आंध्र प्रदेश राज्यातील अनंतपूर येथील एक सार्वजनिक विद्यापीठ. स्थापना १९८१. तिरूपती येथील श्री वेंकटेश्वर विद्यापीठाचे एक पदव्युत्तर शिक्षण केंद्र म्हणून १९६८ मध्ये याचे कार्य सुरू झाले. १९७६ मध्ये या पदव्युत्तर शिक्षण केंद्राला स्वायत्तता मिळाली. या प्रदेशातील लोकांची स्वतंत्र विद्यापीठाची मागणी होती. त्यानुसार १९८१ मध्ये या स्वायत्त पदव्युत्तर शिक्षण केंद्राला विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला. सुरुवातीला एककी विद्यापीठ म्हणून कार्यरत असणाऱ्या या विद्यापीठाला १९८८ मध्ये संलग्न विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला. सोळाव्या शतकातील विजयानगर साम्राज्याचा सम्राट श्री कृष्णदेवराय यांच्या नावावरून या विद्यापीठास हे नाव देण्यात आले आहे. ‘विद्ययामृतमश्नुतेʼ हे विद्यापीठाचे बोधवाक्य आहे. राज्याचे राज्यपाल हे या विद्यापीठाचे कुलपती असतात, तर कुदेरू राजागोपाल हे विद्यापीठाचे कुलगुरू आहेत.
शैक्षणिक उत्कृष्ठतेसाठी प्रयत्न करणे आणि सामाजिक परिवर्तनास प्रोत्साहन देणे हे विद्यापीठाचे लक्ष्य आहे. या विद्यापीठामुळे रायल सिमा प्रदेश आणि विशेषत: अनंतपूर जिल्ह्यातील लोकांना उच्च शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. श्री वेकटेश्वर विद्यापीठाच्या अधिकारक्षेत्रातील कुर्नूल येथील पदव्युत्तर शिक्षण केंद्र १९९३ मध्ये या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात आणण्यात आले. पुढे २००८ मध्ये रायल सिमा विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर हे केंद्र त्या विद्यापीठाला जोडण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासबरोबरच विद्यापीठाचा प्रसार व्हावा, या हेतूने विद्यापीठ कार्यरत असून त्यासाठी विद्यापीठामार्फत पुढील ध्येय ठरविण्यात आले आहे :
- राष्ट्रीय व जागतिक आव्हानांना सामोरे जाण्याकरिता विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानार्जन कौशल्य आणि योग्यता समृद्ध करणे.
- नवीन ज्ञानाची निर्मिती करण्याकरिता विद्यार्थ्यांमधील सर्जनशील प्रतिभेला प्रोत्साहीत करणे.
- उच्च शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्याकरिता अध्यापन-शिक्षण, संशोधन व विस्तार या उपक्रमांतून नवीन पद्धती स्वीकारणे.
- विद्यापीठाला जागतिक मान्यता आणि प्रसिद्धी मिळण्याकरिता विद्यापीठ विकासातील सर्व भागधारकांचा सहभाग सुनिश्चित करणे.
- विद्यापीठ अखत्यारित येणाऱ्या सर्व भागातील लोकांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्याकरिता ज्ञानार्जनाचे उपयोजनात्मक पूर्तता करणे.
- विद्यापीठीय क्षेत्रातील वैज्ञानिक चित्तवृत्तीचा प्रसार करताना मानवाधिकार, मूल्यप्रणाली आणि सांस्कृतिक वारसा कायम राखणे इत्यादी.
अनंतपूरमधील श्री वेंकटेश्वरपुरम भागात सु. ४८२ एकर क्षेत्रावर हे विद्यापीठ विस्तारलेले आहे. विद्यापीठाच्या परिसरात कला, विज्ञान, अभियांत्रिकी व तंत्रविद्या, शिक्षणशास्त्र आणि औषधनिर्माणशास्त्र अशा पाच ज्ञानशाखांची महाविद्यालये असून त्या अभ्यासक्रमांचे वेगवेगळे विभाग आहेत. विद्यापीठाच्या २८ विभागांमार्फत ३८ पदव्युत्तर अभ्यासक्रम राबविले जातात. कुर्नूल येथील ८ विभागांत ११ पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. विद्यापीठ परिसरात संगणक केंद्र, आरोग्य केंद्र, व्यायामशाळा, क्रीडागार, श्रोतगृह, वेगवेगळ्या विद्याशाखा, प्रयोगशाळा, वसतिगृहे, कर्मचारी निवासस्थाने इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत.
विद्यापीठाने विद्यार्थांचे शैक्षणिक, बौद्धिक, शारीरिक, सांस्कृतिक व्यक्तिमत्त्व विकासास प्रोत्साहन देण्याकरिता अनेक योग्य सुविधा विद्यार्थांस पुरविल्या आहेत. त्यांमध्ये विद्यापीठाच्या केंद्रीय ग्रंथालायचा मोठा वाट आहे. विद्यापीठाच्या केंद्रीय ग्रंथालयात सु. १,१४,००० ग्रंथ, १९० नियतकालिके, ११८ मासिके इत्यादींचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना विविध स्तरावरील स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करण्याकरिता ग्रंथालयात एक स्वतंत्र विभाग आहे. तसेच त्यांना स्पर्धात्मक तयारी करताना काही अडचणी येऊ नये म्हणून, ग्रंथालयात अनुसूचित जाती/जमाती पुस्तक बँक हे स्पर्धात्मक एक स्वतंत्र परीक्षा कक्षा आहे.
विद्यापीठाशी संलग्न ११२ पदवी महाविद्यालये असून त्यांपैकी ७ महिला महाविद्यालये आहेत. कला, वाणिज्य, विज्ञान, शिक्षणशास्त्र, प्राच्यविद्या, व्यवस्थापनशास्त्र, विधी, अभियांत्रिकी व तंत्रविद्या विषयक विविध पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम राबविणारी महाविद्यालये या विद्यापीठाशी संलग्न आहेत. अनुदानित तसेच विना अनुदानित अशा दोन्ही प्रकारची महाविद्यालये विद्यापीठाशी संलग्न आहेत.
समीक्षक – संतोष गेडाम