जोगळटेंभी  नाणेसंचय :  जोगळटेंभी (ता. सिन्नर, जि. नाशिक) येथील प्रसिद्ध नाणी. १९०८ मध्ये पश्चिमी क्षत्रप राजवंशातील क्षहरात घराण्यातील नहपान राजाच्या चांदीच्या नाण्यांचा मोठा संचय येथे सापडला. या संचातील १३,२५० एवढ्या नाण्यांची अधिकृत नोंद आढळत असली, तरी प्रत्यक्षात या नाण्यांची संख्या १४,००० ते १५,००० असावी, असे नोंदवले आहे. हा नाणेसंचय प्रथम रेव्ह. एच. आर. स्कॉट यांनी प्रसिद्ध केला (१९०८).

जोगळटेंभी येथील नहपानाचे नाणे.

नाणेसंचयाचे स्वरूप : या संचयात सापडलेल्या १३,२५० नाण्यांपैकी ९,२७० नाणी ही नहपानाचा समकालीन सातवाहन कुळातील राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने आपल्या स्वतःच्या  चिन्हांनी पुनर्मुद्रांकित (counter-struck) केलेली होती. गौतमीपुत्र  सातकर्णी  हा नहपानाचा  शत्रू होता. त्याचा नहपानाबरोबर दीर्घकाळ संघर्ष सुरू होता. या संघर्षाचे पर्यवसान गौतमीपुत्राने नहपानाचा व पर्यायाने त्याच्या क्षहरात वंशाचा  उच्छेद करण्यात झाले, असे उल्लेख  तत्कालीन अभिलेखीय व साहित्यिक नोंदींमध्ये आढळतात. उर्वरित जवळपास ४,००० नाण्यांवर मात्र अशा प्रकारचे गौतमीपुत्र सातकर्णीचे अंकन आढळत नाही. प्राप्त साठ्यापैकी एकूण २,००० नाण्यांना भोके पाडली आहेत.

नाण्यांचे वर्णन : प्राप्त सर्व नाणी चांदीची असून १.८० ते २.१० ग्रॅ. वजनाची आहेत. फक्त नहपानाचे अंकन असलेल्या नाण्यांचे वर्णन पुढीलप्रमाणे : नाण्यांच्या दर्शनी भागावर राजाची टोपी घातलेली अर्धप्रतिमा आहे. राजाच्या प्रतिमांमध्ये वैविध्य आढळत असून राजाच्या तारुण्यापासून ते वृद्धत्वापर्यंत वयाच्या निरनिराळ्या टप्प्यांवरील प्रतिमा नाण्यांवर आढळतात. प्रतिमांचे अंकन वास्तवदर्शी व कौशल्यपूर्ण आहे. दर्शनी भागावरील गोलाकार कडेवर ग्रीको-रोमन लिपीतील लेख आहे. हा लेख म्हणजे नाण्याच्या मागील बाजूवरील ब्राह्मी व खरोष्ठी लिपीतील लेखांचे लिप्यंतर आहे. बऱ्याच नाण्यांवरील ग्रीको-रोमन लिपीतील लेख अशुद्ध रूपातील आहे. नाण्यांच्या मागील बाजूस नहपानाचा पूर्वज असलेल्या भूमकाच्या नाण्यांवर दर्शनी बाजूवर आढळणारी वज्र व बाण ही चिन्हे आहेत. वज्र व बाणाच्या मध्ये टिंब आहे. मागील बाजूच्या  गोलाकार कडेवर ब्राह्मी लिपीतील ‘राज्ञो क्षहरातस नहपानसʼ हा व खरोष्ठी लिपीतील ‘राञो छहरतस नहपनसʼ असे लेख आहेत. नाण्यांवर वर्षाचा उल्लेख आढळत नाही.

गौतमीपुत्र सातकर्णीने  पुन्हा अंकन केलेल्या नाण्यांचे वर्णन : नहपानाच्या नाण्यांवर गौतमीपुत्राने आपले छाप मारलेले आढळतात. यामध्ये सामान्यतः दर्शनी बाजूवर चैत्य व गोलाकार कडेवर ‘राञो गोतमीपुतस सिरि सातकनिसʼ हा ब्राह्मी लिपीतील लेख आढळतो. तर मागील बाजूस उज्जैन चिन्ह आहे.  तथापि काही वेळा पुढील व मागील बाजूंवरील चिन्हांची अदलाबदल झालेली दिसून येते. गौतमीपुत्राने केलेले अंकन ठसठशीत स्वरूपाचे असल्यामुळे त्यावरील चिन्हांची वैशिष्ट्ये ओळखणे शक्य होते. चैत्य व उज्जैन चिन्हांमध्ये आढळणारी वैविध्ये बघता वेगवेगळे छाप वापरल्याचे लक्षात येते. तसेच काही नाण्यांवरील लेख सुस्पष्ट व नीटनेटके असून काहींवरील अक्षरे मोठी, वेडीवाकडी व अस्पष्ट असल्याचे दिसून येते. वर्षाचा उल्लेख आढळत नाही.

नाणेसंचयाचे महत्त्व : नहपानाच्या काही फुटकळ नाण्यांच्या प्राप्तीनंतर प्रथमच एवढा मोठा नाणेसमुच्चय नाणेसंशोधकांना अभ्यासासाठी प्राप्त झाला. या उपलब्धीमुळे तत्कालीन नाणेपद्धतीवर तर प्रकाश पडतोच; पण त्याचबरोबर पश्चिमी क्षत्रप व सातवाहन राजवंशाच्या राजकीय इतिहासावरही प्रकाश पडतो. पश्चिमी क्षत्रप व सातवाहन राजांच्या परस्परसंबंधाचे विश्लेषण याद्वारे करणे शक्य होते. विशेषतः गोदावरी खोऱ्यातील या दोन राजवंशांचा संघर्ष अधोरेखित होतो.  याबरोबरच तत्कालीन सांस्कृतिक व आर्थिक परिस्थिती समजून घेण्यासाठीही या नाणेसंचयाची मदत होते. या नाण्यांवरून नहपानाच्या राज्याची भौगोलिक सीमा ठरवता येते. त्याचबरोबर गौतमीपुत्र सातकर्णीने नहपानाचा उच्छेद केल्यानंतरही त्याची नाणी पुन्हा अंकन करून चलनात आणल्याचे कळते. थोडक्यात तत्कालीन इतिहासाचे साधन म्हणून या नाणेसंचयाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

संदर्भ :

  • Jha, Amiteshwar & Rajgor, Dilip, Studies in the Coinage of the Western Kshatrapas, Indian Institute of Research in Numismatic Studies, Anjaneri, 1992.
  • Scott, H. R. ‘The Nasik (Jogaltembhi) Hoard of Nahapan’s Coinsʼ, The Journal of the Bombay Branch of the Royal Asiatic Society, Vol. XII, pp. 223- 244, Bombay, 1908, Reprint-1969.
  • Shastri, A. M. The Satvahanas and The Western Kshatrapas, Nagpur, 1998.
  • पाठक, अ. शं. संपा., महाराष्ट्र प्राचीन काळ (खंड १), दर्शनिका विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई, २००२.

                                                                                                                                                                                                           समीक्षक : अरुणचंद्र पाठक ; मंजिरी भालेराव