठी वापरतात.

क्युप्रिक सल्फेट (CuSO4, 5H2O) :  हे तांब्याचे महत्त्वाचे संयुग आहे. यालाच मोरचूद असे म्हणतात.

उपयोग : रंगद्रव्ये, तांब्याची इतर संयुगे, कीटकनाशके, कवकनाशके (उदा., बोर्डो मिश्रण), खते इ. बनविण्यासाठी कॉपर सल्फेट वापरतात.

क्युप्रिक सल्फाइड (CuS) :  यालाच कॉपर मोनोसल्फाइड असेही म्हणतात. हे निसर्गात कोव्हेलाइट रूपात सापडते. तसेच क्युप्रिक संयुगाच्या विद्रावात हायड्रोजन सल्फाइड वायू सोडून हे तयार करतात. हे संयुग खनिज अम्लांत अविद्राव्य आहे.

उपयोग : क्युप्रिक सल्फाइड कॅलिको छपाईत आणि ॲनिलीन ब्लॅकच्या निर्मितीत वापरतात.

 

कार्बोनेट : क्षारकीय (basic) कॉपर कार्बोनेट ही क्षारीय (alkaline) कार्बोनेटे तांब्याच्या संयुगांच्या विद्रावात मिसळल्यास तयार होतात. ही गडद निळसर वा हिरव्या रंगाची असतात. ती पाण्यात व अल्कोहॉलात विरघळत नाहीत, परंतु विरल अम्ले व अमोनिया यांत विरघळतात. त्यांचा उपयोग रंगद्रव्ये तयार करण्यासाठी, शोभेच्या दारूकामात, गहू इ. धान्यांसाठी बुरशीनाशक व कीडनाशक म्हणून मलमातील एक घटक म्हणून इ. कामांसाठी करतात. ती नैसर्गिक रीत्या खनिजे म्हणूनही आढळतात.

 

संकीर्ण अकार्बनी संयुगे : कॉपर आर्सेनेटे  [Cu3(AsO4)2] :  आर्सेनिकाबरोबरची तांब्याची संयुगे हिरव्या रंगाची असून ती विषारी आहेत. त्यांचा उपयोग कीटकनाशके म्हणून करतात. उदा., शील ग्रीन (Scheele green), पॅरिस ग्रीन (Paris green) इ.

 

क्युप्रिक नायट्रेट [Cu(NO3)]2 : हे नायट्रिक अम्लात तांबे विरघळवून तयार करतात. याचे सजल स्फटिक गडद निळसर रंगाचे असतात.

उपयोग : याचा कीटकनाशक, कापड छपाईत रंगबंधक इ. कामांसाठी करतात.

कॉपर सायनाइड (CuCN) : हे पांढऱ्या रंगाचे असते. Cu (II) च्या अशुध्दींमुळे कधीकधी याला हिरवट रंग येतो.

उपयोग : याचा वापर उत्प्रेरक म्हणून तसेच तांब्याच्या विद्युत विलेपनासाठी करतात.

 

कार्बनी संयुगे : तांब्याची बरीच कार्बनी संयुगे तयार करण्यात आलेली आहेत.

कॉपर ॲसिटेट [Cu(CH3COO)2]: याचे साधे (क्युप्रिक) कॉपर ॲसिटेट व क्षारकीय कॉपर ॲसिटेट असे दोन प्रकार आहेत.

उपयोग : क्युप्रिक ॲसिटेट हे रंगद्रव्य निर्मितीमध्ये वापरतात. तर क्षारकीय कॉपर ॲसिटेट हे रंगद्रव्य निर्मिती, कीटकनाशके, कवकनाशके (fungicide), जनावरांची औषधे, मलमे इत्यादींत वापरतात.

कॉपर नॅप्थिनेट : कॉपर सल्फेट आणि नॅप्थॅनिक अम्ल यांचा अल्कलीच्या सान्निध्यात संयोग करून कॉपर नॅप्थिनेट तयार करतात. तसेच कॉपर ऑक्साइड आणि नॅप्थॅनिक अम्ल यांना उष्णता दिला असता त्यांचा संयोग होऊन कॉपर नॅप्थिनेट तयार होते.

तांबे : इतर संयुगे

उपयोग : कॉपर नॅप्थिनेटाचा वापर बुरशीनाशक म्हणून व गॅसोलीन, वंगण, प्लॅस्टिक, लाकूड इत्यादींचा टिकाऊपणा वाढविण्यासाठी करतात.

कॉपर ओलिएट व कॉपर स्टिअरेट यांचा उपयोग कॉपर नॅप्थिनेटासारखा करतात.

 

पहा : तांबे, तांबे निष्कर्षण, तांबे मिश्रधातू, मोरचूद.