(व्हायरस). एक सूक्ष्म आणि साधी रचना असलेला सांसर्गिक रोगकारक. विषाणू वनस्पती नाहीत, प्राणी किंवा सूक्ष्मजीव नाहीत. त्यांना सजीव मानले जात नाही, कारण ते प्रजनन करत नाहीत. त्यांच्या चयापचय क्रिया फक्त आश्रयी पेशीमध्ये घडतात. तसेच ते प्राणी, वनस्पती आणि सूक्ष्मजीव यांच्या पेशींमध्येच गुणित होतात.

जेव्हा विषाणूंची बाधा पेशीला झालेली नसते किंवा विषाणू एखाद्या पेशीवर हल्ला करण्याच्या तयारीत असतात, तेव्हा ते स्वतंत्र कणांच्या रूपात असतात. अशा कणांना आदिविषाणू किंवा विरेणू (व्हायरिऑन) म्हणतात. प्रत्येक विषाणूत पुढील घटक असतात : (१) डीएनए (डीऑक्सिरिबोन्यूक्लिइक आम्ल) किंवा आरएनए (रिबोन्यूक्लिइक आम्ल) ही न्यूक्लिइक आम्ले; न्यूक्लिइक आम्लात जनुकीय माहिती असते आणि ही माहिती प्रत्येक विषाणूसाठी वेगळी असते. (२) न्यूक्लिइक आम्लाभोवती त्याचे संरक्षण करणारे प्रथिन-आवरण म्हणजेच विषाणू-छत्रक असते. विषाणू-छत्रक विषाणूतील न्यूक्लिइक आम्लांचा विकरांपासून बचाव करते, आश्रयी पेशींवरील ग्राही शोधून तेथे विषाणू चिकटण्यासाठी जागा निवडते आणि आश्रयी पेशीत संक्रामिक न्यूक्लिइक आम्ल सोडते. (३) काही वेळा विषाणू-छत्रकाभोवती असलेले मेदावरण. या तीन बाबींनुसार विषाणूंचे वर्गीकरण केले जाते. विषाणूंचा स्वतंत्र संघ असून त्यांच्या विरिकोटा संघात १४ गण, १४३ कुले, सु. ८४६ प्रजाती आणि सु. ४,९५७ जाती आहेत.

विषाणू हे परजीवीचे अगदी चपखल उदाहरण आहे, कारण सर्व जीवनक्रियांसाठी ते आश्रयी पेशींवर अवलंबून असतात. ते प्रथिने तयार करू शकत नाहीत, कारण त्यांच्यात प्रथिननिर्मितीसाठी लागणारी रिबोसोम ही अंगके नसतात. विषाणू एटीपीच्या स्वरूपात ऊर्जा निर्माण करू शकत नाहीत किंवा साठवू शकत नाहीत. ते ऊर्जा आश्रयी पेशीपासून मिळवतात. तसेच आश्रयी पेशींची न्यूक्लिओटाइडे आणि ॲमिनो आम्ले यांचा वापर करून स्वत:ची न्यूक्लिइक आम्ले व प्रथिने तयार करतात. काही विषाणू आश्रयी पेशींतील मेद व शर्करा वापरून स्वत:ची पटले व ग्लायकोप्रथिने तयार करतात.

विषाणूंचा व्यास २० नॅनोमीटर (नॅमी.) ते २५०–४०० नॅमी. असतो; सर्वांत मोठ्या विषाणूचा व्यास ५०० नॅमी. असून लांबी ७००–१,००० नॅमी. आढळली आहे. फक्त मोठे व गुंतागुंतीचे विषाणू इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीखाली, उच्च विभेदनक्षमतेला दिसू शकतात. कोणत्याही विषाणूचा संक्रामक भाग, एकतर डीएनए किंवा आरएनए असतो, परंतु दोन्ही कधीही नसतात. अनेक विषाणूंचे विषाणू-छत्रकापासून सुटे झालेले न्यूक्लिइक आम्लदेखील संसर्ग करू शकते.

