मर्टन, रॉबर्ट सी. : (३१ जुलै १९४४). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व नोबेल स्मृती पुरस्काराचा सहमानकरी. वित्तीय बाजारपेठांसाठी ब्लॅक-शोलेस-मर्टन प्रतिमान (Model) ही गणिती प्रणाली विकसित केल्याबद्दल १९९७ मध्ये मर्टन यांना मायरॉन स्कोलेश (Myron Scholes) यांच्या बरोबरीने नोबेल स्मृती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मर्टन हे एम. आय. टी. स्लोअन स्कूल ऑफ मॅनेजमेंट या संस्थेत अर्थशास्त्र व वित्त या विषयांचा सन्माननीय प्राध्यापक आहेत.

मर्टन यांचा जन्म न्यूयॉर्क सिटी येथे झाला. न्यूयॉर्कामधील हास्टिंग-हूडसन या उपनगरात त्यांचे बालपण गेले. कोलंबिया विद्यापीठातून गणिती अभियांत्रिकी हा विषय घेऊन १९६६ मध्ये त्यांनी बी. एस. पदवी प्राप्त केली. कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून सुप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ पॉल अँटनी सॅम्युएल्सन (Paul Anthony Samuelson) यांच्या मार्गदर्शनाखाली १९७० मध्ये त्यांनी अर्थशास्त्र विषयातील पीएच. डी. प्राप्त केली. लगेचच एम. आय. टी. स्लोअन स्कूल ऑफ मॅनेजमेंट या संस्थेत सहायक प्राध्यापक म्हणून ते रूजू झाले व तेथे १९८८ पर्यंत अध्यापन केले. त्यांनी १९८८ – १९९८ या काळात ॲडमिनिस्ट्रेशन या पदावर काम केले. पुढे त्याच ठिकाणी जॉन ॲण्ड नॅटीमॅक-अर्थर युनिव्हर्सिटी प्रोफेसर पद सांभाळले. २०१० मध्ये हार्व्हर्ड विद्यापीठातून निवृत्त होऊन पुन्हा एम. आय. टी. स्लोअन स्कूल ऑफ मॅनेजमेंट या संस्थेत रूजू झाले. आपल्या सेवाकाळात अध्यापन व संशोधनाबरोबरच अनेक नियतकालिकांच्या संपादक मंडळाच्या प्रमुखपदी त्यांनी काम केले. दरम्यान त्यांनी लाँग टर्म कॅपिटल मॅनेजमेंट नावाची गुंतवणूक पेढीही सुरू केली; तथापि १९९८ मध्ये ती बंद केली गेली.

मर्टन यांनी वित्तीय व आर्थिक सिद्धांतासंदर्भातील विविध विषयासंबंधी संशोधन केले असले, तरी त्यापैकी भांडवल बाजारातील रोख्यांच्या किंमतीचे निर्धारण याबाबतचे त्यांचे संशोधनकार्य अधिक प्रभावी मानले जाते. शिवाय जीवनचक्र व निवृत्ती पश्चातील अर्थकारण, पर्याप्त गुंतवणूक निवड, भांडवली मालमत्ता, मूल्य निर्धारण, पतधोरण जोखीम, कर्जपुरवठा, वित्तीय नवप्रवर्तन, संस्थात्मक बदलांचे गतिक इत्यादी विषयांसंबंधी त्यांनी संशोधन केले. मर्टन यामच्या संशोधन कार्याचे १९६८ – ९७७; १९७७ – १९८७ व १९८८ ते आजतागायत असे तीन टप्पेसमोर येतात. पैकी पहिल्या टप्प्यात तहहयात पर्याप्त सेवन, गुंतवणूक निवड, मालमत्ता मूल्य, निर्धारण समतोल व आकस्मित मागणी निर्धारण यांसाठीची प्रणाली (Models) विकसित केली, तर दुसऱ्या टप्प्यात सदरच्या प्रणाली प्रत्यक्ष व्यवहारामध्ये लागू करण्यावर भर दिला. विशेषत: सामाजिक विमा योजना तसेच खाजगी क्षेत्रातील जोखीम तसेच फायदे यांविषयी शोधनिबंध लिहून ते प्रसिद्ध केले. मुदत ठेवी विमा संरक्षण, बाजारपेठा गतिक, व्यवसाय पेढ्यांचे गुंतवणूक धोरण व उपलक्षित (Implicit) कर्मचारी करार यांसाठीच्या प्रणाली लागू करण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. गुंतवणूकीपासून होणारे लाभ कसे वृद्धींगत करावेत व लोकांमध्ये गुंतवणूक निर्णय कौशल्य विकसित व्हावेत यांसाठीच्या प्रणालीही त्यांनी प्रस्तूत केल्या. १९८८ नंतर मर्टन यांनी अमेरिकेतील वित्तीय संस्थांमधील बदल, तत्कालिन परदेशी वित्तीय संस्थांचे कामकाज यांसंदर्भातील संशोधनाने हार्व्हर्ड बिझनेस स्कूलमध्ये वित्तीय व्यवस्था प्रकल्प विकसित केला. यासाठी वित्तीय पुरवठा विषयाचे सहकारी प्राध्यापक व अमेरिकेतील पंधरा बलाढ्य कंपन्यांचे व्यवस्थापक यांचे सहकार्य त्यांना लाभले. अनेक कंपन्यांचे वित्तीय सल्लागार म्हणूनही मर्टन यांनी काम पाहिले.

मर्टन यांचे स्वतंत्र व सहलेखक म्हणून लिहलेले ग्रंथ पुढीलप्रमाणे : कंटिन्यूअस-टाईम फायनान्स (१९९०), अ कलेक्टेड सायन्टिफिक दि ग्लोबल फायनान्सियल सिस्टिम (१९९५ – सहलेखक), अप्लाइड स्टडीज ऑफ फायनान्सियल इनोव्हेशन (१९९६ – सहलेखक), ए फंक्शनल परस्पेक्टिव्ह फायनान्स (२००० – सहलेखक), ब्लॅकबोर्ड (२००० – सहलेखक), फायनान्स (२००१ – सहलेखक), ट्रान्स्फरन्सी, रिस्क मॅनेजमेंट ॲण्ड इंटरनॅसनल (२००३), फाउंडेशन ॲण्ड ट्रेडर्स इन फायनान्स (२००६ – सहलेखक), फाउंडेशन ॲण्ड ट्रेंट्स : दि डेरिव्हेटीव्ज सोर्सबुक (२००६), फायनान्सियल इकॉनॉमिक्स (२००९ – सहलेखक), व्हर्थ दि रिस्क : इनोव्हेशन ॲण्ड दि फ्युचर ऑफ फायनान्स (२०१०), थिअरी ऑफ रॅश्नल ऑप्शन प्राइसिंग (२०१५).

मर्टन यांना नोबेल पुरस्काराव्यतिरिक्त त्यांच्या अर्थशास्त्रातील संशोधन कार्याबद्दल पुढील सन्मान लाभले : इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ फायनान्सियल इंजिनियर्स अवॉर्ड (१९९३), अमेरिकन नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसचे सदस्यत्व (१९९३), लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड इन मॅथॅमेटिकल सायन्स (१९९९), हार्व्हर्ड विद्यापीठाच्या बेकर ग्रंथालयात सन्मानार्थ मर्टन एक्झिबिटची स्थापना (२००५), कोल्मोगोरोव मेडल (२०१०).

समीक्षक – संतोष दास्ताने

प्रतिक्रिया व्यक्त करा