ओडिशा (ओरिसा) राज्यातील प्रसिद्ध प्राचीन शिलालेख. पुरी जिल्ह्यातील उदयगिरी टेकडी परिसरात असलेला हा हाथीगुंफा शिलालेख म्हणजे प्राचीन कलिंग देशाचा चेदी राजघराण्यातील व महामेघवाहन याच्या वंशातील चक्रवर्ती राजा खारवेल याची ही प्रशस्ती आहे. यात तत्कालीन इतिहास, भूगोल, स्थळे, कालक्रम यांचे योग्य वर्णन आढळते. प्रस्तुत लेखात कालनिर्देश नाही. भारतीय प्राच्यविद्यापंडित काशीप्रसाद जयस्वाल (१८८१-१९३७) यांच्या मते लेखातील समकालीन राजांच्या उल्लेखामुळे सर्वसाधारणपणे खारवेलाचा काळ इ. स. पू. दुसरे शतक ते पहिल्या शतकाची अखेर या दरम्यानचा असावा.

भुवनेश्वर (ओडिशा) जवळील उदयगिरी येथील हाथीगुंफा.

इ. स. १८२० मध्ये ए. स्टर्लिंग यांनी या लेखाचा शोध लावला. कर्नल मॅकेंझी यांनी सर्वप्रथम लेखाचा ठसा घेतला. बंगालच्या एशियाटिक सोसायटीच्या नियतकालिकात तो प्रसिद्ध झाला. इ. स. १९३७ मध्ये जेम्स प्रिन्सेप यांनी लेफ्टनंट किटो यांनी घेतलेल्या यथादृष्ट प्रतीवरून प्रस्तुत लेखाचे वाचन केले. या लेखाच्या ऐतिहासिक महत्त्वामुळे अलेक्झांडर कनिंगहॅम, भगवानलाल इंद्रजी, जॉन फ्लिट, जॉर्ज ब्युहलर, दिनेशचंद्र सरकार, काशीप्रसाद जयस्वाल आणि राखालदास बॅनर्जी अशा विद्वानांनी त्याचे पुनर्वाचन केले व लेखाच्या वाचनात यथायोग्य बदल सुचवले.

लेख गुंफेच्या छतावर कोरला आहे. सतरा ओळीचा हा लेख अनेक ठिकाणी भग्न झाला आहे. लेखाच्या सुरुवातीस राजमुकुट (श्रीवत्सही असू शकते ) आणि स्वस्तिकाची खूण आहे, तर शेवटी वेदिकेत एका झाडाचे चिन्ह आहे.

खारवेल याच्या बालपणापासून ते तेराव्या शासन वर्षापर्यंतच्या महत्त्वाच्या खासगी व राजकीय घटनांची कालक्रमानुसार नोंद केली आहे. प्राचीन भारतातील या पद्धतीचा हा एकमेव लेख आहे. सम्राट अशोक याच्या ओडिशा येथील धौली आणि जौगड येथील लेखात असलेल्या भाषेपेक्षा या लेखातील मागधी प्राकृत थोडी निराळी आहे. लेख ब्राह्मी लिपीमध्ये कोरलेला आहे. यातील अक्षरे मौर्यकाळानंतरची दिसून येतात.

लेखाच्या सुरुवातीस अर्हतांना वंदन केले आहे. खारवेलाची ओळख महामेघवाहन राजाच्या चेदी वंशातील तिसरा राज्यकर्ता, कलिंगाधिपती, ऐर (आर्य) महाराज अशी केली आहे. वयाच्या तेराव्या वर्षापर्यंत तांबूस वर्णाच्या या राजपुत्राने बालक्रीडा केली. या नंतरची नऊ वर्षे त्याने पत्रव्यवहार, हिशोब, कायदा, धर्मशास्त्र, नाणकशास्त्र इत्यादी आवश्यक ज्ञान प्राप्त करून युवराजपद भूषवले. वयाच्या चोवीसाव्या वर्षी खारवेलाचा राज्याभिषेक झाला. यानंतरच्या लेखात पुढच्या तेरा शासन वर्षातील प्रत्येक वर्षी घडलेल्या महत्त्वाच्या  घटनांची नोंद केली आहे.

खारवेल राजाचा शिलालेख.

