महाराष्ट्रातील एक विद्यापीठ. कोल्हापूर संस्थानचे श्रीमंत राजाराम छत्रपती, प्राचार्य डॉ. बाळकृष्ण आणि डॉ. सी. आर. तावडे यांनी शिवाजी विद्यापीठाची कल्पना प्रथम मांडली. हे स्वप्न साकारण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, लोकनेते बाळासाहेब देसाई आणि परिसरातील अनेक शिक्षणप्रेमी मान्यवरांनी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांतून महाराष्ट्र शासनाने १९६२ मध्ये ‘विद्यापीठ कायदा’ मंजूर करून या विद्यापीठाची स्थापना केली. १८ नोव्हेंबर १९६२ रोजी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती सर्वपल्ली डॉ. राधाकृष्णन यांनी विद्यापीठाची कोनशिला बसविली. ‘ज्ञानमेवामृतम्’ हे बोधवाक्य आणि ‘विद्यापीठ लोकाप्रत’ हे ध्येयाचे प्रमुख सूत्र विद्यापीठाच्या वाटचालीसाठी स्वीकारले गेले. डॉ. अप्पासाहेब पवार हे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते. त्यांनी विद्यापीठाच्या उभारणीत अव्याहत परिश्रम घेतले.

विद्यापीठ परिक्षेत्राबरोबरच देशाच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक गरजपूर्तीसाठी मानवीसमाज निर्माण करण्यासाठी शिवाजी विद्यापीठ बांधील आहे, हा विद्यापीठाचा दृष्टीकोन असून गुणवत्ता हाच उच्चशिक्षणाचा मापदंड मानून गुणवत्तापूर्ण अध्ययन-अध्यापन, संशोधन व विस्तारसेवा यांद्वारे दर्जेदार शिक्षणसंस्कृती जोपासणे व त्याद्वारे सामाजिक गरजांची परिपूर्ती करण्यास शिवाजी विद्यापीठ समर्पित आहे, हे विद्यापीठाचे उद्दिष्ट आहे.

विद्यापीठ ८५३ एकरामध्ये वसले आहे. विद्यापीठ परिसरात मुख्य प्रशासकीय इमारत, पदव्युत्तर अधिविभाग, ९ वसतिगृहे, कुलगुरू निवासस्थान, कर्मचारी व अधिकारी, प्राध्यापक यांची निवासस्थाने, सुमारे ८ हजार कर्मचारी, प्राध्यापक व विद्यार्थी वास्तव्यास आहेत. तसेच विद्यापीठ परिसरात २ तलाव, ९ विहिरी, ११ शेततळे व बागबगीचे आहेत. पूर्वी विद्यापीठाचे कार्यक्षेत्र सांगली, सातारा, कोल्हापूर व सोलापूर या चार जिल्ह्यांपुरते होते; पंरतु सोलापूर जिल्ह्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन झाल्यामुळे शिवाजी विद्यापीठाचे कार्यक्षेत्र सांगली, सातारा व कोल्हापूर या तीन जिल्ह्यांपुरतेच मर्यादित झाले. असे असले, तरी कोकण, गोवा, कर्नाटक या सीमाभागांसह देशविदेशांतील विद्यार्थी शिक्षणासाठी विद्यापीठात प्रवेश घेतात. विद्यापीठात ३९ पदव्युत्तर विभाग, २९३ संलग्न महाविद्यालये, १३ संशोधन संस्था व १२ स्वायत्त महाविद्यालये असून सुमारे २.७५ लाख विद्यार्थी विद्यापीठात शिक्षण घेत होते (२०१९).

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केलेली ‘कमवा आणि शिका’ (अर्न अँड लर्न स्किम) या योजनेबरोबरच ‘मागेल त्याला काम’ (वर्क ऑन डिमांड) ही योजना राबविणारे शिवाजी विद्यापीठ हे भारतातील पहिले विद्यापीठ आहे. या योजनेच्या माध्यमातून तरुण विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा हे मूल्य रुजविण्याचे कार्य केले जाते. समाजातील कोणताही घटक शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून आर्थिक दृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना विविध शासकीय शिष्यवृत्तीबरोबरच ‘राजीव गांधी’ शिष्यवृत्ती योजनेचा लाभ दिला जातो.

