सोडियम सल्फेट डेकाहायड्रेट या रंगहीन सजल-स्फटिकरूपी संयुगासाठी ग्लाउबर क्षार ही संज्ञा वापरली जाते. याचे रासायनिक सूत्र Na2SO4. १० H2O असे आहे.

इतिहास : ग्लाउबर क्षाराचा शोध सर्वप्रथम सतराव्या शतकात योहान रूडोल्फ ग्लाउबर (Johann Rudolf Glauber) या डच-जर्मन रसायनशास्त्रज्ञाने लावला. या क्षाराच्या औषधी गुणधर्मामुळे त्याने या क्षाराला ‘साल मिराबिलिस’ (sal mirabilis, चमत्कारी क्षार) असे नाव दिले. या क्षाराच्या खनिजरूपात आढळणाऱ्या प्रकाराला ‘मिराबिलाइट’ (Mirabilite) असे नाव आहे. सोडियम सल्फेटचे ‘थेनरडाइट’ (Thenardite) नावाचे आणखी एक खनिज उष्ण-कोरड्या हवामानात आढळते, ज्याचे स्फटिक जलरहित (Anhydrous) असतात.

उत्पादन : जगभरात होणाऱ्या सोडियम सल्फेटच्या वार्षिक उत्पादनापैकी (५.५ ते ६ मेट्रिक टन) दोन-तृतीयांश उत्पादन हे नैसर्गिक स्रोतावर (मिराबिलाइट) प्रक्रिया करून घेतले जाते. उर्वरित मानवनिर्मित सोडियम सल्फेट हे मुख्यत: हायड्रोक्लोरिक अम्लाच्या उत्पादनात दुय्यम मालाच्या (By-product) रूपात मिळते. या दोन प्रकारच्या उत्पादनांच्या गुणवत्तेमध्ये फारसा फरक नसतो.

ग्लाउबर क्षार

भौतिक गुणधर्म  : ग्लाउबर क्षाराची पाण्यातील विद्राव्यता काहीशी अस्वाभाविक आहे. ३२.३८४ से. पर्यंत त्याची विद्राव्यता तापमानाबरोबर वाढत जाते, जे सामान्य आहे. परंतु या तापमानबिंदूनंतर विद्राव्यतेचा आलेख सपाट होतो, म्हणजेच ३२.३८४ से. नंतर ही विद्राव्यता तापमानाबरोबर वाढत नाही. ग्लाउबर क्षाराचे हे वर्तन तापमापक उपकरणांच्या अचूक प्रमाणीकरणासाठी (Calibration) उपयोगी पडते.

रासायनिक गुणधर्म : रासायनिकदृष्ट्या, ग्लाउबर क्षार हे एक सामान्य आयनिक क्षार आहे. ते सामान्य परिस्थितीत बहुतांशी ऑक्सिडीकारक (Oxidizing agent) आणि क्षपणकारक (Reducing agent) संयुगांशी अभिक्रिया करत नाही. ग्लाउबर क्षार हे काही दुसऱ्या क्षार-संयुगांसोबत (जसे की पोटॅशियम सल्फेट, कॅल्शियम सल्फेट) दुहेरी क्षार (Double salt) तयार करू शकते. तसेच शुद्ध जलरहित रूपात ते संवेदनशील त्वचेवर किंवा नाका-तोंडावाटे शरीरात गेल्यास क्षोभकरक ठरते, म्हणून हाताळताना योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.

उपयोग : अठराव्या शतकात इतर रसायनांच्या (जसे की सोडियम कार्बोनेट) निर्मितीमध्ये कच्चा माल म्हणून सोडियम सल्फेटचा उपयोग सुरू झाला. विसाव्या शतकाच्या सुरूवातीपर्यंत हे क्षार रेचक म्हणूनही वापरले जात असे.

सोडियम सल्फेट हे चूर्ण-अपमार्जकांच्या (Powdered laundry detergent) उत्पादनात भराव (Filler) म्हणून वापरले जाते. लाकडाचा लगदा बनवण्यासाठी, खाद्यरंग उत्पादनात, काचनिर्मितीमध्ये आणि कापड-उद्योगातही सोडियम सल्फेट मोठ्या प्रमाणावर वापरतात. याखेरीज सौर-उष्मावर्धक प्रणालींमध्ये (Passive solar heating system), स्टार्च उत्पादनात आणि कार्बनी विद्रावांमधील (Organic solvents) पाण्याचा अंश शोषून घेण्यात सोडियम सल्फेट उपयोगी पडते.

पहा : ग्लाउबर, योहान रूडोल्फ.

संदर्भ :