विषाणूंचे तीन गट केले जातात; वनस्पती, प्राणी किंवा सूक्ष्मजीव यांना संक्रामण करणारे विषाणू. सर्व वनस्पती-विषाणू हे कीटक व वनस्पती यांवर जगणाऱ्या रोगवाहकांद्वारे संक्रामित होतात. प्राणी-विषाणू हे आदिजीवांपासून मनुष्यापर्यंत कोणावरही जगतात. अनेक प्राणी-विषाणू अपृष्ठवंशी किंवा पृष्ठवंशी प्राणी यांना, तर काही विषाणू दोघांना बाधित करतात. मनुष्य व प्राणी यांच्यात आजार निर्माण करणारे काही विषाणू संधिपाद प्राण्यांमध्येही वाढतात. काही विषाणू मासे, सरपटणारे प्राणी अशा शीत रक्तांच्या प्राण्यांमध्ये, तर काही सस्तन प्राण्यांसारख्या उष्ण रक्ताच्या प्राण्यांमध्ये वाढतात.

आकार आणि आकारमान : विषाणूंतील न्यूक्लिइक आम्ले आणि प्रथिने यांचे प्रमाण व त्यांची रचना यांवरून विषाणूंचा आकार व आकारमान ठरते. त्यांचे दोन आकार दिसून येतात: दंडाकार किंवा तंतुमय आणि बहुकोनी-वजा-गोल. वनस्पती-विषाणू लहान, आकाराने तंतुमय किंवा गोल असतात. प्राणी-विषाणूंच्या आकारात व आकारमानात विविधता आढळते; लहान विषाणू २०-३० नॅमी. लांब, तर मोठे २५०-४०० नॅमी. लांब असतात. काही प्राणी-विषाणू दंडाकार असून त्यांभोवती आवरण असते. जीवाणुभक्षी विषाणू दंडाकार आणि बहुकोनी असे दोन्ही आकारांत आढळतात.

न्यूक्लिइक आम्ले : प्रत्येक विषाणूच्या न्यूक्लिइक आम्लात प्रथिनांच्या संश्लेषणासंबंधीची जनुकीय माहिती असते. ही जनुकीय माहिती डीएनए किंवा आरएनए रेणूंच्या स्वरूपात असून त्यांचे एकेरी किंवा दुहेरी पट्ट असतात. ज्या विषाणूंमध्ये डीएनए रेणू एकेरी पट्टयुक्त असतात, ते लहान असतात; त्यांतील माहिती मर्यादित असते. सर्व डीएनए विषाणूंमध्ये एकच मोठा रेणू असतो, तर आरएनए विषाणूंमध्ये जनुकांचे खंड असतात.

विषाणूंचे संक्रामण : पर्यावरणात विषाणू सर्वत्र व सदाकाळ असून ते आश्रयी पेशीच्या शोधात असतात. विषाणूंचे पुनरुत्पादन फक्त आश्रयी पेशींमध्ये होते. त्यांद्वारे मोठ्या संख्येने निर्माण होणारे विषाणू जनुकीय दृष्ट्या व संरचनेच्या दृष्टीने आदिविषाणूसारखेच असतात. मनुष्याच्या शरीरात ते नाक, तोंड किंवा त्वचेच्या जखमेतून आत शिरतात. शरीरात प्रवेश केला की संक्रामणासाठी ते आश्रयी पेशी हेरतात. उदा., सर्दी, फ्लू यांचे विषाणू श्वसनमार्गाच्या किंवा पचनसंस्थेच्या पेशींवर हल्ला करतात; एड्‌सचे विषाणू प्रतिक्षम संस्थेच्या टी-पेशींवर हल्ला करतात. आश्रयी पेशी कोणतीही असली, तरी सर्व विषाणूंचे संक्रामण सारख्याच प्रकारे होते; (१) आदिविषाणू आश्रयी पेशीला चिकटतो, (२) आदिविषाणू आपले जनुकीय द्रव्य आश्रयी पेशीत सोडतो, (३) विषाणूचे जनुकीय द्रव्य आश्रयी पेशीच्या विकरांना कामाला लावते, (४) विकरे नवीन आदिविषाणूंकरिता नवीन पदार्थ (न्यूक्लिइक आम्ले व प्रथिने) तयार करतात, (५) नवीन पदार्थांची जुळणी होऊन नवीन आदिविषाणू तयार होतात आणि (६) आश्रयी पेशींपासून हे नवीन आदिविषाणू मुक्त होतात.

