एका केंद्रबिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या बिंदूंच्या संचास वर्तुळ असे म्हणतात. आकृतीत बिंदू O हा केंद्रबिंदू आहे व O या केंद्रबिंदूपासून एकसमान अंतरावरील बिंदूंच्या संचामुळे तयार झालेल्या आकृतीस वर्तुळ असे म्हणतात. उदा., सायकलीचे चाक, मेरी गो राऊंड, मोटारीचे चाक, बांगडी, कडे इत्यादी वर्तुळाकृती आकाराच्या असतात.
वर्तुळाची त्रिज्या (Radius of Circle) : वर्तुळकेंद्रापासून वर्तुळावरील कोणतेही बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडास त्रिज्या असे म्हणतात. आकृतीत रेख OA ही त्रिज्या आहे. वर्तुळात असंख्य त्रिज्या काढता येतात.
वर्तुळाचा व्यास (Diameter of circle) : वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणाऱ्या व वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडास वर्तुळाचा व्यास असे म्हणतात. आकृतीत बिंदू A व बिंदू B यांना जोडणारा रेषाखंड O केंद्रबिंदूतून जातो. म्हणून रेख AB हा वर्तुळाचा व्यास आहे. एका वर्तुळात असंख्य व्यास काढता येतात.
वर्तुळाची जीवा (Chord of Circle) : वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडास वर्तुळाची जीवा असे म्हणतात. आकृतीत रेख XY, रेख ST या वर्तुळाच्या जीवा आहेत.
वर्तुळाचा परीघ (Circumference of circle) : वर्तुळाच्या गोलाकार भागास वर्तुळाचा परीघ असे म्हणतात. आकृतीत दिसणारी वर्तुळाकार कडी जर एका जागी तोडली व सरळ केली तर तिची लांबी म्हणजेच वर्तुळाचा परीघ होय.
उदाहरणार्थ – बांगडी, मांडोळीतील कडी, गाडीचे चाक, तारेची कडी इत्यादी.
वर्तुळाचा परीघ = 2πr r = त्रिज्या , π =
वर्तुळाचे क्षेत्रफळ (Area of Circle) : वर्तुळाच्या परिघाने मर्यादित केलेले व व्यापलेले एकूण क्षेत्र म्हणजे वर्तुळाचे क्षेत्रफळ होय. उदाहरणार्थ- गोलाकार टाकीचा तळ, डब्याचा तळ,वर्तुळाकार मैदान, वर्तुळाकार भाकरी पोळी इत्यादी. जर r ही वर्तुळाची त्रिज्या असेल तर,
वर्तुळाचे क्षेत्रफळ = πr2
पहा : वर्तुळ
समीक्षक : उल्हास दीक्षित