देब्य्रू, जेरार्ड : (४ जुलै १९२१ – ३१ डिसेंबर २००४). अमेरिकन फ्रेंच अर्थतज्ज्ञ, गणिती व अर्थशास्त्राच्या नोबेल पारितोषिकाचा मानकरी. अमेरिकेचे नागरिकत्व मिळावे यासाठी तिकडे प्रयाण केलेले व सुप्रसिद्ध अशा कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी, बर्कलीमधील अर्थशास्त्र विषयाचे भूतपूर्व प्राध्यापक. आर्थिक सिद्धांताबाबतच्या विश्लेषणपद्धती व साधारण समतोल सिद्धांताच्या पुनर्रचनेसंदर्भातील संशोधनाबद्दल अर्थशास्त्र विषयाचे १९८३ मध्ये नोबेल स्मृती पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

देब्र्यू यांचा जन्म फ्रान्सच्या उत्तरेला वसलेल्या कॅले शहरात झाला. सुप्रसिद्ध गणिती हेन्री चार्टन यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी गणित विषयाचे अध्ययन केले. दरम्यान अर्थशास्त्र विषयाची गोडी निर्माण झाल्याने त्यात त्यांनी प्राविण्य मिळविले. १९४९ मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ पॅरिस येथून त्याने डी. एससी. पदवी प्राप्त केली.

देब्र्यू यांनी १९४९ मध्ये रॉकफेलर शिष्यवृत्ती प्राप्त करून त्या आधारे अमेरिकेतील हार्व्हर्ड, बर्कली, शिकागो, कोलंबिया इत्यादी विद्यापीठांना भेटी देऊन संशोधन केले. त्याच वर्षी शिकागो विद्यापीठाशी संलग्न काऊलेस कमिशन संस्थेत ते रुजू झाले. तेथे त्यांनी साधारण आर्थिक समतोल (General Economic Equilibrium) व उपयोगिता सिद्धांत यांसंदर्भात विशेष काम केले. सदर कमिशन येल विद्यापीठाकडे वर्ग केले गेल्यानंतर १९५५ मध्ये ते तिकडे गेले. देब्र्यू यांनी १९६०-६१ मध्ये स्टॅनफोर्ड विद्यापीठात अध्यापन केले. त्यानंतर ते १९६२ मध्ये कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कली येथे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. त्याच ठिकाणी निवृत्तीपर्यंत (१९९१) वरिष्ठ प्राध्यापक म्हणून काम केले. दरम्यान १९७५ मध्ये त्यांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले. देब्र्यू हे जेव्हा गणिताचा उपयोग अर्थशास्त्रीय समस्या अभ्यास करण्याकडे वळले, तेव्हापासून या क्षेत्रात त्यांचे नाव झाले. त्यांच्या १९५९ मधील थिअरी ऑफ व्हॅल्यू : ॲन ॲक्झिऑटिक ॲनॅलिसिस ऑफ इकॉनॉमिक इक्विलिब्रिअम या ग्रंथाने त्यांना विशेष प्रसिद्धी मिळवून दिली.

देब्र्यू यांनी आपल्या संशोधनाद्वारे स्पर्धात्मक बाजारपेठात वस्तूंची मागणी व पुरवठा यांच्यात सर्वसाधारण समतोल साधला जातो; वस्तूंचे अधिक्य अथवा टंचाई निर्माण होत नाही, असे प्रतिपादन केले. त्यासाठी त्यांनी गणिती प्रणालीचा आधार घेतला. स्पर्धात्मक बाजारपेठांच्या विश्लेषणासाठी त्यांनी स्वत:ची नावीन्यपूर्ण पद्धत उपयोगात आणली. बाजारपेठेतील मूल्यव्यवस्थेमुळे (Price System) वस्तूंना असलेली जादा मागणी स्थिरावते वा कमी होते. १९६०-६१ मध्ये स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या वर्तनवादीशास्त्र विभागात त्यांनी यासंदर्भात ग्राहकांच्या वर्तनाचा अभ्यास केला. गणिती अर्थशास्त्रात निष्णात असलेले देब्र्यू स्वत: कोणत्याही विशिष्ट आर्थिक विचारधारेशी बांधिलकी मानणारे नव्हते. आर्थिक समतोलाच्या विश्लेषणासाठी त्यांनी बहुतेक वेळ दिला असला, तरी क्वचित प्रसंगी अर्थव्यवस्थेतील सातत्याच्या अभावामुळे निर्माण होणाऱ्या आर्थिक असमतोलाकडे त्यांनी लक्ष वेधले. स्पर्धात्मक अर्थव्यवस्थेत साधारण आर्थिक समतोलाचे वास्तव मान्य करावे लागते, त्यासाठी आर्थिक प्रतिमानांचा (Models) आधार घेणे क्रमप्राप्त असते. त्यासाठीच गणित व अर्थशास्त्र या दोन्ही शाखांचा एकत्रित वापर/विनियोग महत्त्वाचा ठरतो. अर्थविषयक व्यवहारांना शास्त्रीय बैठक देऊन अर्थशास्त्र हे खरेखुरे शास्त्र बनवण्याचा त्यांचा प्रयत्न स्तुत्य असा होता. नोबेल पुरस्कार वितरणाच्या वेळी त्यांनी केलेल्या भाषणानंतर अकॅडेमीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात देब्र्यू यांची आर्थिक विचारासंबंधीची स्पष्टता, विश्लेषणात्मक कौशल्य, सिद्धांताची चिकित्सा अर्थशास्त्रीय समस्यांची उकल करण्यासाठी उपयुक्त ठरल्याचे म्हटले आहे.

देब्र्यू यांचे महत्त्वाचे ग्रंथ पुढीलप्रमाणे : थिअरी ऑफ व्हॅल्यू : ॲन ॲक्झिऑटिक ॲनॅलिसिस ऑफ इकॉनॉमिक इक्विलिब्रिअम (१९५९), इकॉनॉमिक थिअरी इन मॅथॅमेटिकल मॉडेल्स (१९८३), मॅथॅमेटिकल इकॉनॉमिक्स ॲण्ड काऊलेस (१९८३), ऑटोबायोग्राफी (१९८४), थिऑरिटीकल मॉडेल्स (१९८६), मॅथॅमेटिकल इकॉनॉमिक्स (१९८६), मॅथॅमेटायझेशन ऑफ इकॉनॉमिक थिअरी (१९९१), एक्झिस्टन्स ऑफ ॲन इक्विलिब्रिअम फॉर ए कॉम्पिटेटिव्ह इकॉनॉमी (२०१० – सहलेखक).

देब्र्यू यांना मूलभूत संशोधनासाठी पुढील सन्मान लाभले : फ्रेंच लेजियत ऑनर (१९७६), इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसचे सभासदत्व (१९७७), अमेरिकन इकॉनॉमिक असोसिएशनचे अध्यक्षपद (१९९०).

देब्र्यू यांचे पॅरीस येथे निधन झाले.

समीक्षक – संतोष दास्ताने

प्रतिक्रिया व्यक्त करा