विषाणूंच्या संक्रामणचक्रातील आदिविषाणू प्रथम आश्रयी पेशीला चिकटतो. त्यानंतर संपूर्ण आदिविषाणू एकतर बाहेरच्या पटलातून थेट पेशीच्या आत म्हणजे पेशीद्रव्यात घुसतो किंवा त्याचे विषाणू-छत्रक आश्रयी पेशीच्या पृष्ठभागावर सोडून जनुकीय द्रव्य पेशीमध्ये अंत:क्षेपित करतो. विषाणू संपूर्णपणे आत घुसला, तर त्याचे विषाणू-छत्रक (आणि आवरण असले तर) खुले होऊन जनुकीय द्रव्य मुक्त होते. कोणत्याही परिस्थितीत जोपर्यंत विषाणू-छत्रकापासून किंवा आवरणापासून जनुकीय द्रव्य मोकळे होत नाही, तोपर्यंत प्रथिननिर्मिती होत नाही.

जीवाणूंमध्ये विषाणूंचे संक्रामण पद्धतशीर घडून येते; प्रथम, विषाणूची शेपटी (प्रथिनाचा टोकदार भाग) जीवाणूच्या पृष्ठभागाला चिकटल्यावर शेपटी आकुंचित होते. ही शेपटी लगेच पेशीभित्तिका आणि त्याखालच्या पटलातून पेशीत शिरून जनुकीय द्रव्य सोडते. काही विषाणू जीवाणूंच्या पेशीपटलात झलरिकांवाटे न्यूक्लिइक आम्ल आत सोडतात. थोडक्यात सर्व जीवाणूंच्या कठीण पेशीभित्तिकेतून विषाणू त्यांचे जनुकीय द्रव्य अंत:क्षेपित करतात.

वनस्पतींची पेशीभित्तिका कठीण असल्याने तिचा भेद विषाणूंना करता येत नाही. म्हणून विषाणू त्यांचे जनुकीय द्रव्य वनस्पतींमध्ये संक्रामित करण्यासाठी वनस्पतींवर जगणाऱ्या कीटकांच्या सोंडेचा वापर करतात. प्रयोगशाळेत विषाणूंना वनस्पतींच्या पेशींमध्ये घुसता यावे म्हणून पेशीभित्तिका पॉलिश पेपरने घासतात.

प्राणी पेशींमध्ये पेशीभित्तिकांऐवजी मेदप्रथिनांचे लवचिक आवरण असल्याने त्यांच्यात विषाणू वेगवेगळ्या प्रकारे पेशीमध्ये शिरतात. अनेक विषाणू प्राण्यांच्या पेशीत ‘भक्षणपेशी’ प्रक्रियेने आत शिरतात. यात पेशीवर चिकटलेल्या विषाणूला प्राणी पेशी हळूहळू वेढते व गिळून टाकते; ही क्रिया पेशीपटलाच्या अशा भागात घडते, जेथे क्लॅथ्रीन या प्रथिनांचा लेप असतो. विषाणू प्राणी पेशीत शिरताच, त्याभोवती क्लॅथ्रीनचा लेप तयार होऊन पुटिका बनते. नंतर ही पुटिका, अंत:काय (पेशीद्रव्यातील पटलयुक्त पुटिका) आणि लयकारिका एकत्र येतात; लयकारिकेत विकरे असतात. आम्लयुक्त वातावरणात, अंत:काय आणि विषाणू यांची पटले संमेलित होतात आणि विषाणूंचे जनुकीय द्रव्य पेशीद्रव्यात मिसळते. ज्या विषाणूंवर आवरण नसते, त्यांच्या विषाणू-छत्रकाचा ऱ्हास होऊन जनुकीय द्रव्य पेशीद्रव्यात मिसळते. यानंतर विषाणूंच्या जनुकांचे प्रतिकरण होते म्हणजे जीनोम गुणित होतात. या वेळी ज्या विषाणूंमध्ये डीएनए रेणू असतात, ते आश्रयी पेशीतील प्रथिने व विकरे यांच्यापासून अतिरिक्त डीएनए रेणू तयार करतात, ज्यांचे पुढे रूपांतर संदेशवाही-आरएनए मध्ये होते आणि त्यांच्या प्रथिननिर्मितीसाठी वापरले जातात. ज्या विषाणूंमध्ये आरएनए रेणू असतात, त्यांचा वापर संदेशवाही-आरएनए म्हणून केला जातो आणि ते थेट प्रथिननिर्मिती करतात. थोडक्यात, या टप्प्यावर विषाणूच्या सुचनेनुसार आश्रयी पेशीद्वारे नवीन विषाणूंचे घटक तयार केले जातात. पुढच्या टप्प्यावर, नव्याने तयार झालेले विषाणूंचे घटक आणि प्रथिने यांची जोडणी होऊन नवीन आदिविषाणू निर्माण होतात.

