वेस्ट इंडीज द्वीपसमूहातील लीवर्ड बेटांपैकी अँटिग्वा व बारबूडा देशाची राजधानी आणि कॅरिबियन समुद्रावरील महत्त्वाचे बंदर. लोकसंख्या २१,४७५ (२०११). हे अँटिग्वा बेटाच्या वायव्य किनाऱ्यावर वसलेले आहे. ब्रिटिशांनी १६३२ मध्ये येथे वसाहत स्थापन केली. फ्रेंचांचा १६६६-६७ हा कालावधी वगळता सेंट जॉन्स शहर ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली होते. अठराव्या शतकात वेस्ट इंडीजमधील रॉयल नेव्हीचे मुख्यालय येथे होते. १६९० व १८४३ चे भूकंप, १७६९ मध्ये लागलेल्या आगी व १८४७ मधील हरिकेन वादळ यांमुळे या शहराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या बेटांवर नैसर्गिक खोल सागरी बंदर नसल्यामुळे येथे १९६८ मध्ये सेंट जॉन्स बंदराची खोली वाढवून तेथे अनेक बंदर सुविधा निर्माण करण्यात आल्या. १९८१ मध्ये देश स्वतंत्र झाल्यानंतर हे देशाच्या राजधानीचे ठिकाण बनले. हे शहर देशाचे प्रमुख व्यापारी केंद्र व बंदर आहे. येथून मुख्यत्वे साखर, कापूस, यंत्रसामग्री, लाकूड व अन्नपदार्थ यांचा व्यापार चालतो. या शहरात जगातील प्रमुख वित्तीय संस्थांची कार्यालये, मोठी विक्री केंद्रे (शॉपिंग मॉल), बुटीक इत्यादी आहेत. लेसर अँटिलिसमधील हे सर्वांत मोठे विकसित आणि मिश्रवंशीय लोकसंख्येचे शहर आहे. शहराच्या ईशान्येस १० किमी.वर व्ही. सी. बर्ड हा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हे देशातील महत्त्वाचे पर्यटनस्थळ असून येथील सागरी वस्तूंचे संग्रहालय, अँग्लिकन कॅथीड्रल, फोर्ट जेम्स, ब्रिटिश राजभवन, सर व्हिव्हियन रिचर्ड्स प्रेक्षागार, अँटिग्वा व बारबूडा संग्रहालय, वनस्पतिउद्यान, रिसॉर्ट, दीपगृह ही पर्यटकांची आकर्षणे आहेत.

समीक्षक : वसंत चौधरी


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.