ध्येये : (१) सामाजिक दृष्ट्या मागास, वंचित व उपेक्षित समाजातील जाती-जमातींमध्ये उच्चशिक्षणाचा प्रसार करण्यासाठी अथक परिश्रम घेणे. (२) ग्रामीण भागात ज्ञानाचा प्रसार व प्रचार करणे आणि ग्रामीण भागातील कला व संस्कृती जोपासण्यासाठी प्रेरणा देऊन त्याकरिता विशेष तरतूद करणे. (३) विद्यापीठातील विद्यार्थ्यांमध्ये शिस्त बाणविण्यासाठी नियंत्रण व पर्यवेक्षण करणे, तसेच विद्यार्थ्यांसाठी आरोग्यविषयक व कल्याणकारी योजना राबविणे. (४) शास्त्रीय दृष्टीकोन, ज्ञानपिपासू वृत्तीचे तरुण संशोधक व शिक्षक निर्माण करणे. (५) मराठी भाषा आणि महाराष्ट्राच्या इतिहासविषयक संशोधनास चालना देणे. (६) उच्च दर्जाची व्यावसायिक क्षमता धारण करण्यासाठी विद्यापीठातील सेवकांना संधी उपलब्ध करून देणे. (७) मुल्यशिक्षणाच्या माध्यमातून चारित्र्यसंपन्न विद्यार्थी घडविणे इत्यादी विद्यापीठाची ध्येये आहेत.

विद्याशाखा व अभ्यासक्रम : विद्यापीठातून पदवी व पदव्युत्तर उच्च शिक्षण दिले जाते. विद्यापीठामध्ये महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यानुसार मानव्यविद्या, वाणिज्य व व्यवस्थापन, विज्ञान व तंत्रविज्ञान आणि आंतरविद्याशाखीय विद्याशाखा या चार विद्याशाखांतर्गत कला, वाणिज्य, विज्ञान, शिक्षणशास्त्र, विधीशास्त्र, औषधनिर्मितीशास्त्र, वैद्यकशास्त्र, अभियांत्रिकी व तंत्रविज्ञान, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, नाट्य व संगीतशास्त्र, वृत्तपत्रविद्या, संदेश व दळणवळण, माहितीशास्त्र, ग्रंथालयशास्त्र, कृषी रसायन, पश्चिम व्यवस्थापन, उपयोजित रसायनशास्त्र, संगणक विज्ञान, यांत्रिकी, पर्यावरणशास्त्र, आहारविज्ञान, गृहशास्त्र, तंत्रविज्ञान, भुगोलशास्त्र, औद्योगिक रसायन, गणित, सूक्ष्म जिवशास्त्र, भौतिकशास्त्र, संख्याशास्त्र, प्राणिशास्त्र, यशवंतराव चव्हाण ग्रामीण विकास केंद्र इत्यादी विषयांचे अध्यापन केले जाते. विद्यापीठाने पारंपारिक शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना विविध कौशल्ये व रोजगारक्षमता वृद्धीकरिता ॲड-ऑन अभ्यासक्रम सुरू केले आहेत. उदा., एम. बी. ए., एम. ए. रशियन, एम. एस. डब्ल्यू, पोस्टग्रॅज्युएट डिप्लोमा इन इंग्लिश, हिंदी अँड मराठी ट्रान्सलेशन, सिंहली भाषेतील डिप्लोमा कोर्स, रेशिम शेती प्रकल्प अभ्यासक्रम, रेडिओ जॅाकी, एम. एस. सी. (तंत्रज्ञान), एम. एस. सी. (अन्नविज्ञान), एम. एस. सी. (संगणकशास्त्र) इत्यादी. विद्यापीठाद्वारे ‘स्किल ऑन व्हील्स’ सारख्या उपक्रमातून ग्रामीण भागातील तरुण युवकांना व नागरीकांना विविध कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाते.

