फेल्प्स, एडमंड : (२६ जुलै १९३३). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिकाचा मानकरी. त्यांना देशाच्या अल्प व दीर्घ मुदतीच्या आर्थिक धोरणातील परस्पर संबंधाच्या संदर्भातील संशोधनासाठी २००६ मध्ये अर्थशास्त्र विषयातील नेाबेल स्मृती पुरस्कार मिळाला.
त्यांचा जन्म अमेरिकेतील इव्हॅन्स्टन-इलिनॉय येथे झाला. वयाच्या सहाव्या वर्षी ते आपल्या कुटुंबियांसह न्यूयॉर्कमधील हॉस्टींग-ऑन-हडसन येथे वास्तव्यासाठी गेले. १९५५ मध्ये ॲम्हर्स्ट महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातील बी. ए., तर १९५९ मध्ये येल विद्यापीठातून पीएच. डी. या पदव्या त्यांनी प्राप्त केल्या. सुरुवातीला रँड कार्पोरेशनमध्ये वर्षभर नोकरी केल्यानंतर १९६० मध्ये येल विद्यापीठाच्या काऊलेस फौंडेशन संस्थेत संशोधक म्हणून त्यांनी काम केले. १९६६ – १९७२ या काळात त्यांनी येल विद्यापीठाच्या पेनिसिल्व्हेनिया विद्यापीठात अर्थशास्त्र विषयाचे अध्यापन केले. १९६८ मध्ये जर्नल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी या नियतकालीकामध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या मनी-वेज डायनॅमिक्स ॲण्ड लेबर मार्केट इक्विलिब्रिअम या शोधनिबंधाला मोठी प्रसिद्धी मिळाली. त्यांनी २००१ मध्ये रोमन फ्रिडमन यांच्या सहकार्याने कोलंबिया विद्यापीठात ‘सेंटर ऑन कॅपिटॅलिझम ॲण्ड सोसायटीʼ या संस्थेची स्थापना केली.
फेल्प्स यांनी चलनवाढीचा दर कमी होण्याने रोजगारनिर्मितीचा दरही कमी होतो, ह्या तत्पूर्वीच्या गृहीतकाला आव्हान दिले. १९६०च्या अखेरीस मागणीत वाढ होण्याच्या दृष्टीने आखलेली वित्त व चलनविषयक वृद्धी धोरणे बेरोजगार कमी करतील हा आशावाद चुकीचा असल्याचे त्यांनी निदर्शनाला आणून दिले. अशा आशावादामुळे रोजगारीच्या प्रमाणात दीर्घकालीन नव्हे, तर केवळ अल्पकालीन स्वरूपाचे स्पर्शतरंग संभवतात. किंमती व वेतन स्थिर केल्यामुळे होणारे परिणाम भविष्यकालीन परिस्थितीवर अवलंबून असतात. चलनवाढ झाल्यामुळे राहणीमानाचा खर्च अपेक्षेपेक्षा जास्त वाढतो, तेव्हा साहजिकच कर्मचारीवर्ग जादा वेतनाची मागणी करतो. चलनवाढ व रोजगार वृद्धीमध्ये जेव्हा समतोल प्रस्थापित होतो, तेव्हा चलनवाढ नियंत्रित केली जाऊ शकते. कोणत्याही विकसित व सर्वसमावेशक प्रगती साधणाऱ्या अर्थव्यवस्थेत बेरोजगारी ही नैसर्गिक बाब असून अर्थव्यवस्थेतील बेरोजगारीचा दर नैसर्गिक पातळीवर येतो, तेव्हा आर्थिक समतोल निर्माण होतो.