पहिल्या वर्षी त्याने कलिंग नगरातील वादळाने उद्ध्वस्त झालेल्या इमारती, गोपुरे दुरुस्त केली. ‘खिबीरऋषिताल’ या तलावाला बांध घातला. या करिता पस्तीस लाख मुद्रा खर्च केल्या. दुसर्‍या वर्षी सातकर्णीला आव्हान देत खारवेलाची विशाल सेना कण्णबेणा नदीपर्यंत पोहोचली आणि त्यांनी असिक नगरावर आक्रमण केले. तिसर्‍या वर्षी संगीत शास्त्रात निपुण असलेल्या खारवेलाने प्रजाजनांच्या मनोरंजनासाठी संगीत, नृत्य, गायन, वादनाचे कार्यक्रम आयोजित केले. चौथ्या वर्षी रथिक व भोजकांना शरण आणले. पाचव्या वर्षी मगधाच्या नंद राजाने एकशे तीन वर्षे पूर्वी काढलेला ‘तनसुलीयवाट’ कालवा राजधानीपर्यंत आणला. सहाव्या वर्षी त्याने राजसूय यज्ञ केला आणि पुन्हा आपला राज्याभिषेक समारंभ केला. या प्रसंगी त्याने आपल्या शहरी आणि ग्रामीण प्रजेला मोठ्या प्रमाणावर करमुक्ती जाहीर केली. सातव्या वर्षी वज्रगृहाच्या राणीला मातृत्व प्राप्त झाले. राजकीयदृष्ट्या ही घटना महत्त्वाची असावी. आठव्या वर्षी गोरध पर्वतावर हल्ला करून राजगृहावर दबाव आणला. मगधावर कलिंग देशाचा वाढता राजकीय प्रभाव ही महत्त्वाची घटना होती. याच काळात मथुरेत यवन राजा दिमित (डिमिट्रीयस) याने खारवेलाचे वाढते सामर्थ्य पाहून माघार घेतली. नवव्या वर्षी अडतीस लक्ष मुद्रा खर्च करून खारवेलाने ‘महाविजय प्रासाद’ नावाचा राजवाडा  बांधला. दहाव्या वर्षी खारवेलाने आपला मोर्चा ‘भारतवर्षाकडे’ वळविला. ‘भारतवर्षाचा’ हा पहिला पुराभिलेखीय उल्लेख आहे. अकराव्या वर्षी एकशे तेरा वर्षे प्रजेवर आपली भयप्रद पकड रोवून असलेल्या तिमिर देशाला पराभूत केले आणि मोठ्या प्रमाणावर अमूल्य रत्नांची लूट मिळवली. आपला दरारा कायम राखण्यासाठी पिठुण्ड नगरीवर गाढवाचा नांगर फिरवला. संपूर्ण सर्वनाशाचे हे प्रतीक होते. बाराव्या वर्षी मगधाचा राजा बहसतिमित (बृहस्पतिमित्र) याला शरण आणले. मगधांच्या ‘सुगंग’ प्रसादात प्रवेश केला. नंदराजाने कलिंगहून लुटून आणलेली जिनमूर्ती त्याने पुन्हा स्थापित केली. या स्वारीत देखील त्याला पांड्य राज्याकडून अमूल्य रत्ने मिळाली. तेराव्या वर्षी आपल्या विजयाची पताका सर्वदूर पसरू लागल्यावर कुमारी पर्वतावर अर्हतांना वर्षाऋतूत निवासाची सोय केली. सिंहपथाची राणी सिंधुळा हिच्यासाठी निवासस्थान बांधले.

लेखाच्या अखेरीस त्याला अनेक गुणविशेष असलेला, अप्रतिहतचक्र (ज्याच्या सैन्याला आणि रथांना कोणी विरोध केला नाही), सर्व देवळांचा उद्धार करणारा, कल्याणकारी राजा, भिक्षुंसाठी, भिक्षुंचा राजा अशा वैशिष्ट्यांनी गौरविले आहे.

संदर्भ:

  • Jayaswal, K. P. & Banerji, R. D. ‘The Hathigumpha Inscription of Kharavelaʼ, Epigraphia Indica, Vol-XX, pp. 71-89, 1929.
  • Sircar, D. C. Ed., Select Inscriptions Bearing on Indian History and Civilization, Vol-1, No.91, Hathigumpha Cave Inscription of Kharavela, Calcutta, 1942.
  • गोखले, शोभना, पुराभिलेखविद्या, पुणे, २००७.

                                                                                                                                                                                                                           समीक्षक : मंजिरी भालेराव