अध्ययन-अध्यापन व मूल्यमापन : विद्यापीठाद्वारे विद्यार्थीकेंद्री अनुदेशन पद्धतींचा वापर केला जातो. शालेय अर्धवर्ष (सेमिस्टर) पद्धतीनुसार चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम (सीबीसीएस) पद्धतीनुसार विद्यापीठाअतंर्गत घेण्यात येणाऱ्या परीक्षांसाठी सिक्युअर्ड रिमोट पेपर डिलेव्हरी (एसआरपीडी) या ई-मोड प्रणालीचा वापर केला जातो. परिस्थितीनुसार विद्यापीठाद्वारे विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही प्रणालीद्वारे घेतली जाते. विद्यार्थ्यांचा हजेरी अहवाल पर्यवेक्षकांकडून ऑनलाईन भरून घेतला जातो. वेळेत निकाल लावण्याची शिवाजी विद्यापीठाची परंपरा आहे.

संशोधन : अध्ययन-अध्यापनाबरोबरच संशोधन क्षेत्रातही शिवाजी विद्यापीठ नेहमीच अग्रेसर राहिले आहे. संशोधनासाठी विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून दिल्या जातात. विविध संशोधन कार्यासाठी विविध संस्थांकडून विद्यापीठास अनुदान दिला जातो. वनस्पतीशास्त्र विभागास ’लिडगार्डन‘ हा मेजर रिसर्च प्रोजेक्ट प्राप्त असून या विभागातील विद्यार्थ्यांनी विकसित केलेली निलांबरी ही वनस्पती शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली आहे. विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान विभागाने मधुमेहावर संशोधन केले आहे. करंट सायन्स या जर्नलमधील माहितीनुसार संशोधनाच्या बाबतीत शिवाजी विद्यापीठाने देशात आठवा क्रमांक प्राप्त केला असून अकृषी विद्यापीठांच्या क्रमवारीत विद्यापीठाने प्रथम क्रमांक मिळवला आहे. राष्ट्रीय स्तरावरील संशोधनात भारतीय विद्यापीठांच्या क्रमवारीत शिवाजी विद्यापीठाची संशोधन सूची (एच इंडेक्स) ८६ इतका आहे.

अध्यासन, अभ्यास केंद्र व विस्तारकार्य : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या साहाय्याने महात्मा गांधी अभ्यास केंद्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्र, रा. न. गोडबोले अध्यासन, भगवान महावीर अध्यासन, पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासन, बँक ऑफ इंडिया अध्यासन, पंडित जवाहरलाल नेहरू अध्यासन इत्यादी विद्यापीठात कार्यरत असून याद्वारे अध्ययन-अध्यापन, संशोधन, विस्तारसेवा व लोकशिक्षणाचे कार्य केले जाते. समाजातील वंचित, उपेक्षित समुहांची बहिष्कृतता व त्यांचा शैक्षणिक विकास करणाऱ्या समावेशन धोरणांचा अभ्यास करण्यासाठी विद्यापीठाने सेंटर फॉर स्टडी ऑफ सोशल एक्सक्ल्युजन अँड इन्क्ल्युजिव पॉलिसी हे केंद्र सुरू केले आहे. ग्रामीण भागातील लोककलेला प्रोत्साहन देण्यासाठी लोककला केंद्र स्थापन केले आहे. प्रौढ व निरंतर शिक्षण विभागाच्या वतीने समाजातील वंचित घटकांना आजीवन शिक्षण देण्याचे कार्य विद्यापीठाद्वारे केले जाते. विद्यापीठाने अनेक संशोधनपर पुस्तके प्रकाशित केली आहेत व काही प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.

