ब्राझीलमधील साऊँ पाउलू राज्याच्या राजधानीचे ठिकाण आणि देशातील अग्रेसर औद्योगिक केंद्र. ब्राझीलमधील तसेच दक्षिण अमेरिकेतील हे सर्वांत मोठे शहर असून जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरांपैकी हे एक आहे. ब्राझीलच्या आग्नेय भागात वसलेले हे शहर रीओ दे जानेरोपासून नैर्ऋत्येस ३५० किमी.वर, तर अटलांटिक किनाऱ्यावरील सँतुस बंदरापासून ४८ किमी. आत आहे. लोकसंख्या महानगरीय २,२२,३७,४७२ (२०२१ अंदाजे). हे शहर ब्राझीलियन उच्चभूमीच्या कडेवर असणाऱ्या सेरा दू मार या टेकड्यायुक्त पठारी प्रदेशात, तसेच नद्यांच्या खोऱ्यात सस.पासून ८२० मी. उंचीवर वसलेले आहे. शहरालगत मंद उताराच्या गोलाकार टेकड्या असून त्या लाल रंगाच्या मातीने आच्छादलेल्या आहेत. अधिक उंचीमुळे मकरवृत्तावर असूनही या अक्षवृत्तावरील अन्य ठिकाणांच्या तुलनेत येथील हवामान समशीतोष्ण कटिबंधीय प्रकारचे आहे. वार्षिक सरासरी तापमान १९° से. असले, तरी हिवाळ्यात गोठणबिंदूपर्यंत आणि उन्हाळ्यात ३०° से. पर्यंत अशी येथील तापमानात तफावत आढळते. जुलै हा सर्वांत थंड, तर फेब्रुवारी हा सर्वांत उबदार महिना असतो. प्रामुख्याने उन्हाळ्यात (ऑक्टोबर ते मार्च) भरपूर पाऊस पडतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १४२ सेंमी. आहे. सेरा द कँटँरेइराकडून येणाऱ्या मंद वाऱ्यामुळे येथील हवामान मध्यम स्वरूपाचे राहते. टिएटे, पिन्हेइरॉस व टॅमेंड्युआतेई या नद्यांचे छोटे प्रवाह शहराच्या मधून वाहतात. या नद्यांच्या काठावरील क्षेत्र गाळाच्या सखल मैदानांनी व्यापले असून त्या भागात कामगारांची निवासस्थाने, कारखाने, व्यापारी संस्था इत्यादी आढळतात. तसेच येथील वाळूमिश्रीत गाळाच्या मातीत ‘सखोल मंडईबागशेती’ केली जाते.

पोर्तुगीज जेझुइट धर्मप्रचारकांनी २५ जानेवारी १५५४ रोजी या जागी एक लहानशी वसाहत स्थापन केली. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत ही वसाहत लहानच होती. पोर्तुगीज शाही घराण्यातील दों पेद्रू यांनी इ. स. १८२२ मध्ये पोर्तुगालपासून ब्राझीलला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी सुरू केलेल्या चळवळीचे हे मुख्य केंद्र म्हणून निवडले होते. अधिक उंची व थंड हवामान यांबरोबरच सधन भांडवल पुरवठादार यांमुळे एकोणिसाव्या शतकाच्या दुसऱ्या अर्धशतकात देशाच्या अंतर्गत भागात कॉफी मळ्यांचा विस्तार होत गेला. त्यामुळे साऊँ पाउलू शहरात कॉफीवरील प्रक्रियाउद्योग भरभराटीस आला. कॉफी मळ्यांत काम करण्यासाठी यूरोप व आशियाई देशांतून फार मोठ्या संख्येने लोक येथे आले. त्यांतील बहुसंख्य साऊँ पाउलू शहराकडे वळले. इ. स. १८९० मध्ये साऊँ पाउलू शहर हे कॉफीच्या व्यापाराचे अग्रेसर केंद्र बनले. परदेशातून आलेल्या बहुतांश लोकांनाही या उद्योगांत सामावून घेतले गेले.