फेल्प्स यांनी पुढे आर्थिक प्रतिमानांच्या माध्यमातून अपरिपूर्ण माहिती व तिचे आकलन तसेच लोकांच्या बाजारपेठांबाबतच्या अपेक्षा व श्रद्धा (Belief) यांबाबत संशोधन केले. सदरच्या प्रतिमानांचा विनियोग बेरोजगारी, सर्वंकष आर्थिक विकास, व्यवसायातील चढउतार (Fluctuations) व आर्थिक गतिकी (Dynamics) यांचा अभ्यास करण्यासाठी केला. विकसित देशांची आर्थिक भरभराट व आर्थिक विकासाचा प्रधान हेतू यांबाबत वेगळा दृष्टिकोण त्याने मांडला. एकोणिसाव्या तसेच विसाव्या शतकाच्या पूर्वाधात काही देशांमध्ये आर्थिक सुबत्ता आलेली असली, तरी त्यामुळे विसाव्या शतकाच्या अखेरीस नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास कसा झालेला आहे व पुढील शंभर वर्षांत काय परिणाम संभवतात यांबाबतही त्यांनी विवेचन केले आहे.
https://www.youtube.com/watch?v=4B6VBZ6HBcw
फेल्प्स यांचे ग्रंथ पुढीलप्रमाणे : फिस्कल न्यूट्रॅलिटी टोअर्डस् इकॉनॉमिक ग्रोथ : ॲनॅलिसिस ऑफ ए टॅक्सेशन प्रिन्सिपल (१९६५), गोल्डन रूल्स ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ : स्टडीज ऑफ इफिशन्ट ॲण्ड ऑप्टिमल इन्व्हेस्टमेन्ट (१९६६), मायक्रोइकॉनॉमिक फाउंडेशन्स ऑफ एम्प्लॉयमेन्ट ॲण्ड इन्फ्लेशन थिअरी (१९७०) इन्फ्लेशन पॉलिसी ॲण्ड अनएप्लॉयमेन्ट थिअरी (१९७२), इकॉनॉमिक जस्टिस (१९७३), स्टडीज इन मॅक्रोइकॉनॉमिक थिअरी (१९८०), पॉलिटिकल इकॉनॉमी : ॲन इन्ट्रोडक्टरी टेक्स्ट (१९८५), दि स्लम्प इन यूरोप (१९८८), सेव्हन स्कूल्स ऑफ मॅक्रोइकॉनॉमिक थॉट (१९९०), स्ट्रक्चरल स्लम्प्स : द मॉडर्न इक्विलिब्रम थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इन्टरेस्ट ॲण्ड ॲसेट (१९९४), रिवॉर्डिंग वर्क : हाउ टू रिस्टोअर पार्टिसिपेशन ॲण्ड सेल्फ सपोर्ट टू फ्री एन्टरप्राइझ (१९९७), एंटरप्राइझ ॲण्ड इन्क्ल्यूजन इन इटली (२००२), डिझायनिंग इन्क्ल्यूजन (२००३) मास फ्लरिशिंग : हाउ ग्रासरूट्स इनोव्हेशन क्रिएटेड जॉब्स, चॅलेंज ॲण्ड चेंज (२०१३). शिवाय त्यांचे असंख्य लेख व शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत.
फेल्प्स यांना नोबेल पारितोषिकाव्यतिरिक्त आपल्या अर्थशास्त्रविषयक संशोधनकार्यासाठी पुढील मानसन्मान लाभले : ॲम्हर्स्ट कॉलेज (१९८५), मॅनहाइम विद्यापीठ (२००१), नोवाब्दी लिसोबा विद्यापीठ (२००४), युनिव्हर्सिटी ऑफ आइसलंड (२००४), इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिकल स्टडीज, पॅरिस (२००६), सिंगुया विद्यापीठ (२००७), लिब्रे दे ब्रूक्सेल्स विद्यापीठ (२०१०) या सर्व विद्यापीठांनी त्याला मानद डॉक्टरेट्स देऊन सन्मानित केले. तसेच त्याला इंटरनॅशनल पॅनेल ऑन इकॉनॉमिक ऑफ ओ. एम. सी. ई., पॅरिस सदस्य (१९९०), अमेरिकन इकॉनॉमिक असोसिएशन अधिछात्र (२००२), चेव्हालिअर दे ला लीजन दीऑनेर (२००८), पिको देला मिरांदोला प्राइझ (२००८), ग्लोबल इकॉनॉमी प्रइस (२००८), सल्लागार, यू. एस. ट्रेझरी डिपार्टमेंट, सिनेट फायनान्स कमिटी व फेडरल रिझर्व्ह बोर्ड; चायना फ्रेंडशिप अवॉर्ड (२०१४) असे अनेक पुरस्कार व सन्मानही लाभले.
समीक्षक – संतोष दास्ताने