राष्ट्रीय सेवायोजना, राष्ट्रीय छात्रसेना व क्रिडा विभाग : शिवाजी विद्यापीठाद्वारे राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) कार्यरत आहे. या योजनेअतंर्गत श्रमसंस्कार शिबीर, रक्तदान शिबीर, एड्स जनजागृती अभियान, आपत्ती व्यवस्थापन शिबीर, वृक्षारोपण, बेटी बचाओ अभियान, साक्षरता अभियान, वन्यजीव सप्ताह इत्यादी उपक्रमांबरोबर विविध शासकीय कार्यक्रमांत विद्यार्थी सहभागी होतात. महाराष्ट्र शासनाच्या निर्मलग्राम, जलयुक्त शिवार, पाणी अडवा पाणी जिरवा, जल साक्षरता इत्यादी उपक्रमांतही विद्यापीठाचा सहभाग आहे. क्रिडा विभागामार्फत विविध वैयक्तिक व सांघिक स्पर्धांचे आयोजन केले जाते. टेबल टेनिस, क्रिकेट, खो-खो, मल्लखांब, कुस्ती, कराटे इत्यादी खेळांचे प्रशिक्षण विद्यापीठात दिले जाते. एन. सी. सी. विभागामार्फत सैन्य भरती प्रशिक्षणाबरोबरच स्वयंशिस्त, देशभक्ती, जीवनमूल्ये व जीवनकौशल्यांचे शिक्षण दिले जाते. एन. सी. सी.साठी विद्यापीठ परिसरातच विभागीय कार्यालय आहे.

दूरशिक्षण केंद्र : उच्च शिक्षणापासून वंचित असणाऱ्या १८ ते २३ वर्ष वयोगटातील तरुणांची संख्या ग्रामीण व शहरी भागातही जास्त असल्याने नोकरी, कामधंदा करून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी शिवाजी विद्यापीठाने स्वतंत्र दूरशिक्षण विभाग सुरू केला आहे. या विभागाने अल्पावधितच उत्तुंग कामगिरी केली असून सुमारे ४० हजार विद्यार्थी, बी. ए., बी. कॅाम, एम. बी. ए. इत्यादी अभ्यासक्रमांत शिकत आहेत. या केंद्राच्या वतीने २० अभ्यास केंद्र कार्यरत असून विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांसाठी स्वयंअध्ययन साहित्य पुरविले जाते.

करार : विद्यापीठाने भौतिक विज्ञानातील संशोधनासाठी ‘भाभा अणुशक्ती केंद्र’ आणि ‘भारतीय भूचुंबकत्व संस्था, मुंबई’ यांच्याशी करार केला. जागतिकीकरण, खासगीकरण व उदारीकरणाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यापीठाने अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांशी सांमजस्य करार केले आहेत. त्यांमध्ये कॅनडा येथील कॉन्सॉर्टिअम ऑफ युनिव्हर्सिटीज इन आँटॅरिओमधील १४ विद्यापीठे; लिव सेंटर इन्स्टिट्युट ऑफ स्पेस रिसर्च युक्रेन; युनिव्हर्सिटी ऑफ पोलीटीअर्स फ्रान्स; गिफू युनिव्हर्सिटी जपान; युनिव्हर्सिटी ऑफ ब्राझिलिया; नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ स्पेस रिसर्च ब्राझिल; जिओ टाँग युनिव्हर्सिटी शांघाय इत्यादींचा समावेश आहे. तसेच संशोधनाचा दर्जा उंचविण्यासाठी विद्यापीठाने २०१७-१८ मध्ये म्याँगजी विद्यापीठ (दक्षिण कोरिया); पोर्टस्मथ विद्यापीठ (युके); वॉलगाँग विद्यापीठ (आस्ट्रेलिया); एरियल विद्यापीठ (इझ्राएल); नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ ओशोनोग्राफी गोवा; अथर्व सांख्यिकी संचालनालय महाराष्ट्र शासन; जमनलाल बजाज इन्स्टिट्युट; इंडोजर्मन टूल रूम; इन्फोसिस बेंगलुरू इत्यादी संस्थांशी सामंजस्य करार केला आहे. इन्फोसिसच्या माध्यमातून विद्यापीठातील शिक्षकांना सेवांतर्गत प्रशिक्षण दिले आहे. परदेशी विद्यापीठांशी सामजंस्य करार केल्यामुळे संशोधन, ज्ञानप्रसारण व रोजगारवाढीस चालना मिळून विद्यापीठ जागतिक स्तरावर नावारूपास येत आहे.

