हॅरी मॅक्स मार्कोव्हिट्झ : (२४ ऑगस्ट १९२७). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व अर्थशास्त्र विषयाच्या नोबेल पुरस्काराचा सहमानकरी. मार्कोव्हिट्झ हे न्यूयॉर्कमधील सिटी विद्यापीठामध्ये प्राध्यापक असताना १९९० मध्ये आधुनिक गुंतवणूक प्रणाली (Port Folio) विकसित केल्याबद्दल अर्थशास्त्रज्ञ मर्टन एच. मिलर (Merton H. Miller)विल्यम एफ. शार्पे (William F. Sharpe) यांच्याबरोबरीने त्यांना अर्थशास्त्र विषयाचा नोबेल स्मृती पुरस्कार विभागून देण्यात आला. व्यक्तींना गुंतवणुकीपासून मिळणाऱ्या उत्पन्नाबाबतीतील संभाव्यता (probability) तसेच गुंतवणूकयोग्य मालमत्तेसंदर्भातील जोखीम, मिळकत, परस्पर संबंध व वैविध्य (Diversification) या घटकांचा विचार त्यांनी सदर प्रणालीत केला.

मार्कोव्हिट्झ यांचा जन्म शिकागो (इलिनॉय) येथे ज्यू कुटुंबात झाला. शालेय शिक्षण घेत असतानाच त्यांना भौतिकी व तत्त्वज्ञान या विषयांत रुची निर्माण झाली. विख्यात तत्त्वज्ञ डेव्हिड ह्यूम (David Hume) यांच्या तत्त्वज्ञानाचा त्यांच्यावर विशेष प्रभाव पडला. त्यांचे संपूर्ण शिक्षण शिकागो येथेच झाले. त्यांनी १९४७ मध्ये शिकागो विद्यापीठातून बी. फील ही पदवी आणि १९५० मध्ये अर्थशास्त्र विषयातील एम. ए. ही पदवी संपादन केली. विद्यार्थिदशेतच त्यांना शिकागो येथील येल विद्यापीठाच्या कोवलेस कमिशनचे सदस्य म्हणून निमंत्रित केले. १९५५ मध्ये पीएच. डी. ही पदवी मिळविली. मार्कोव्हिट्झ शिकत असतानाच खाजगी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये संशोधन विभागात काम करू लागले. त्यांनी १९५२ – १९६० या काळात रँड कार्पोरेशन-संशोधन विभागात सहायक म्हणून काम केले. १९६१ – १९६३ या काळात General Electric Companyमध्ये आर्थिक सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केले. त्याच काळात त्यांनी १९६२ मध्ये California Analysis Center ही संस्था स्थापन केली. १९६३ – १९६८ या काळात Consolidated Analysis Centerमधील विविध पदांवर त्यांची नियुक्ती झाली. १९६८-६९ मध्ये ते कॅलिफोर्निया विद्यापीठ, San Diego Rady School Of Management या संस्थेत वित्त विषयाचे मानद प्राध्यापक म्हणून काम करू लागले. त्याच दरम्यान १९६८ मध्ये Arbitrage Management Company या संस्थेत त्यांनी काम केले आणि १९७० मध्ये तेथेच मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांना पदोन्नती मिळाली. मार्कोव्हिट्झ यांनी १९७१ मध्ये Stuart And CO. ही कंपनी खरेदी केल्यानंतर पूर्वीच्या कंपनीतून बाहेर पडले. १९७४ – १९८३ या काळात I. B. M. T. J. Watson Research Center येथेही त्यांनी काम केले. १९८० – १९८२ या काळात ते रुटगर्स विद्यापीठात सहप्राध्यापक होता. १९८२ मध्ये ते सिटी विद्यापीठ, न्यूयॉर्कच्या बारुक कॉलेजमध्ये अर्थशास्त्र विषयाचे अध्यापन केले. १९९४ मध्ये ते रॅडी स्कूल ऑफ मॅनेजमेंट, कॅलिफोर्निया विद्यापीठ, सॅन डिएगो येथे वित्त विषयाचे प्राध्यापक म्हणून काम करू लागले. याव्यतिरिक्त Institute Of Management Sciences या संस्थेचे संचालक, ए. एफ. ए. या संस्थेचे अध्यक्ष इत्यादी पदेही त्यांनी भूषविली.

