कदम, संभाजी सोमाजी : (५ नोव्हेंबर १९३२–१५ मे १९९८). महाराष्ट्रातील प्रतिभावंत व्यक्तिचित्रकार, आदर्श शिक्षक, कवी, कलासमीक्षक, सौंदर्यमीमांसक व संगीताचे अभ्यासक. त्यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड (जामसंडे) येथे झाला.

त्यांच्या आईचे नाव रुक्मिणी. ते लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे अल्पवयातच त्यांच्यावर कौटुंबिक जबाबदारी पडली. शालेय शिक्षण देवगड येथे पूर्ण झाल्यावर १९५२ मध्ये त्यांनी मुंबईतील जे. जे. स्कूल ऑफ आर्ट या संस्थेत कलाशिक्षणासाठी प्रवेश घेतला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांची कलासाधना सुरू झाली. त्यांच्यातील विलक्षण कलागुणांमुळे विद्यार्थिदशेत असतानाच त्यांना ‘डॉली करसेटजी’ हे पारितोषिक प्राप्त झाले. जी. डी. आर्ट ही पदविका प्राप्त झाल्यावर त्याच संस्थेत म्हणजेच जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये कलाशिक्षक म्हणून त्यांची नोकरी सुरू झाली (१९५७). १९७३ मध्ये प्राध्यापक म्हणून, तर १९७६ मध्ये अधिष्ठाता या पदावर त्यांनी काम केले. १९७७ मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. त्यानंतर १९८० मध्ये एस. एल. रहेजा या कला शाळेत अभ्यागत प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. १९८२ मध्ये ज्योत्स्ना जोशी यांच्याशी त्यांचा विवाह झाला.

डॉ. एम. डी. देशमुख यांनी संभाजी कदम यांना क्षयरोगासारख्या दुर्धर आजारातून वाचवले.
डॉक्टरांच्या हातातील पाइपमधून निघालेल्या धुराने स्टेथोस्कोपचा आकार घेतल्याचे चित्र, १९६०.

कलाशिक्षक म्हणून जरी कदम यांनी कार्य केले असले, तरी विद्यार्थ्यांबरोबरच आपला अभ्यास त्यांनी निरंतर ठेवला. त्यामुळेच व्यक्तिचित्रणामध्ये ते स्वतःची खास शैली निर्माण करू शकले. व्यक्तिचित्र म्हणजे त्या व्यक्तीच्या अंतरंगाला अधोरेखित करणारे चित्रण होय, ही व्याख्या त्यांनी रुजवली. व्यक्तीच्या नाक, डोळे या अवयवांचे रेखांकन न करता जोरकस रंगलेपनाने ते चित्रे काढत. व्यक्तीचे हुबेहूब चित्रण न करता तिच्या अंतरंगासह, व्यक्तिमत्त्वाचा आशयही त्यातून ते व्यक्त करीत व  जाड रंगलेपनाची शैली वापरून चित्राला हवा तसा परिणाम साधत असत. त्यांच्या स्त्री-व्यक्तिचित्रांतून उत्कट शैलीचा आविष्कार प्रत्ययास येतो. शंकर पळशीकर, डॉ. एम. डी. देशमुख, कवी मंगेश पाडगावकर अशा अनेक व्यक्तिचित्रांमध्ये त्यांच्या शैलीचे वेगळेपण जाणवते.

सुरुवातीस आपल्या चित्रनिर्मितीतून फक्त आनंद, समाधान मिळवायचा एवढाच त्यांचा उद्देश होता. त्यामुळे त्यांनी स्वतःला व्यावसायिकतेपासून अलिप्त ठेवले व चित्रप्रदर्शने भरविली नाहीत. नंतरच्या काळात गॅलरी ओॲसिस, मुंबई (१९६९), चामराजेंद्र ॲकॅडेमी ऑफ व्हिज्युअल आर्ट्स, म्हैसूर (१९८५), चेतना आर्ट गॅलरी, मुंबई (१९८८), जहांगीर आर्ट गॅलरी, मुंबई (१९९७) येथे त्यांनी प्रदर्शने भरवली. कदम यांनी मुंबई, कोल्हापूर, नागपूर, जयपूर, पुणे, म्हैसूर येथील विविध कलासंस्थांमध्ये कलेची प्रात्यक्षिके सादर केली. त्यांचे प्रात्यक्षिक बघणे ही विद्यार्थ्यांना पर्वणीच असे. १९९७ मध्ये दिल्लीच्या आयफॅक्स (IFAX) या कलासंस्थेने ‘व्हेटरन आर्टिस्ट’ हा पुरस्कार देऊन त्यांना गौरविले होते.

मोरीन डॅनिअल, कॅनव्हासवरील तैलरंग, १९७४.

चित्रकारितेबरोबर कवी, वादक, साहित्यिक आणि संगीत-समीक्षक म्हणूनही त्यांचा लौकिक होता. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट या संस्थेच्या रूपभेद या विशेषांकासाठी ते लेखन करत. १९६५ पासून काही काळ त्यांनी मराठी विश्वकोशासाठी लेखन व कलासंपादनाचे काम केले.  जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे माजी अधिष्ठाता प्रल्हाद अनंत धोंड यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट या संस्थेविषयी सांगितलेल्या आठवणींचे केलेले लेखन हे कदम यांचे उल्लेखनीय कार्य. रापण या नावाने हे लेखन प्रसिद्ध आहे. मौज या मराठी नियतकालिकातून ‘विरूपाक्ष’ या टोपणनावाने ते कलासमीक्षा लिहीत. पुढे १९६१ मध्ये सत्यकथा या नियतकालिकातून स्वतःच्या नावाने समीक्षालेखन करण्यास त्यांनी सुरुवात केली. २००२ मध्ये पळसबन हा काव्यसंग्रह, तसेच चिं. त्र्यं. खानोलकरलिखित आरसा बोलतो हे एकपात्री नाटक त्यांनी दिग्दर्शित केले. यात अमोल पालेकर यांची मुख्य भूमिका होती. पळसबनमधील त्यांच्या कविता खूप आत्मकेंद्रित आहेत. ते एकल हार्मोनियमवादनाचे प्रयोग सादर करीत असत. सौंदर्यशास्त्र या विषयाचाही त्यांचा विशेष अभ्यास होता. संगीतातील सौंदर्यशास्त्र या विषयावर त्यांनी लेखन केले आहे.

दादा जोशी, कॅनव्हासवरील तैलरंग, १९८७.

मुंबई येथे हृदयविकाराने त्यांचे अकाली निधन झाले. मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, गोवा, नाशिक, खैरागड, म्हैसूर, उदयपूर येथील कलासंस्थांमध्ये त्यांची व्यक्तिचित्रे संग्रहित आहेत. कदम यांच्या पत्नी ज्योत्स्ना आणि मुलगा शार्दूल यांनी कदम यांच्या चित्रकलेची परंपरा जपली आहे.

 

 

संदर्भ :

  • बहुळकर, सुहास; घारे, दीपक, संपा. दृश्यकला खंड, हिंदुस्थान प्रकाशन, मुंबई, २०१३.
  • http://www.kadamsart.in/prof-sambhaji-kadam

समीक्षक – नितीन हडप

प्रतिक्रिया व्यक्त करा