एकदा नवीन विषाणू बनले की ते आश्रयी पेशीतून दोन पद्धतीने बाहेर पडतात; एकतर ते आश्रयी पेशी फोडून तिला मारून टाकतात किंवा मुकुलन घडते तसे, ते पेशीपटलापासून बारिक पुळीच्या रूपात बनून पेशीपटलासकट नवीन विषाणू म्हणून वेगळे होतात. दुसऱ्या पद्धतीत, आश्रयी पेशी जीवंत राहते. नवीन आदिविषाणू आश्रयी पेशीतून बाहेर पडले की, नवीन आश्रयी पेशीवर हल्ला करतात. एक विषाणू हजारो विषाणू निर्माण करीत असल्याने शरीरात विषाणूंचे संक्रामण वेगाने होते.

आपल्या शरीरातील प्रतिक्षम संस्था सर्व प्रकारच्या संक्रामणाशी लढते आणि प्रतिकार करताना तापकारी रसायनांची निर्मिती करते. त्यामुळे आपल्या शरीराचे तापमान वाढते. याला सामान्यपणे ‘ताप येणे’ म्हणतात. ताप आल्यामुळे शरीराला संक्रामणाशी लढायला मदत होते, कारण त्यामुळे विषाणूंची पैदास मंदावते. आपल्या शरीरातील सर्व रासायनिक अभिक्रियांचे इष्टतम तापमान ९८.६ फॅ. (३७ से.) असते. जर शरीराचे तापमान यापेक्षा वाढले, तर सर्व क्रिया मंदावतात. जोपर्यंत शरीरातील सर्व विषाणू नष्ट होत नाहीत तोपर्यंत हा परिणाम टिकून राहतो. मात्र रुग्ण व्यक्ती शिंकली किंवा खोकली, तर हजारो नवीन आदिविषाणू हवेत मिसळतात आणि ते नवीन आश्रयी पेशी शोधू लागतात.

विषाणूंच्या आजारांवरील उपचार : विषाणूंमुळे मनुष्याला सर्दी, एन्फ्लूएन्झा, कांजिण्या, रेबीज, एड्‌स, इबोला, बर्ड फ्ल्यू इ. आजार होतात. विषाणूंचे संक्रामण एखाद्या भागापुरते किंवा पूर्ण शरीराला होते. विषाणूंचा प्रवेश होतो त्या भागात संक्रामण तीव्र होते. उदा., ऱ्हायनोविषाणूंचे संक्रामण नाकातील श्लेष्म पटलाला झाल्याने सर्दी होते. फ्ल्यू हा आजार विषाणूंचे संक्रामण छातीच्या व नाकाच्या भागात झाल्याने होतो, ज्यामुळे मृत्यू ओढावू शकतो. रोटाव्हायरस आणि करोनाव्हायरस यांचे संक्रामण आतड्याला झाल्याने हगवण लागते.

मनुष्यामध्ये अनेक विषाणूंचे संक्रामण श्वसनमार्गातून होते. उदा., कांजिण्या, गालगुंड आणि गोवर या आजारांचे विषाणू शिंकेतून, खोकल्यातून शरीरात घुसून प्रथम नाक, घसा इ. बाधित करतात आणि नंतर रक्तप्रवाहातून शरीरभर पसरतात. या सर्व विषाणूंमुळे मस्तिष्कावरण दाह उद्भवतो. कांजिण्याच्या व्हॅरिसेला विषाणूंमुळे क्वचित न्युमोनियादेखील उद्भवतो. पचनमार्गात आढळणाऱ्या एंटिरो लिओव्हायरस, इकोव्हायरस या विषाणूंचा प्रसार विष्टामिश्रीत अन्न किंवा पाणी पोटात गेल्याने होते. हे विषाणू अन्ननलिकेत गुणित होऊन लसीका ग्रंथीवाटे रक्तात मिसळतात. अनेक विषाणुजन्य आजारांच्या साथी कीटकांच्या (किंवा इतर संधिपादांच्या) दंशामुळे फैलावतात. हे विषाणू डासांच्या सोंडेत राहतात. त्वचेवाटे किंवा लसीका ग्रंथीवाटे त्यांचे संक्रामण होऊन ते रक्तात मिसळतात. त्यामुळे स्नायू, यकृत, हृदय, वृक्क इ. बाधित होतात. हे विषाणू ज्या कीटकांना बाधित करतात, ते कीटक पक्ष्यांमध्ये, सस्तन प्राण्यांमध्ये रोग पसरवितात. डासांच्या ठरावीक जाती आश्रयी पक्षी किंवा सस्तन प्राणी यांचे रक्त शोषतात. असे डास नंतर मनुष्याला चावल्यास विषाणूंचा प्रसार होतो. पितज्वर आणि हाडमोड्या (डेंगी) हे आजार फ्लॅविव्हिरिडी कुलातील विषाणूंमुळे होतात.

