विद्यार्थ्यांना आपल्या अवतीभोवती असलेल्या मानवनिर्मित व जैविक घटकांचे सरंक्षण आणि पालन-पोषण करण्याचे ज्ञान देवून त्यांच्यात पर्यावरणाबाबत सकारात्मक कौशल्य निर्माण करणारे शास्त्र म्हणजे पर्यावरण शिक्षण होय. भूतलावर मानव हा सर्वांत बुद्धीवान  प्राणी आहे. मानवाने स्वत:चे जीवन सुखी बनविण्यासाठी विज्ञान व तंत्रविज्ञानाचा वापर करून सुखसोयी प्राप्त केल्या आहेत. परिणामत: विकसीत व विकसनशील देशात प्रकल्पाची उभारणी करून अनेक जीवघेण्या समस्या उभ्या केल्या आहेत. उदा., आम्ल पर्जन्य, सागरी वादळे, त्सुनामी, हरीतगृहे परिणाम प्रदूषण, जैव विविधतेचा ऱ्हास, जल-वायू-ध्वनी प्रदूषण इत्यादी. पर्यावरण व मानव यांचे नाते अतूट आहे. मानव आपल्या हव्यासापोटी पर्यावरणाच्या विरोधात जात यशाची उतूंग शिखरे गाठली; परंतु त्यामुळे निसर्गावर फार मोठा विपरीत परिणाम घडल्याचे अनेक उदाहरणे आहेत. परिणामत: पर्यावरण संरक्षणविषयक जाणिव-जागृतीबाबत अत्यंतीक आवश्यकता निर्माण झाली. या सर्वांचा सखोल विचार करूनच सर्वोच्च न्यायालयाने विद्यापीठ अनुदान आयोगास पर्यावरण शिक्षण हा विषय सर्व विद्याशाखांमध्ये सक्तीने समाविष्ट करण्याचे निर्देश दिले. त्याअनुषंगाने हा विषय उत्तीर्ण झाल्याशिवाय कोणतीही पदवी देवू नये, असे सर्व विद्यापीठांना आदेशीत केले.

पर्यावरण शिक्षणावर अनेक तज्ज्ञांनी व्याख्या केल्या आहेत. आर. सी. शर्मा यांच्या मते, “विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे ज्ञान देवून त्यांच्या अंगी पर्यावरण संवर्धणाविषयी सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करण्याची प्रक्रिया म्हणजे पर्यावरण शिक्षण होय.”

डॉ. भांडारकर यांच्या मते, “मनुष्य आणि जैव-भौतिक-पर्यावरण यांच्यातील परस्परसंबंधाचे सुयोग्य आकलन करून पर्यावरणाच्या दृष्टीने हितकारक असे निर्णय घेण्याची व पर्यावरणसंगत कृती करण्यासाठी अभिक्षमता निर्माण करण्याची शैक्षणिक प्रक्रिया म्हणजे पर्यावरण शिक्षण होय.”

पर्यावरण ही संकल्पना स्थलसापेक्ष आणि जीवसापेक्ष आहे. पर्यावरणात जैविक घटक (बायोटिक फॅक्टर) आणि अजैविक घटक (अबायोटिक फॅक्टर) या दोन्हीचा समावेश होतो. जैविक घटकांत वनस्पती, मानव, मानवेत्तर प्राणी व सुक्ष्मजीव इत्यादी, तर अजैविक घटकात हवा, पाणी, जमीन इत्यादी मोडतात. यांपैकी काही घटक निसर्गनिर्मित असू शकतात. या सर्व घटकांची परस्पर क्रिया सातत्याने सुरू असणे यातून पर्यावरण निर्मिती होते. पर्यावरणाच्या सद्यस्थितीतील ज्वलंत समस्यांची जाणीव शास्त्रज्ञांसह सर्वांनाच आहे. यामध्ये जागतिक तपमानवाढ, ओझोन कमी होणे, क्षारयुक्त पाऊस, प्लास्टिकचा अंत्यातिक वापर, घनकचरा निर्मूलन, हवा, जल व ध्वनी प्रदूषण, महापूर, पिण्याचा पाण्याचा अंत्यातिक वापर, उर्जेचा पर्याप्त वापर इत्यादींचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे या परिस्थितीत पर्यावरण संतुलित ठेवण्यासाठी आज पर्यावरण शिक्षणाची अत्यावश्यक गरज आहे.  पर्यावणासंबंधी वैज्ञानिक घटनाबाबतीच अनभिज्ञता, पर्यावरणावर आणिबाणीची मात्रा कमी करणे, जागतिक पातळीवरील प्रदूषणावर नियंत्रण राखणे या संदर्भात सामान्य माणूस हा हलगर्जी झाला आहे. आजच्या या वैज्ञानिक व तंत्रयुगात सद्यपरिस्थितीवर नियंत्रण घालून पर्यावरणाचा समतोल राखण्यामध्ये पर्यावरण शिक्षणाची व त्यातील अंतर्भूत असलेल्या अभ्यास पूरक उपक्रमांची महत्त्वाची भूमिका आहे. शिक्षणाबरोबरच या संदर्भात परिस्थितीजन्य समस्यांचे गांभीर्य लक्षात घेवून ही दुरावस्था समूळ नष्ट करण्यासाठी शासनाने त्यासंदर्भात नियम केले आहेत; परंतु त्याची कठोर अंमलबजावणी करून निर्णय घेणे, तसेच राजकीय पातळीवरही याबाबत विचारविनिमय होणे गरजेचे आहे. हे कार्य जगातील सर्वोच्च आहे; मात्र त्याची जाण होणे व त्या समस्यांचे निर्मूलन करण्यासाठी त्यांची अभिव्यक्ती होणे हे केवळ पर्यावरण शिक्षणानेच शक्यप्राय होईल.