ग्रंथालय : विद्यापीठामध्ये बॅ. बाळासाहेब खर्डेकर सुसज्ज ग्रंथालय आहे. ग्रंथालयात सुमारे ३ लाख छापील ग्रंथ व महत्त्वाची कागदपत्रे असून २९८ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नलस आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या UGC/INFONET/INFILBNET या डिजिटल लायब्ररीशी विद्यापीठ ग्रंथालय जोडले आहे. INFILBNET केंद्रांमध्ये सुमारे ६,००० पेक्षा जास्त इलेक्ट्रानिक्स जर्नल्स व माहिती उपलब्ध आहेत. ग्रंथालयात ऑनलाईल पब्लिक ॲक्सेस कॅटलॉग (ओपॅक) प्रणाली उपलब्ध असून इंटरनेट लॅबद्वारा (महाजालीय प्रयोगशाळा), नोंदणीकृत प्रबंध (थेसिस रजिस्ट्रेशन्स), दुर्मिळ ग्रंथ व दस्तऐवज उपलब्ध आहेत. ग्रंथालयामध्ये रिसोर्स सेंटर फॅार इन्क्लुजिव्ह एज्युकेशन स्थापन करण्यात आल्यामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांना यातील संदर्भ स्रोत वापरण्याची सोय उपलब्ध आहे.

मूल्यांकन : अध्ययन-अध्यापन, संशोधन व समाजातील वंचित घटकांना शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्यामध्ये शिवाजी विद्यापीठ नेहमीच अग्रस्थानी राहिले आहे. नॅक, एन. आय. आर. एफ. यांसारख्या राष्ट्रीय मुल्यांकन संस्थांकडून विद्यापीठाचे मुल्याकंन झाले असून नॅककडून विद्यापीठास ३.१६ एवढ्या सीजीपीएसह ‘अ’ श्रेणी मिळाली आहे. अमेरिकेने जाहिर केलेल्या बेस्ट ग्लोबल युनिव्हर्सिटीजमध्ये शिवाजी विद्यापीठाने एकविसावे स्थान प्राप्त केले आहे. ई-गव्हर्रन्स, ऑनलाईन शिक्षण, परीक्षा, प्रवेश प्रक्रिया यांमध्ये संगणकीय प्रणालीचा प्रभावी वापर, कॅशलेस व्यवहार इत्यादींमुळे विद्यापीठाचे प्रशासन गतिमान बनले आहे. केंद्र शासनाच्या शैक्षणिक संस्था उन्नतीकरण योजनेत शिवाजी विद्यापीठाचा समावेश आहे. नॅशनल नॉलेज नेटवर्कमध्ये सामील होणारे शिवाजी विद्यापीठ हे महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ आहे.

विद्यापीठाद्वारे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदा, सेमिनार, कार्यशाळा, व्याख्याने व चर्चासत्रे यांचे आयोजन केले जाते. विद्यापीठातर्फे जिल्हास्तरीय व विद्यापीठस्तरीय युवा महोत्सव, अश्वमेघ, अविष्कार संशोधन स्पर्धा, इंद्रधनुष्य, क्रिडा महोत्सव इत्यादी उपक्रम मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येतात.

विद्यापीठातील प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून विद्यापीठाद्वारे जॉबफेअर व अनेक कंपन्यांसाठी परिक्षेत्र मुलाखतीचे (कॅम्पस इंटरव्ह्यू) आयोजन केले जाऊन या कार्यक्रमात विद्यार्थी व प्राध्यापकांना प्रशिक्षण दिले जाते. त्यामध्ये परिक्षेत्र मुलाखतीद्वारे आयसीआयसीआय, विप्रो, एशियन पेंट्स, रिलायन्स, ॲपटेक व इतर नामवंत कंपन्यांमध्ये विद्यार्थी निवडले जातात.

समीक्षक : के. एम. भांडारकर