पिकार्नोव्हायरस, एन्फ्लूएन्झा व्हायरस, हर्पिसव्हायरस यांच्या संक्रामणामुळे कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. परंतु त्यांमुळे निर्माण झालेली प्रतिक्षमता दीर्घकाळ टिकते. ॲडेनोव्हायरस, गोवर व नागीण इ. रोगांचे विषाणू सुरुवातीच्या संक्रामणानंतर रक्तामध्ये, ऊतींमध्ये प्रतिद्रव्ये असतानाही आश्रयींमध्ये सुप्त राहतात. एखादा अपघात किंवा संक्रामण झाल्यास, भावनिक ताण वाढल्यास, खूप वेळ सूर्यप्रकाशात राहिल्यास ते सक्रिय होतात. यकृतशोथ हा विषाणुजन्य आजार असून तो पाच वेगवेगळ्या गुणधर्मांच्या विषाणूंमुळे उद्भवतो; त्याचे विषाणूही दीर्घकाळ सुप्तावस्थेत राहतात.

प्रतिबंध : अनेक विषाणुजन्य आजार स्वच्छतेच्या सुविधा, अपशिष्टांची योग्य विल्हेवाट, स्वच्छ पाणी आणि वैयक्तिक स्वच्छता इ. उपायांनी रोखता येतात. विषाणूंमुळे उद्भवणाऱ्या रोगांच्या साथी रोखण्यासाठी लसीकरण हा एक स्वस्त आणि खात्रीशीर पर्याय आहे. विषाणूंच्या संक्रामणांमुळे होणारे पोलिओ, गोवर, गालगुंड, रुबेला यांसारख्या आजारांत घट होण्यामागे लशींचा वाटा मोलाचा आहे. देवी रोगाचे निर्मूलन लसीकरणामुळे शक्य झाले आहे. मनुष्यामध्ये विषाणूंमुळे उद्भवणाऱ्या साधारणपणे १५ आजारांवर आज लसी उपलब्ध आहेत. लशींमध्ये जिवंत-नि-दुबळे विषाणू किंवा मृत जीवाणू किंवा विषाणुमय प्रथिने (प्रतिजन) असतात. जिवंत लशींमध्ये विषाणू दुबळे केलेले असतात; त्यामुळे अशा विषाणूंच्या आजाराबद्दल शरीरात प्रतिक्षमता निर्माण होते. जिवंत लशी कमजोर प्रतिकारक्षमता असलेल्या व्यक्तीला दिल्यास धोकादायक ठरू शकते, कारण दुबळे विषाणू आजार निर्माण करू शकतात. जैवतंत्रज्ञान व जनुकीय तंत्राद्वारे आता नवीन प्रकारच्या लसी निर्माण करण्यात येत आहेत. या लशींमध्ये विषाणू-छत्रकातील प्रथिने वापरतात. यकृतशोथावरील हिपॅटायटीस-बी लस हे याचे उदाहरण आहे. ज्या रुग्णांची प्रतिकारक्षमता खूप कमी असते अशांसाठी या लशी सुरक्षित असतात, कारण त्यामुळे आजार निर्माण होत नाहीत. यलो फिवर या रोगावर तयार केलेली जिवंत लस, १७ डी ही सर्वांत सुरक्षित लस मानली जाते.

प्रतिविषाणू : औषधांमध्ये न्यूक्लिओसाइडांसारख्या दिसणाऱ्या संयुगाचा वापर करतात. या संयुगांमध्ये –-हायड्रॉक्सी – OH) गट नसतात, जे एरव्ही फॉस्फरस अणूंबरोबर जोडले जाऊन ‘डीएनए’ रेणूचा कणा तयार करतात. प्रतिकरण होताना विषाणू अशा संयुगांचा समावेश त्यांच्या जीनोममध्ये करतात. नव्याने बनलेला डीएनए रेणू निष्क्रिय असल्याने विषाणू-चक्र थांबते. अशा पद्धतीने तयार केलेली ॲसीक्लोव्हीर, लॅमीव्युडीन ही औषधे अनुक्रमे नागीण व एड्‌स या रोगांवर वापरतात. एड्‌सचा कारक एचआयव्ही विषाणू सक्रिय होण्यासाठी एचआयव्ही-१ प्रोटीएझ विकराची गरज असते. हे विकर निकामी करण्यासाठी ‘विषाणू संदमी’ औषधे वापरतात. हिपॅटायटीस-सी हा यकृतशोथ आरएनए विषाणूंमुळे होतो. यावर उपचारासाठी रिबाव्हिरीन या औषधांबरोबर इंटरफेरॉन देतात.

