मानवी समूहांत वेगवेगळ्या काळांत दृश्य कलाकृतींचा दर्जा आणि गुणवत्ता यांबाबत निरनिराळे निकष अस्तित्वात असतात व त्यांनुसार उपलब्ध कलाकृतींचा अन्वयार्थ लक्षात घेणे सोपे जाते. दृश्यकलांचे कालानुरूप वर्गीकरण केले आणि कोणत्या विशिष्ट कालखंडात एखादी कलाकृती निर्माण झाली आहे हे लक्षात घेतले, तर त्या कलाकृतीचा स्वीकार करताना कलाकृतीला योग्य न्याय देता येतो.
विशिष्ट काळात होणाऱ्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक बदलांचा परिणाम कलाकृतीवर होत असतो. याशिवाय तंत्र आणि कौशल्याच्या बाबतीत प्रगती अथवा अधोगतीचा परिणाम कलाविष्कारावर होतो. सरावाने आणि जाणीवपूर्वक केलेल्या प्रयोगांमधून कलाकृतीमध्ये तंत्र आणि कौशल्याबाबत अचूकता येत जाते. अशा अवस्थेत तत्कालीन सर्व कलावंत तो प्रवाह स्वीकारतात. विशिष्ट काळात पोशिंदावर्गही आपापली एक अभिरुची निर्माण करीत असतो. बहुतेक सर्व कालखंडांत अशा पोशिंद्या वर्गाच्या संतोषासाठीदेखील कलाकृती तयार केल्या जातात आणि मुद्दामहून करवून घेतल्या जातात. साहजिकच ‘पोशिंद्यांचा संतोष हाच कलावंतांचा संतोष’ असा कलेसाठी एका अर्थाने पाठिंबा आणि दुसऱ्या अर्थाने धोका निर्माण होतो. ‘मागणी तसा पुरवठा’ या न्यायाने कलाकृती प्रत्येक माध्यमात मोठ्या प्रमाणात निर्माण होतात. त्यामध्ये तोचतोचपणा आणि वारंवारता येते. क्वचित अशा प्रक्रियेतून शैलीचा उदय होतो.
त्याच कालखंडात किंवा नंतरच्या काळात एखादा स्वतंत्र वृत्तीचा विचारवंत, जिला कलातंत्र उत्तम अवगत आहे अशी व्यक्ती, एखादे नावीन्यपूर्ण असे संशोधन दृश्यकलेत करून सप्रयोग ते संशोधन कलाकृतीमार्फत सिद्ध करते. अशा कालखंडाला सामोरे जाताना ती कलाकृती इतर समकालीनांपेक्षा कशी वेगळी आहे, तिचे महत्त्व काय आहे, ते समजावून घेणे महत्त्वाचे असते. कारण कालखंडानुसार होणाऱ्या वर्गीकरणात या नव्या कलाप्रयोगाचा परिणाम पुढील कालखंडावरील कलेवर होण्याची शक्यता निर्माण होते. बहुधा त्यानंतरच्या काळात हा प्रयोग स्वीकारला जातो. तो स्थिरावतो आणि त्याच्या आवृत्त्या इतर सामान्य कलावंत आपापल्या पद्धतीने परंतु अतिशय थोड्या फरकाने करीत जातात. मग पुन्हा पोशिंदावर्ग आपली अभिरुची नव्याला पोषक करतो. पुनःपुन्हा तोचतोचपणा दृश्यकलेत येत जातो. ‘अति तेथे माती’ या उक्तीप्रमाणे फक्त कौशल्य आणि पोशिंद्याचे समाधान आणि संतोष राहतो. कदाचित कलावंताला त्यात्या कालखंडात सन्मान, प्रतिष्ठा मिळते; परंतु कलाकृती आणि कलावंत अजरामर होणे अशा अवस्थेत दुरपास्त होते. विशिष्ट काळात त्याकडे शैली म्हणून पाहिले जाते. तर अशा चक्रामधून कलाप्रवाह वाहत असतो. हे चक्र अव्याहतपणे चालू असते. हा दृष्टिकोन नानाविध कालखंडांतील कलाकृती पाहताना ठेवल्यास कलाकृतींचा अभ्यास करताना निकोप दृष्टी येण्यास मदत होते. या चक्राला आपण ‘कला-चक्र’ म्हणू. पाहा : (आकृती १).
विशेष कालखंडातील विज्ञान आणि तंत्रज्ञान यांबाबत काही प्रगती होत असेल, तर कलावंत त्याचा फायदा करून घेतो. नवे माध्यम वापरून पाहतो. चित्र रंगवण्याचे पृष्ठभाग आणि रंगद्रव्यमाध्यम, तसेच रंग लावण्याची साधने विविध कालखंडांत बदलताना दिसतात. त्यांची व्याप्ती आणि मर्यादा लक्षात घेतली म्हणजे कलाकृतीचे महत्त्व सामोरे येत जाते.
प्रत्येक कालखंडात कलाकाराला त्याच्या जीवनमानात समोर प्रत्यक्ष काय दिसत असते, त्याचाही विचार करणे अभिप्रेत आहे. कलाकारासमोर घडणाऱ्या हरतऱ्हेच्या घटनांना तो प्रतिसाद देत असतो; मग त्या वैचारिक असोत किंवा प्रत्यक्ष घडणाऱ्या असोत. काही कालखंडांत त्यापूर्वीच्या कलाप्रकाराचे चळवळ म्हणून पुनरुत्थान केलेले असते. या संदर्भात प्रबोधनकाळातील कलाकृतींवरील ग्रीक-रोमन कलेच्या प्रभावाचे उदाहरण घेता येईल. पुनरुत्थानाचे हे उत्तम उदाहरण आहे. बंगाली शैलीतील असे कलाप्रकारही परिचित आहेतच. काही कालखंडांत व्यापारसंबंध, मानवी समूहाचे स्थलांतर इत्यादी मुद्दे लक्षात घेतले जातात. काही कलाकृती या काळाच्या संदर्भातच पाहायच्या असतात, तर काही कलाकृती कालसापेक्ष असतातच असे नाही आणि त्यांना ‘कालातीत कला’ असे संबोधले जाऊ शकते.
समीक्षक – नितीन हडप