पश्चिम आफ्रिकेतील घाना देशाची राजधानी, देशातील सर्वांत मोठे शहर व एक प्रमुख सागरी बंदर. लोकसंख्या ४४,००,००० (२०२० अंदाज). देशाच्या दक्षिण भागात, अटलांटिक महासागराचा भाग असलेल्या गिनीच्या आखात किनाऱ्यावर हे शहर वसले आहे. पोर्तुगीजांनी इ. स. १४८२ मध्ये सांप्रत घाना म्हणून जो प्रदेश ओळखला जातो, त्याच्या किनारी भागात म्हणजेच सध्याच्या अ‍ॅक्रा येथे वसाहत केली. सोळाव्या शतकात त्यांनी येथे व्यापाराकरिता किल्ला बांधला. सतराव्या शतकात पोर्तुगीजांबरोबरच डच, डॅनिश, फ्रेंच व ब्रिटिश लोकांनी या भागात आपापले किल्ले बांधून व्यापारी ठाणी वसविली. या किनारी भागात नायजेरिया प्रदेशातून आलेले गा जमातीचे लोक राहत. गोल्डकोस्टमधील मूळचे रहिवाशी असलेले अक्रान लोक गा लोकांना ‘न्क्रान्त’ (म्हणजे काळ्या मुंग्या) असे म्हणत. त्यावरूनच यूरोपीयनांनी या शहरास ‘अ‍ॅक्रा’ हे नाव दिले. अ‍ॅक्राची व्यापारकेंद्र म्हणून भरभराट होत असताना इ. स. १८५० मध्ये डॅनिश, तर इ. स. १८७२ मध्ये डच येथून निघून गेले. त्यामुळे येथे केवळ ब्रिटिशांचे वर्चस्व प्रस्थापित झाले. ब्रिटिशांनी इ. स. १८७६ मध्ये येथे गोल्डकोस्ट वसाहतीची स्थापना केली. अ‍ॅक्रा ही या गोल्डकोस्ट वसाहतीची राजधानी बनली आणि स्वातंत्र्योत्तर काळात तीच घाना देशाची राजधानी राहिली. नगराच्या विकासाच्या दृष्टीने इ. स. १८९८ मध्ये येथे नगरपरिषदेची स्थापना करण्यात आली होती.

ॲक्रा शहराचा काही भाग सस.पासून साधारण ८ ते १९ मी. उंचीच्या सागरी कड्यांवर व भूशिरावर वसला असून, उर्वरित विस्तार उत्तरेकडील उंचसखल अ‍ॅक्रा मैदानात झालेला आहे. त्याचे क्षेत्रफळ २२५.३ चौ. किमी. आहे. इ. स. १९३० च्या दशकापासून शहराच्या नियोजनबद्ध विकासास प्रारंभ झाला. हे क्षेत्र भूकंपाच्या पट्ट्यात येत असून इ. स. १९३९ मध्ये झालेल्या भूकंपाने याची खूप हानी झाली होती. स्वातंत्र्यानंतर शहराची झपाट्याने वाढ झाली. सांप्रत अ‍ॅक्रामध्ये ‘गा’ जमातीच्या अनेक गावांचा समावेश झालेला आहे. पूर्वी या शहराच्या उत्तरेस २४ किमी. वर असलेल्या आयासो (आयावासो) या पालक वसाहतीची सत्ता या प्रदेशावर होती. अ‍ॅक्रा हे घानाचे प्रशासकीय, आर्थिक व शैक्षणिक केंद्र आहे. शहरात धातुकाम, मद्यनिर्मिती, वस्त्रोद्योग, खाद्यपदार्थ, बिस्किटे, रसायने, कीटकनाशके, आगकाड्या, कौले निर्मिती, फळांची डबाबंद उत्पादने, मासळी खारविणे इत्यादी लहान-मोठे उद्योग चालतात. अ‍ॅक्रा शहराच्या आसमंतात सोन्याच्या व हिऱ्याच्या खाणी असून कोकोचेही प्रचंड उत्पादन होते. अटलांटिक महासागरावरील हे महत्त्वाचे बंदर असून, त्यामधून प्रामुख्याने कोको, इमारती लाकूड, सोने, हिरे, मँगॅनीज व बॉक्साइट यांची निर्यात होते.

ॲक्रा शहर लोहमार्गाने व उत्तम रस्त्यांनी देशातील तसेच शेजारच्या देशांतील प्रमुख शहरांशी जोडले आहे. कोटोका हा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ असून जगातील वेगवेगळ्या देशांशी येथून नियमित विमानवाहतूक चालते. अ‍ॅक्रा शहराच्या पूर्वेस सुमारे २५ किमी. वर टेमा हे अ‍ॅक्राचे उपनगर असून सध्या प्रामुख्याने तेथूनच जहाजवाहतूक चालते. जुन्या किल्ल्यांपैकी एकात राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान व दुसऱ्यामध्ये तुरुंग आहे. येथील संसदभवन, राष्ट्रीय संग्रहालय, राष्ट्रीय अभिलेखागार, घाना विद्यापीठ (इ. स. १९४८), रुग्णालय, चर्च, चित्रपटगृहे इत्यादी उल्लेखनीय आहेत. येथे प्रवाशांकरिता अद्ययावत हॉटेल्स असून पर्यटनासाठी आकर्षक पुळणी आहेत.

समीक्षक : वसंत चौधरी