व्हायरॉइडे आणि प्रिऑने : व्हायरॉइडे ही विषाणूंसारखी रोगकारके असून त्यांच्यात फक्त रिबोन्यूक्लिइक आम्ले असतात; त्यांवर प्रथिनांचे आवरण नसते. ती वनस्पतींमध्ये रोग फैलावतात. प्रिऑन ही विषाणूंप्रमाणे प्रथिनांसारखे कण असून ती प्राण्यांच्या मेंदूत शिरतात. त्यांना निष्क्रिय करणे अवघड असल्याने त्यांच्यामुळे सस्तन प्राण्यांमध्ये कधीही बरे न होणारे मेंदूचे विकार जडतात.

विषाणूंच्या नवीन वाणांची उत्क्रांती :  प्राण्यांना बाधित करणारे विषाणू एका जातीमधून दुसऱ्या जातीमध्ये प्रवेश करतात आणि नवीन आश्रयीमध्ये नवीन, तीव्र घातक रोग निर्माण करतात. उदा., २००३ साली कोरोना व्हिरीडी कुलातील एका विषाणूने एका प्राण्यापासून म्हणजे वटवाघळातून मनुष्यात प्रवेश केला आणि मनुष्यामध्ये ‘सार्स’ हा तीव्र रोग निर्माण केला. वटवाघळापासून मनुष्यात शिरण्यासाठी सार्सच्या कोरोना विषाणूला क्षमता मिळावी याकरिता विषाणूत जनुकीय बदल होणे गरजेचे असते. हा विषाणू उदी मांजरात असताना त्याच्यात हे बदल घडले असावेत, असा संशय आहे. कारण वटवाघळातील असलेला सार्स विषाणू संसर्ग थेट मनुष्याला करू शकत नाही. असे नव्याने उद्भवलेले विषाणू मनुष्याला तीव्रपणे बाधित करतात, कारण मनुष्याच्या रोगप्रतिक्षम संस्थेशी त्यांचा कधी संबंध आलेला नसतो. तसेच मनुष्यामध्येही अशा विषाणूंरोधी प्रतिकारक्षमता तयार झालेली नसते. ज्या कोरोनाविषाणूमुळे सार्स उद्भवला, तो रोग मनुष्यामध्ये वेगाने पसरला आणि ‘साथीसारखी’ परिस्थिती निर्माण केली. प्रवासावर नियंत्रण ठेवून आणि विलगीकरणासारखे उपाय करून या विषाणूवर कमी वेळात नियंत्रण आणले गेले.

कोरोना विषाणू

कोरोना विषाणू : सन २०१९ चे वर्ष संपतासंपता कोरोनाविषाणूचा आणखी एक प्रकार ‘सार्स-कोवी-2’ चीनमध्ये उद्भवला आणि तो सर्वत्र पसरल्यामुळे जगात रोगाची साथ पसरली. या रोगाला कोविड-19 असे नाव असून या रोगाची लक्षणे अगदी सार्ससारखी होती. मुख्य म्हणजे या रोगाचा मृत्युदर खासकरून ६५ वर्षावरील नागरिकांमध्ये अधिक होता. मार्च २०२१ पर्यंत या रोगामुळे जगातील सु. २६ लाख व्यक्ती मृत्युमुखी पडले आहेत. याआधीही कोरोनाविषाणूच्या काही साथी मागील शतकात येऊन गेलेल्या आहेत. मात्र आताची साथ सर्वांत अधिक तीव्र, त्रासदायक मानली जात आहे. अशा जगद्व्यापी साथीचा अनुभव या पिढीने पहिल्यांदाच अनुभवला आहे. त्यामुळे भावी काळात अशी साथ येऊ नये, म्हणून जगातील सर्व नागरिकांना काळजी घ्यावी लागेल. सुदैवाची गोष्ट ही की जगातील अनेक वैज्ञानिकांनी एकत्र येऊन कोविड-१९ रोगावर प्रतिबंधक लस तयार केली आहे.