प्रदूषणाचे प्रकार

१) हवा प्रदूषण ४) सागरी प्रदूषण ७) भूप्रदूषण
२) जल प्रदूषण ५) घनकचरा ८) औष्णिक प्रदूषण
३) ध्वनी प्रदूषण ६) ओझोन थराचा नाश ९) हरितगृहांचा परिणाम

 

पर्यावर्णीय स्त्रोतांचे व्यवस्थापन

.क्र. स्त्रोत वैयक्तिक पातळीवरील व्यवस्थापन सामुहिक/ सामाजिक पातळीवरील व्यवस्थापन
१. हवा १) कचरा पालापाचोळा जाळण्याचे टाळावे.

२) धुम्रपान टाळावे.

३) वाहनाचा कमीत कमी वापर करणे.

१) औद्योगिक स्त्रोतातून प्रदूषके सोडू नयेत.

३) सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेत सुधारणा करणे.

२. पाणी १) घरातील साबण, स्वच्छक मिश्रीत पाण्याची स्वच्छता गृहाच्या सफाईसाठी वापर करणे.

२) सांडपाण्याच्या स्वरूपानुसार पुनर्रचनिकरण.

३) शिळे पाणी ओतून अपव्यवय टाळणे.

१) पाण्याचे पुनर्रचक्रीकरण.

२) अशुद्ध पाणी जलसाठ्यात न सोडणे.

३) शेतीत ठिबक सिंचनाचा वापर.

 

३. जमीन १) जमिनीवर अविघटनशील पदार्थ उदा., प्लास्टिक घनकचरा न टाकणे.

२) वृक्ष तोड थांबविणे/टाळणे.

१) शेतात सेंद्रिय खताचा वापर.

२) आलटून पालटून पीक घेणे.

३) राख न जाळणे.

४) वृक्षतोड, अतिरिक्त पाणी देणे थांबविणे.

५) बिगर शेतीचे प्रमाण आटोक्यात ठेवणे.

४. खनिजे दुर्मिळ खनिजांचा वैयक्तिक वापरासाठी हव्यास कमी करणे. १) कारखान्यात उधळपट्टी टाळणे

२) पर्याय शोधणे.

५. लाकूड घरगुती फर्निचरसाठी वापर टाळणे. मोठ्या प्रमाणावर इमारतीसाठी वापर टाळणे.
६. उर्जा १) अतिवापर/अनावश्यक वापर थांबविणे व पर्याप्त वापर करणे.

२) अपारंपारीक स्रोतांचा वापर करणे.

 

१)  सार्वजनिक उधळपट्टी टाळणे.

२) सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेत सुधारणा करणे.

३) अपारंपरिक स्रोतांचा वापर करणे.

 

 

संदर्भ :

  • कुलकर्णी, डी. आर., पर्यावरण शिक्षण, नागपूर, २००७.
  • घारपुरे, विठ्ठल, पर्यावरण शिक्षण, नागपूर, २००६.
  • पारसनिस, हेमलता, पर्यावरण शिक्षण, पुणे, २००८.
  • भांडारकर, के. एम., पर्यावरण शिक्षण, पुणे, २००६.
  • Koul, Lokesh, Methodology of Educational Research, New Delhi,1984.
  • Best, J. W.; Khan, J. V., Research in Education New Delhi.
  • Satija, B. K., Trends in Education, New Delhi, 1996.

समीक्षक : प्रकाश रामभाऊ गायकवाड