साऊँ पाउलू शहराची अर्थव्यवस्था विविधांगी असून अलीकडे तिची वाढ सेवा व्यवसायाधारित दिशेने होत आहे. ब्राझीलमधील हे सर्वांत श्रीमंत शहर आहे. वस्त्रनिर्माण, उपभोग्य वस्तू, यांत्रिक व विद्युत साहित्य, मोटारगाड्या, वाहतूक सामग्री, फर्निचर, रसायने, औषधे, कागद, कृत्रिम रबर, सिमेंट, प्लॅस्टिक, खाद्यपदार्थ, तंबाखू उत्पादने इत्यादींचे उद्योग शहरात चालतात. लगतच्या कुबाताऊँ व कॅपुआव्हा येथे तेलशुद्धीकरण कारखाने तर, तौबाते येथे अवजड धातुकर्म उद्योग आहेत. देशाच्या एकूण औद्योगिक उत्पादनांपैकी जवळजवळ निम्मे उत्पादन साऊँ पाउलू शहर व परिसरातून होते. शहरात घाऊक व किरकोळ तसेच कृषी मालाचा मोठा व्यापार चालतो. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बँक व्यवसायाचे हे प्रमुख केंद्र आहे. ब्राझीलमधील सर्वांत महत्त्वाच्या तीन लोहमार्गांवरील हे एक प्रमुख प्रस्थानक असून सँतुस बंदराशी ते रस्ते व लोहमार्गांनी, तर इतर राज्यांशी महामार्गांनी जोडलेले आहे. काँगॉनहस, कंबिका व व्हिराकोपोस हे येथील गजबजलेले विमानतळ आहेत.

अफाटपणा हे या शहराचे वैशिष्ट्य असून दूरवर अनेक उपनगरे पसरली आहेत. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात संपूर्ण महानगराची वेगाने अनियंत्रित वाढ होत गेल्याने इ. स. १८८९ पासून शहराची नियोजनबद्ध रचना करण्यात आली व शहराच्या वाढीस प्रोत्साहन देण्यात आले; परंतु सातत्याने परदेशातून तसेच देशाच्या इतर भागांतून मोठ्या संख्येने लोक येत राहिल्याने पाणीपुरवठा, सांडपाण्याची विल्हेवाट, वीज इत्यादी सार्वजनिक सेवा मागणीच्या तुलनेत फारच कमी पडू लागल्या असून वाहतुकीची कोंडी, प्रचंड गुन्हेगारी, प्रदूषण, दारिद्र्य इत्यादी स्वरूपांच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. निवासी क्षेत्र प्रामुख्याने उंचवट्याच्या भागात आढळते. शहरातील बरेच लोक झोपड्यांमध्ये राहतात. शहरातील सांपा हा भाग अतिशय गजबजलेला असून तो जगातील सर्वाधिक दाट लोकवस्तीचा आहे. या भागात अनेक वित्तीय व सांस्कृतिक संस्था, समृद्ध वास्तुशिल्प परंपरा, नव-गॉथिक कॅथिड्रलपासून अत्याधुनिक शिल्पकलेतील गगनचुंबी इमारती अशी असंख्य वैशिष्ट्ये या भागात आढळतात.

साऊँ पाउलू युनिव्हर्सिटी (स्था. इ. स. १९३४) हे देशातील सर्वांत मोठे विद्यापीठ, तसेच विविध अभ्यास शाखांची अनेक महाविद्यालये व शैक्षणिक संस्था येथे आहेत. सर्प व प्रतिविषविषयक संशोधनासाठी जगप्रसिद्घ बुटांटा संस्था येथे आहे. शहरात मोठी ग्रंथालये, रंगमंदिरे, वस्तुसंग्रहालये इत्यादी असून अजूनही काही जुन्या चर्चच्या इमारती येथे आढळतात. कोपान बिल्डिंग (१९५०), ४६ मजली इटालीयन बिल्डिंग (१९५६), मेट्रोपॉलिटन कॅथिड्रल (१९५४ – नूतनीकरण २००२) या प्रमुख वास्तू आहेत. १९५१ पासून येथे फार मोठे आंतरराष्ट्रीय कला प्रदर्शन भरते. शहरात ठिकठिकाणी मोठे चौक व अनेक उद्याने असून त्यांतील आयबिराप्वेरा उद्यान सुंदर आहे. सँतो आमारो सरोवरप्रदेश आकर्षक स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. परंपरागत उपहारगृहांबरोबरच नवतरुणांच्या आवडी-निवडींचे उपहारगृहे, खाद्यपदार्थ, खेळ व मनोरंजनाच्या सुविधा येथे भरपूर आहेत. शहराजवळच्या सेरा दे कँटारेईरा या पर्वतश्रेणीत १०० चौ. किमी. क्षेत्रात राखीव जंगल आहे.

समीक्षक : नामदेव स. गाडे