फॅमा, यूजीन एफ. : (१४ फेब्रुवारी १९३९). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिकाचा सहमानकरी. अर्थतज्ज्ञ रॉबर्ट जेम्स शिलर शिलर (Robert James Shiller) व लार्स पीटर हॅन्सेन (Lars Peter Hansen) यांच्या जोडीने फॅमा यांना अनुभवजन्य गुंतवणूक सिद्धांत तसेच मालमत्ता मूल्यनिर्धारण यांसंदर्भातील संशोधनाबद्दल अर्थशास्त्र विषयाचा २०१३ मध्ये नोबेल पुरस्कार देण्यात आला.

फॅमा यांचा जन्म बोस्टन (Massachusetts) शहरात झाला. तो शालेय जीवनात एक उत्तम खेळाडू होता. १९६० मध्ये टफ्ट्स विद्यापीठातून त्यांनी स्वच्छंदतावाद भाषा (Romance Language) या विषयात पदवी मिळविली. त्यानंतर १९६३ मध्ये शिकागो विद्यापीठातून एम. बी. ए. आणि १९६४ मध्ये पीएच. डी. या पदव्या त्यांनी प्राप्त केल्या. ते १९६३ पासून शिकागो विद्यापीठातून वित्तव्यवस्थापन विषयाचे अध्यापन करीत असून १९९३ मध्ये त्यांची रॉबर्ट मॅककॉर्मिक सन्माननीय सेवा प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. त्यांची संपूर्ण शैक्षणिक कारकीर्द शिकागो विद्यापीठातच गेली.

फॅमा यांनी डॉक्टरेटच्या द बिहेविअर ऑफ स्टॉक मार्केट प्रइसेस या आपल्या प्रबंधात भांडवल बाजारात भाग व रोख्यांच्या अल्पकालीन किंमतीतील चढउताराचे भाकित करणे शक्य नसते, किंमती स्वैर (अनियत) पद्धतीने कमी-जास्त होतात, हे अनुमान काढले. सदरचा शोधनिबंध १९६५ मध्ये जर्नल ऑफ बिझनेस  या नियतकालीकेमध्ये प्रसिद्ध झाला. १९६९ मध्ये इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिव्ह्यू या नियतकालीकामधील आपल्या द ॲडजेस्टमेंट ऑफ स्टॉक प्राइसेस टू न्यू इन्फरमेशन या दुसऱ्या लेखात देशात व भागबाजारात घडणाऱ्या घटना आणि त्यांबाबत प्रसिद्ध होणारी आकडेवारी भागांच्या किंमती कमी-जास्त होण्यावर परिणाम करतात, याचे विश्लेषण त्यांनी केले. १९७० मध्ये जर्नल ऑफ फायनान्स या नियतकालीकामधील ‘प्रबळ भांडवल-बाजारʼ (Efficient Capital Market) ह्या शोधनिबंधामुळे त्यांचे नाव सर्वत्र झाले. सदरच्या लेखात फॅमा यामनी भागबाजारासंबंधी दोन नवीन संकल्पना मांडल्या. एक म्हणजे, त्यांनी बाजाराच्या बल रूप (Strong Form), अंशत: प्रबळ रूप व दुर्बल रूप (Weak Form) अशा तीन प्रकारच्या परिणामकारकता (Efficiency) विशद केल्या. माहितीसंचाच्या (Information sets) उपलब्धतेनुसार रोख्यांच्या किंमतीवर होणाऱ्या परिणामांना अनुसरून असे वर्गीकरण करण्यात आले. दुर्बल प्रकारात (रूपात) सार्वजनिक रीत्या उपलब्ध होणाऱ्या माहितीचे प्रतिबिंब किंमत पातळीत पडते; कारण कंपन्या आपल्या वार्षिक, सहामाही, तिमाही कामगिरीसंबंधीची आकडेवारी जाहीरपणे प्रसिद्ध करतात. प्रबळ प्रकार सर्व माहितीसंचांशी निगडित असतो, सार्वजनिक तसेच खाजगी रीत्या उपलब्ध होणाऱ्या माहितीचा प्रभाव किंमत पातळीमध्ये दिसून येतो.

फॅमा यामच्या दुसऱ्या दाव्यानुसार (Contention) त्यांच्या बाजार समतोल प्रतिकृतीने (Market Equilibrium Model) नाकारल्याशिवाय कार्यक्षम (प्रबळ) रोखे लाभांच्या संदर्भात तपासले गेले पाहिजे. त्यादृष्टीने संशोधकांनी या संदर्भातील प्रतिकृतीमध्ये आवश्यक ते फेरफार करावेत व गृहीतके तपासून घ्यावीत. जे गुंतवणूकदार बऱ्यापैकी लाभ व्हावा यासाठी भाग-रोखे बाजारात पैसे गुंतवितात त्यांना फॅमा यांचा वरील दृष्टिकोन उपयुक्त ठरेल. अल्पावधीसाठी गुंतवणूक केलेल्या भागांच्या किंमतीबाबतचे अंदाज बांधणे कठीण असते. व्यावसायिक पेढ्यांनाही अल्पमुदतीच्या गुंतवणूकीचा लाभ उठवता येत नाही. त्यादृष्टीने समान गुंतवणूकदारांनी अल्पावधीतच जास्त लाभ उठवणाऱ्या भानगडीत न पडता व्यापक स्वरूपात दीर्घ मुदतीची छोट्या गुंतवणूकदारांना गुंतवणूकीचे अर्थसंकल्पन करताना दिशा मिळण्यास मदत होईल.

फॅमा यांनी लिहिलेली दि थिअरी ऑफ फायनान्स (सहलेखक – १९७२) आणि फाउंडेशन ऑफ फायनान्स (१९७६) ही पुस्तके विशेष गाजली. त्यांचे शंभरहून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध झाले.

फॅमा यांना नोबेल पुरस्काराव्यतिरिक्त अर्थशास्त्रविषयक योगदानाबद्दल पुढील मानसन्मान लाभले : बेल्जियम नॅशनल सायन्स प्राइझ (१९८२), अमेरिकन फायनान्स सायन्स असोसिएशन अधिछात्र (२००१), डच बँक प्राइझ इन फायनान्शिय़ल इकॉनॉमिक्स (२००५), फ्रेड आर टीसी इनोव्हेशन अवॉर्ड (२००७), मॉर्गन स्टॅन्ले अमेरिकन फायनान्स असोसिएशन अवॉर्ड (२००८), ओनॅसिस प्राइझ इन फायनान्स (२००९). तसेच त्यांना पुढील विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट मिळाल्या : रोचेस्टर विद्यापीठ, डे पॉल विद्यापीठ, कॅथेलिक विद्यापीठ, बेल्जियम व टफ्स विद्यापीठ.

दृकश्राव्य दुवा : https://www.nobelprize.org/prizes/economic-sciences/2013/fama/prize-presentation/http:/

समीक्षक – संतोष दास्ताने

प्रतिक्रिया व्यक्त करा