मार्कोव्हिट्झ यांनी भांडवल बाजाराचा अभ्यास करण्यासाठी गणिती विश्लेषणपद्धतींचा वापर केला. कोवलेस कमिशनचे संस्थापक ॲल्फ्रेड कोवलेस यांच्या अतिशय आवडीचा विषय असलेल्या भांडवल बाजारासंबंधी मार्कोव्हिट्झ यांनी प्रबंध लिहावा, यासाठी त्यांचे मार्गदर्शक जेकब मार्सचॅक यांनी त्यांना प्रोत्साहित केले. रँड कार्पोरेशन संस्थेत असताना त्यांनी जॉर्ज डँटझिग यांच्या सहकार्याने शेअर बाजारातील पर्याप्त गुंतवणूक या विषयावरील संशोधनकार्य पुढे नेले. विविध भाग व रोख्यांची निवड कशी करावी, यासाठी त्यांनी स्वत:ची हॅरी मार्कोव्हिट्झ प्रणाली (H. M. Model) विकसित केली. ज्या रोख्यांच्या किंमती एकसारख्या बदलत नाहीत, त्यांमधील गुंतवणूक-जोखीम कशी कमी करता येईल, याबाबतचे मार्गदर्शन सदरच्या प्रणालीद्वारे झाले. गुंतवणुकीपासून मिळणारे सरासरी उत्पन्न व विविध गुंतवणुकींतील प्रमाणित विचलन (Standard Deviation) यांवर आधारलेल्या सदरच्या प्रणालीतील गृहीतके पुढीलप्रमाणे विशद केली. विविध रोख्यांपासून मिळणारे उत्पन्न व जोखीम भिन्न असतात. गुंतवणूकदार जोखीम पत्करण्यास तितकेसे तयार नसतात व सेवनाला प्राधान्य देतात. तसेच सदरचे निष्कर्ष विशिष्ट व एकाच कालावधीत वैध असतात. अनेक गुंतवणूक-पर्यायांमधून सर्वोत्तम पर्याय निवडताना दोन महत्त्वाचे निर्णय अपेक्षित असतात, ते म्हणजे चांगले उत्पन्न देणारे गुंतवणूक संच निश्चित करणे व त्यांपैकी सर्वोत्तम संचाची निवड करणे. ज्या गुंतवणुकीपासून जास्तीत जास्त लाभ मिळतो व कमीत कमी जोखीम संभवते, ती गुंतवणूक कार्यक्षम मानली जाते.

मार्कोव्हिट्झ यांचे वित्तीय अर्थशास्त्रातील अप्रत्यक्ष परंतु महत्त्वाचे दुसरे योगदान म्हणजे त्यांनी विकसित केलेले भांडवल-मालमत्ता मूल्य निर्धारण प्रणाली. सदर प्रणालीचे सूक्ष्म वित्तीय विश्लेषण हे अर्थशास्त्र व वित्त विषयातील महत्त्वाचे संशोधनक्षेत्र मानले जाते. त्यांच्या गुंतवणूक-प्रणालीवर काही बाबतींत टीकाही केली गेली. विशेषत: विवेकी गुंतवणूकदार जोखीमेकडे पाठ फिरवितात या त्यांच्या गृहीतकाला अनेकांनी आव्हान दिले. वित्तीय बाजारपेठांत जेव्हा सतत चढउतार संभवतात, तेव्हा गुंतवणूकदार एकतर जोखीम पत्करतात किंवा जोखमीकडे दुर्लक्ष करणेच पसंत करतात. ही वस्तुस्थिती त्याने लक्षात घेतली नाही. मार्कोव्हिट्झ यांचे संशोधन कार्यक्षम बाजारपेठासंबंधीच्या गृहीतकांशी सुसंगत नसल्याची टीकाही केली जाते; तथापि त्यांनी विकसित केलेल्या गणिती स्पेर्समॅट्रिक्स व संगणक सिमस्क्रिप्ट आज्ञावली या प्रणाली गुंतवणूक धोरणासंबंधी महत्त्वाच्या मानल्या जातात.

मार्कोव्हिट्झ यांचे लेखक व सहलेखक म्हणून महत्त्वाचे ग्रंथ पुढीलप्रमाणे : पोर्टफोलिओ सिलेक्शन-इफिशिएंट डायव्हर्सिफिकेशन ऑफ इन्व्हेस्टमेंट्स (१९५९), ए सिम्यूलेशन प्रोग्रॅमिंग लँग्वेज (१९६३), पोर्टफोलिओ थिअरी, २५ इअर्स आफ्टर : एसेज इन हॉनर ऑफ हॅरी मार्कोव्हिट्झ (१९७९), मीन-व्हेरिअन्स ॲनॅलिसिस इन पोर्टफोलिओ चॉईस ॲण्ड कॅपिटल मार्केट्स (१९८७), दि थिअरी ॲण्ड प्रॅक्टिस ऑफ इन्व्हेसमेंट मॅनेजमेंट (२००३ – सहलेखक), इक्विटी व्हॅल्यूएशन ॲण्डपोर्टफोलिओ मॅनेजमेंट (२०१३ – सहलेखक), रिस्क-रिटर्न ॲनॅलिसिस (२०१६), ए प्रॅक्टिशनर्स गाईड टू असेट अलोकेशन (२०१७ – सहलेखक). तसेच त्यांचे विविध नियतकालिकांमध्ये अनेक शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत.

मार्कोव्हिट्झ यांना नोबेल पुरस्काराव्यतिरिक्त त्यांच्या संशोधनकार्याबद्दल पुढील पुरस्कार लाभले : जॉन व्हॉन न्यूमन थिअरी प्राइझ (१९८९), सी. एम. ई. ग्रप्स फ्रेड आर्टीटी इनोव्हेशन अवॉर्ड (२००९).

समीक्षक – संतोष दास्ताने

प्रतिक्रिया व्यक्त करा