रोमन देवतासमूहातील एक ख्यातकीर्त स्त्रीदेवता. मूळात ती एक वनदेवता मानली जाई. ती चंद्र आणि मृगया यांची देवता असून ग्रीक देवता आर्टेमिस आणि डायना ह्या एकच असल्याचे मानले जाते. डायना (आर्टेमिस) ही ज्यूपिटर (झ्यूस) व लेटोना (लेटो) यांची कन्या व अपोलोची जुळी बहीण होय. ती एक निष्कलंक कुमारी तसेच वनदेवता व पारधदेवता मानली जाई. तिच्या ग्रीक रूपानुसार वन्य प्राण्यांचीही ती स्वामिनी होती. सुफलतेशी असलेल्या डायनाच्या घनिष्ठ संबंधांमुळे स्त्रिया गर्भधारणा व्हावी म्हणून तसेच प्रसूती सुलभ व्हावी व नवजात बालकाचे संरक्षण व्हावे म्हणून तिची उपासना करीत. आर्टेमिसशी तादात्म्य पावल्यामुळे ती चंद्रदेवता व नंतर प्रकाशाची देवता बनली. डायना ही निष्कलंक कुमारी मानली जात असे. मिनर्व्हा आणि वेस्टा या देवतांप्रमाणे डायनाने आजन्म अविवाहित राहण्याचे व्रत घेतले होते.

डायनाच्या उपासनेचे लॅटिन लीगमध्ये दोन प्रमुख संप्रदाय अरिशीआ व ॲव्हन्टाइन येथे होते. अरिशीआ हे ठिकाण रोमच्या दक्षिणेस असून तिथे ‘डायना नेमोरेन्सिस’ म्हणजे वनदेवता डायना नावाचे तिचे प्रमुख केंद्र होते. शिवाय लॅटिन जगतात सर्वत्र डायनाची प्रार्थनास्थळे होती. लॅटिन लीगमधील सर्वांचेच हे प्रमुख उपासनाकेंद्र असल्यामुळे त्याला राजकीय दृष्ट्याही महत्त्व होते. व्हर्बीयस हा वीरदेव तसेच ईजीरिया ही देवी या गौण देवतांसमवेत डायनाची तेथे उपासना होत असे. लॅटिन लीगमध्ये रोमचा अंतर्भाव झाल्यावर रोमकडे त्याचे नेतृत्व आले आणि आपातत: डायनाचा उपासनासंप्रदाय रोममध्ये प्रविष्ट झाला. धार्मिक खेळांच्या वेळी रोममध्ये ॲव्हन्टाइन-डायनाची व अपोलोची संयुक्तपणे उपासना होईल. रोममधील ॲव्हन्टाइन टेकडीवर एका उपवनात हे डायनाचे प्रमुख मंदिर सर्व्हिअस तूलीअस याने इ.स.पू. सहाव्या शतकात बांधले. याशिवाय आशिया मायनरमधील इफसस येथील डायनाचे मंदिर प्राचीन जगातील सात आश्चर्यांत एक गणले जाते. थोरल्या प्लिनीच्या मते त्यात शंभर अलंकृत स्तंभ असून त्याची उंची १५.४ मीटर होती.

प्रतिवर्षी १३ ऑगस्ट रोजी डायनाचा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी स्त्रिया तिची मनोभावे पूजा करीत. धार्मिक खेळांच्या वेळीही रोममध्ये ॲव्हन्टाइन-डायनाची व अपोलोची संयुक्तपणे उपासना होई. रोमन शिल्पकला आणि चित्रकला यांतसुद्धा डायनाचा सुंदर आविष्कार दिसून येतो. यात ती एका तरुण आणि सुंदर स्त्री शिकाऱ्याच्या वेशात हातात धनुष्य आणि पाठीवर बाणांचा भाता यांसह दिसून येते. तसेच तिच्या सोबत शिकारी कुत्रा किंवा हरीण दिसून येते. काही वेळा तिची प्रतिमा चन्द्रकोरीने युक्त अशी दाखवली जाते.

गुलाम किंवा सामाजिक दृष्ट्या खालच्या स्तरातील लोकांची देवता या नात्याने डायनाच्या उत्सवप्रसंगी सर्व गुलामांना सुटी दिली जाई. तसेच अरिशीआ येथील तिचा पुरोहित सुद्धा मुक्त झालेला पुरुष-गुलामच असे. आधीच्या गुलाम पुरोहिताचा नव्या गुलामाने द्वंद्वात वध केला म्हणजे तत्कालीन प्रथेनुसार तो तिचा नवा पुरोहित बनत असे. डायनाच्या काही ठिकाणच्या मंदिरामध्ये गुलामांच्या निवासाचीही सोय होत असे.

डायना या देवतेच्या व्यक्तित्त्वात एकाच वेळी मानवी जगापासून दूर असलेल्या अद्भुत विश्वातील सार्वभौमत्व आणि त्याच वेळी प्रसूतीशी असलेल्या संबंधातून मानवी प्रजोत्पत्तीवरील नियंत्रण अशी दैवी आणि मानवी वैशिष्ट्ये एकत्र आलेली आहेत.

संदर्भ :

  • Berens, E. M. The Myths & Legends of Ancient Greece and Rome, New York, 1886.
  •  Graves, Robert, The Greek Myths, UK, 1955.

समीक्षक – सिंधू डांगे

प्रतिक्रिया व्यक्त करा